सुश्री संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ एक अविस्मरणीय अनुभव ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
एक अविस्मरणीय अनुभव……
… आणि त्यावर केलेली मात
२४ नोव्हेंबर १९७८ या दिवशी एका भारतीय सैनिकाबरोबर सहजीवन सुरू झाले. आणि आयुष्याला एक वेगळेच वळण आले. जसजशी वळण येत गेली तसतसा ३३ वर्ष हा प्रवास सुरू होता.
या ३३ वर्षाचे High lights सांगायचे झाले तर •••
१. वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या शहरात एकंदर १५ बदल्या, प्रत्येक Posting काही तरी शिकवून गेली. अनुभव देऊन गेली. •••
२. एकंदर २० घरात संसार थाटला. कधी दहा खोल्यांचा ब्रिटिशकालीन प्रशस्त बंगला तर कधी दोन खोल्यांचे घर. कधी भाड्याच्या घरात, तर कधी दुसऱ्यांच्या घरात (ते सुट्टीवर गेले असताना त्यांच्या घरात) ••••
३. मुलीचे १२ वी पर्यंतचे शिक्षण १२ शाळांमध्ये पूर्ण झाले. •••
४. आमच्या आजपर्यंतच्या सुखी संसाराच्या त्या टिपिकल काळया ७० लाकडी पेट्या घेऊन आम्ही फूल नाही फुलाची पाकळी एवढं योगदान देऊन अभिमानाने आणि समाधानाने रिटायर्ड झालो. •••
या ३३ वर्षात एक नाही अनेक अविस्मरणीय प्रसंगांना सामोरे गेलो. अनेक उतार चढाव बघितले. कधी अपेक्षित तर कधी अनपेक्षित होते. अनेक स्वाद चाखायला मिळाले. त्याबरोबर जीवन समृद्ध, श्रीमंत होत गेले. किती तरी प्रसंग मनावर कोरले गेलेत. •••••
मी कधी *uniform * घातला नाही. हातात बंदूक धरली नाही. पण मी आर्मी लाइफ जगले आहे. गोळ्यांच्या आवाज ऐकला आहे. अप्रत्यक्षपणे कारगिल युद्धात भाग घेतला आहे. या सर्व अविस्मरणीय आठवणी म्हणजे मनावर कोरले गेलेले एक पुस्तकच आहे. •••
त्यातलाच एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे, •••••
*आमची अंदमान निकोबार ची Posting. *••••
१९८८ ते १९९0 माझे पती Col (Dr) P. M. Bedekar त्यावेळचे Maj (Dr) P. M Bedekar यांना Nicobar Group Of Island च्या NanCowry या बेटावर पन्नास बेडेड दवाखाना सांभाळायची जबाबदारी मिळाली. आजूबाजूला असलेले नऊ Island चे लोक पण याच दवाखान्यावर निर्भर होते. त्यामुळे भरपूर पेशंट्स असायचे. ••••
Posting आली त्यावेळेस आम्ही लखनऊ ला होतो. •••
NanCowry ला पोहचण्यासाठी आम्ही केलेला प्रवास म्हणजे ••••
ट्रेनने लखनऊ ते कलकत्ता — कलकत्ताहून जहाजाचा चार दिवसांच्या प्रवासानंतर — Portblair (Andaman Nicobar ची राजधानी) —- तेथून पुन्हा जहाजाने तीन दिवसानंतर आम्ही NanCowry येथे जुलै महिन्यात पोहचलो. ••• समुद्री प्रवासात खूप वेगवेगळे अनुभव आले. आम्ही या समुद्री प्रवासात फक्त एकच दिवस सरळ चाललो होतो. बाकी प्रवास खवळलेल्या समुद्रात, भयंकर लाटांमुळे झोपूनच पूर्ण झाला. या प्रवासात एका प्रवाशाचे निधन झाले. तेंव्हा त्यांच्या शरीरावर वजन बांधून त्याचे समुद्रात विसर्जन केले. ही घटना ऐकून आता मनानेही हेलकावे घ्यायला सुरुवात केली. अनेक काल्पनिक विचारांनी मन भरून गेले. बरे असो. ••••
पोर्ट ब्लेअरला एका बाईने सांगितले की NanCowry ला खूप साप आहेत, तेव्हा सांभाळुन रहा. मुलींना शाळेत पाठवताना एकदा त्यांचे शूज जरूर चेक करत जा… हा माईंड सेट घेऊन, आम्ही आमच्या जागी पोचलो. आर्मी डॉक्टरच्या स्वागतार्थ पूर्ण गाव एकत्र झालं होतं. पण माझे लक्ष नव्हतंच, कारण मी तर साप शोधण्यात बिझी होते…. आमच्या पूर्ण *NanCowry stay * मध्ये मला एकही साप दिसला नाही. हे विशेष.
यांचा मानसन्मान बघून सहजच मनात आलं •••
आज या देशात पंतप्रधान श्री राजीव गांधी नंतर बहुतेक माझ्याच नवऱ्याचा नंबर असावा. ••••
NanCowry Island म्हणजे —
5000 लोकसंख्या असलेले एक गांव. चारी बाजूला समुद्र. लाकडी मचाणावर उभे असलेले आमचे लाकडी घर. म्हणजे छोटासा टुमदार बंगलाच होता तो. आवारात नारळाची तीस झाडे होती. स्वयंपाक घराच्या खिडकीतून मला समुद्र दिसत असे. पहिल्याच दिवशी रात्री घर हलू लागले. बहुतेक समुद्राचे पाणी आले की काय?? या भीतीने घाबरून उठून बघितले, तर घराच्या खाली गाय बसली होती. आणि ती उठायचा प्रयत्न करत होती. त्यामुळे घर हालत होते. ••••
मनात म्हटलं, ••• ऐसा भी होता है!!! ••• आमचे घर म्हणजे या गावातील *प्रेक्षणीय स्थळ * होते. मुलींची शाळा मात्र नावालाच होती. तेथे मच्छर भरपूर. त्यामुळे cerebral maleria चे भरपूर पेशंट्स असत.
१५ आॉगस्ट १९८८ चा तो दिवस, आजपण जसाचा तसा मला चांगला आठवतोय. •••
** पिलपिलो ** नावाचे बेट •••आमच्या आयलँडपासून तीन साडेतीन तासांच्या अंतरावर होते. तेथील कॅप्टन (सरपंच) आम्हाला आपली एक छोटी बोट घेऊन घ्यायला आला होता. म्हणाला, •••
“सर!! आजतक कोई भी डॉक्टर हमारे गांव नहीं आया । आप आर्मी के डॉक्टर हैं । आप ज़रूर आयेंगे ।ऐसा मैं गांव वालों को बताके आया हूं ।” •••• आता तर *युनिफॉर्म की इज्जत का सवाल होता. *••••
खरंतर आॅगस्ट महिना, अफाट समुद्र, लहान बोट •••सर्व कंडीशन्स प्रवासासाठी अनुकूल नव्हत्याच. नुकताच जहाज प्रवासाचा अनुभव अजून डोक्यात होताच. •••(हे सर्व आमचा पिलपिलोचा प्रवास संपल्यावर जास्त चांगलं समजलं.) ••••
“ सर!! कोई प्रोब्लेम नहीं सर!! चिंता नहीं सर!! आरामसे चले जाऐंगे सर!! । “••• कॅप्टन (सरपंच) म्हणाला. ••••
आम्ही निघालो, क्षणाक्षणाला माझे विचार, भावना, चेहऱ्यावरील भाव बदलत होते. कलकत्ता ते पोर्टब्लेअर प्रवास बंद आणि खूप मोठ्या जहाजांतून VIP Room मधून झाला होता. आता मात्र विशाल समुद्र, दूरदूरपर्यंत पाणीच पाणी. तेथे फक्त आमची एक बोट जात होती. कॅप्टनच्या गप्पा सुरूच होत्या. •••
सुरवातीला दीड तास प्रवास अगदी संथ स्मूथ काहीही विशेष हालचाल न होता झाला. मनावरील दडपण थोडं कमी झालं. ••• थोडाच वेळ जरा बरा गेला असेल आणि समुद्राने आपलं रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली. ओपन बोट असल्यामुळे दूरून येणारी मोठ्ठी लाट दिसायची. लाटेनुसार बोट वेगवेगळे हेलकावे घेत होती. कधी कधी तर दहा फूट उंच वर जात होती. लाट बघून कल्पनेनेच पोटात गोळा यायचा. •••• * प्राण तोंडाशी येणे *. *जीव मूठीत घेऊन बसणे *. या वाक्यांशाचे अर्थ तेंव्हा अनुभवायला मिळाले. बरोबर दोन लहान मुलींना सांभाळायचे होते. हा असा प्रवास दीड तास चालू होता.
