श्री प्रसाद साळुंखे  

? मनमंजुषेतून ?

☆ “स्वातंत्र्य दिन !” ☆ श्री प्रसाद साळुंखे ☆

चकचकीत ऑफिसात, उंचावरून, मेल येतो.

‘हे साजरं झालंच पाहिजे‘… जिवंत सोहळ्यालाही डेडलाईन..

मग काय.. तयारी सुरू,

जुन्या सजावटीची धूळ झटकते.. कलाकुसरीचे कंदील लागतात.

.. पण नेमकं कितवं वर्ष? .. यावर teams call मध्ये चर्चा होते .. इतर मुद्द्यांसोबत .. नि फायनल होतो बोर्ड.

…. फक्त वर्ष बदलून मेल पडतात .. ‘सगळ्यांनी पारंपरिक वेषात या’ असं फर्मान निघतं .. परंपरा जपणाऱ्याला पारितोषिक असतं. मग तो दिवस उजाडतो….   

दोनेक दिवस आधीच… कारण त्या दिवशी लोणावळा वगैरे जवळच्या जवळ फिरायला सुट्टी असते म्हणे,

पारंपरिक तयारीने लोक gather होतात … झेंडावंदनाचा लॅपटॉप सेट व्हायचा असतो … प्रोजेक्टरही या प्रकाराशी जुळवू पाहतो …. 

…. मग ओपन होऊ लागतं झेंडावंदनाचं  ppt आणि video,

… थंड वातावरणात, मंद आवाजात राष्ट्रगीत घुमतं,

… मानघाले कारकुनी लोंढे अपराधी भावनेने ते पुटपुटल्यासारखं करतात,

… ‘ भारतमातां की ‘ वरच आरोळी विरते..

मग पुन्हा टेबलं सरकतात, केक आणला जातो … जुलै-ऑगस्ट वाल्यांचे (वाढ?) दिवस घालण्यासाठी.

… एका बजेटच्या खड्यात दोन पक्षी.

मग हौजीचा कल्ला होतो .. कधी नव्हे ते नंबर achieve होतात…. सेल्फ्या क्लिकतात .. रिळं बनतात,

 ‘Come on guys’ केकाटत, रॅम्पवॉक नावाचे हास्यास्पद सांस्कृतिक धिंडवडे होतात. 

…. थोडक्यात एक आटोपशीर सेलिब्रेशन होतं. ग्रुप फोटोंच्या प्रूफ सकट, गळ्यात कार्ड घातलेले सेवेसी तत्पर कारकून, पुन्हा लॅपटॉपला जुंपून बसतात…. मग कधीतरी उदार होऊन मालक पुरवतात .. एक थंड समोसा, वेफर्स, जिलबी, सरबत वगैरे … असा कॉर्पोरेटी जंगी बेत असतो.

.. सगळं साजरं केल्याचं एक सामूहिक समाधान (?) लाभतं .

.. बळजबरीचे आयोजक सुस्कारा सोडतात.

 

माझ्या मनात मात्र एका पेढ्याच्या बजेटचं, मराठी शाळेतलं, स्फुरण चढवणारं,

‘बलसागर भारत होवो ‘ .. घुमत राहतं …आठवणींचा झेंडा फडफडतो …

… किती बदलत जाते ना ! सरसर स्वातंत्र्याची परिभाषा? पिढी दर पिढी स्वातंत्र्याची समज, आणि साजरीकरण बदलतं. 

 

हल्ली साजरीकरणाचा समान साचा आहे अगदी, सगळ्याचाच…

.. गणेशोत्सव, दहीहंडी, आंबेडकर जयंती, शिव जयंती,

.. स्पीकर, नाचगाणं, सेल्फ्या, रिल्स, नि खादाडी.

— या उपर कोणाचं कसलंच कर्तव्य लागत नाही स्वातंत्त्र्याप्रती.. 

 

… म्हणून काही साजरं करायचं म्हटलं, की काटाच येतो अंगावर हल्ली !!

…. परत सारं जुनं जुनं व्हावं वाटतं,

…. या नव्या युगात, साधं सोपं घडणं पण कठीण होतंय ना?

 

एक बरं ….. 

सुट्टीनंतरच्या दिवशी साडेनवाच्या ठोक्याला लॉग इन करण्याच्या बोलीवर, आज लवकर निघण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे कळपाला….. 

… काय करावं बरं या स्वातंत्र्याचं ?

© श्री प्रसाद साळुंखे

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9664027127

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted