सुश्री मीनल केळकर
मनमंजुषेतून
☆ दिव्याची अमावस्या… लेखिका : सुश्री अनुराधा दि. पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
आज दिव्याची अमावस्या म्हणून कालच दिवे घासून चकचकित केले. आज सकाळी दिवे मांडून, सगळे दिवे लावून पूजा केली. फुले लाह्या वाहून झाल्यावर त्यांची शोभा तर अधिकच वाढली. नंतर खीर आणि दिव्यांचा नैवेद्य दाखवला. कहाणी वाचली. मनोमन दिव्याची प्रार्थना केली. मन अगदी प्रसन्न झाले.
… दर वर्षी प्रमाणे सर्व झाले पण आज कहाणी वाचल्यावर माझ्या मनात थोडा वेगळा विचार आला आपल्या पुढच्या पिढीला या कहाणीचे महत्व कळेल का ? त्यांना ती काल्पनिक तर वाटणार नाही ना?
माझ्या मते या कहाणीत समाजात माणसाने कसे असावे हे सांगितले आहे.. म्हणजे बघा हं……
आटपाट नगरचा राजा म्हणजे घरातील कर्ता पुरुष. जो सर्व निर्णय स्वतः घेतो. कहाणीतल्या राजाची बायको चोरून पदार्थ खाते आणि आळ उंदरावर घेते. खरे तर घरात असे वातावरण हवे की कोणीही एकमेकांना न सांगता काही चुकीचे करू नये आणि केलेच तर आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीवर आळ घेऊ नये, त्याला दोषी ठरवू नये. कारण आपण ज्यांना कमी लेखतो त्यांना दुखावले तर त्यांची बुद्धी वाईट विचार करू लागते आणि कहाणीतल्या उंदराप्रमाणे घरात गैरसमज पसरवते. कहाणीतल्या राजाने शहानिशा न करता आपल्या बायकोला घराबाहेर काढले.. तसे आपण करू नये. पूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. कारण सत्य हे कधीही लपत नाही. ज्याप्रमाणे राजाला त्याच्याच घरच्या दिव्याकडून सत्य समजले त्याप्रमाणे एक ना एक दिवस सत्य समजल्याशीवे रहात नाही.
हा विचार दिव्याची पूजा करतांना आवश्यक आहे.
लेखिका : सुश्री अनुराधा दि. पाटील
संग्राहिका – सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