त्यातच कॅप्टन म्हणाला, “ मॅडम!! डरना नहीं । अगर बोट उल्टा हो गया, तो बोट को पकड़ कर रखना। तूफान खत्म हो जायेगा तो हम सब मिलकर बोट को सीधा कर लेंगे। “ व्वा!! काय जोरदार option होते.!!!! म्हणजे बोटला पकडून उभे रहायचे. आपलं शरीर पाण्यात, आणि मग मुलींना कोण सांभाळणार??? ••••
*डरना मत * असं म्हणून आम्हाला पूर्णपणें चित करून दिलं. आत्ता प्राण जातायेत की पुढच्या क्षणाला, जलसमाधी होणार की काय?? बस एवढीच वाट आम्ही बघत होतो. •••
फायनली प्रवास संपला. आणि आश्चर्य म्हणजे आम्ही सर्व सुखरूप होतो. •••
तेथे पोहोचल्यावर पुन्हा तेच स्वागत, तोच सम्मान. पूर्ण गाव डॉक्टरला बघायला भेटायला आलं होतं. ••••
पण पुन्हा एकदा माझे मन तेथे नव्हतंच. कारण परतीचा तोच प्रवास डोळ्यासमोर हेलकावे घेत होता. •••• असा हा अविस्मरणीय प्रसंग. ••••
घरी आल्यावर जेंव्हा जीवात जीव आला, तेंव्हा मात्र मी येथील लोकल लोकांना एक जोरदार कडक सॅल्युट मारला. हे येथील लोकांचे दैनंदिन जीवन आहे. किती कठीण जीवन.??? ••••
तरीही सरपंचाच्या हिशोबाने * आरामसे पहुंच जायेंगे * । असं तो म्हणाला होता. •••
आज हा प्रसंग म्हणजे, ••• life चे एक Achievement / Adventure वाटतंय. स्वतःचेच कौतुक वाटतंय. ••••
अंदमान च्या posting नंतर १९ दिवस प्रवास करून (त्यात जहाजाचा आठवडयाभराचा waiting period पण आहे) आम्ही पंजाब मधील *बठिंडा * या शहरात पोचलो. पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात नवीन शहरात करणार होतो. •••
तेथे आर्मीच्या पद्धतीप्रमाणे आमचे welcome करायला एक आॅफिसर आला होता. बरोबर चहा पिण्याची व्यवस्था प्लॅटफॉर्मवर होती. आम्हा चौघांना चारी बाजूने बंदूकधारी जवानांनी आमच्या safety करता घेरले होते. त्यावेळी पंजाब मध्ये terrorism peak वर होते … आमच्या लक्षात आलं ••• या स्टेशनवर challenges वेगळेच आहेत. •••• असो,
या जन्मी आर्मी ऑफिसरच्या बायकोची भूमिका केली. पुढच्या जन्मी पण मला हीच भूमिका करायला आवडेल. •••
लग्नाआधीचा तो दिवस आजही मला आठवतो जेंव्हा मी यांना विचारले होते. •••
How much do you earn??
And He said, •••
“Roughly 100 salutes a day and we got married. ”
… माझ्या लग्नात मिळालेला सर्वात मौल्यवान दागिना म्हणजे यांच्या खांद्यावर लागलेले ते तीन स्टार्स होते. ज्यांची प्युरीटी किंवा किंमत आखणारे मशीन कोणत्याही सोनाराजवळ नाही. •••
आजही यांच्या युनिफॉर्मचे खांद्यावरचे ते चमकणारे स्टार्स आठवून मन अभिमानाने भरून येते. •••
जय हिंद ••
© सुश्री संध्या बेडेकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





