डॉ. माधुरी जोशी
मनमंजुषेतून
☆ शिकवणारे आम्ही.. शिकलो तिच्याकडे ☆ डॉ. माधुरी जोशी ☆
काल अचानक फोन आला शोभना भिडेचा….आता ती पटवर्धन आहे आणि पंढरपूरला असते.ती माझी कन्याशाळेतली विद्यार्थिनी…. माझ्याकडे काही काळ शिकलेल्या गौरी पाठारेचं पंढरपूरला गाणं झालं…ते रंगलेलं सुंदर गाणं आणि गुरुंच्या नावात माझा उल्लेख ऐकून खूप आनंदाने,प्रेमानं,सुरेल जुन्या बंधानं… आदरानं भारून भिडेनं फोन केला.मला आनंदच झाला…पण तो आनंद शोभना केवळ विद्यार्थिनी होती म्हणून नाही तर तिचा तसा आगळा ठसाच आहे मनावर… खूप खोल…कधी पुसला न जाणारा….कारण ती जे वागली ते थक्क अचंबित करणारं होतं…तिचं अद्भुत धैर्य, कमाल प्रामाणिकपणा,मनाचा समतोल आणि तिनं शाळेसाठी खेचून आणलेलं यश…त्यांची ही गोष्ट….
१९८५….ना.दा.ठाकरसी कन्या शाळा….तिसऱ्या मजल्यावरच्या हॉलमधे आसनं, सूर्यनमस्कार स्पर्धेची जोरदार,शिस्तबद्ध प्रॅक्टिस चाले.माझी मैत्रीण उज्वला बापट अनेक वर्ष जीव तोडून तळमळीनं प्रत्येक मुलीचं प्रत्येक आसन, सूर्य नमस्कार अगदी बिनचूक करून घेत असे… छान झालं की कौतुक करत असे.तिला अनेक वर्षांचा अनुभव, अभ्यास होता.वाटेल तेवढं कष्टायची तयारी होती.तिच्यामुळे शाळा कायम अजिंक्य राहिली.त्यावर्षी पण तेच घडणार होतं.
ती आसनं, नमस्कार कंडक्ट करायला एक लीडर असे.अचूक लयबद्ध ऑर्डर्स देणारी,सावध,कुणी चुकलंच तर पटकन दुरूस्त करणारी,बनलेल्या आकृतीचा बॅलन्स सांभाळणारी….लीडरचा आत्मविश्वास, धीटपणा, समयसूचकता,तत्परता हे गुण महत्वाचे… आणि या सर्व गुणांनी परिपूर्ण होती शोभना भिडे… सुंदर,गोड चेहऱ्याची,नितळ गोरी, निरोगी गुलाबी गालांची,घारे डोळे,लांबसडक केस….नुसतं दिसणं नाही तर अभ्यासातही हुषार अशी शोभना कष्टांनी,जिद्दीनी, प्रामाणिकपणानी आपली जबाबदारी पार पाडत होती.या स्पर्धेत शाळेला आणि उत्तम लीडरला पुरस्कार असे.कन्याशाळा,बापट आणि चषक असं गणितच होतं जणू…
दुसऱ्या दिवशी सकाळी स्पर्धा होती.म्हणजे आजची प्रॅक्टिस अगदी चोख,वेळेत, अचूक व्हायला हवीच होती.नेहमीसारखी शाळा भरली.स्पर्धेच्या मुली प्रॅक्टिससाठी हॉलमधे गेल्या….पण भिडे शाळेत आलीच नाही.खरंतर ती जबाबदारीनं वागणारी शहाणी मुलगी….असं काय हिचं?आजचा सराव तर सगळ्यात महत्वाचा….घड्याळ दुपारकडे सरकलं तरी तिचा पत्ता नाही..बापटचा पारा चढणं स्वाभाविक होतं.काही निरोप नाही…असं कसं वागू शकतात मुली…भिडे शाळेजवळंच रहायची…शेवटी चिडून, वैतागून बापट तिच्या घरी गेली.जेमतेम अर्धा पाऊण तास झाला असेल.बापट शाळेत परत आली…पण तिचा चेहरा पार बदलला होता…हताश,हतबल,दुःखी…..तिनं जे सांगितलं ते ऐकून सगळा स्टाफ गलबलला.बापट भिडेच्या घरी पोहोचताना तिला जरा वेगळी, गंभीर,शांत गर्दी दिसली.मनात अशुभाची पाल चुकचुकली… वाड्याच्या दाराशी तिला कळलं….भिडेची आई गेली होती आणि नेण्याची तयारी अंगणात चालू होती.बापटला हा धक्का होता.तिच्या पायातलं बळंच गेलं.भिडेच्या न येण्याचं इतकं गंभीर कारण मनात येणं अशक्यच होतं….बापट उद्विग्न मनस्थितीत परत आली.
मुली वाट पहात होत्या.कारण स्पर्धा तर होणारच होती.आता काय करायचं? दुसरी लीडर कुठून आणायची? स्पर्धा सोडून देणं एवढाच पर्याय होता.तेवढ्यात एक काळी सावळी स्मार्ट मुलगी टीचर्स रूममध्ये आली.शाळेत एव्हाना मुलींना हे कळलं होतं. बापटला म्हणाली,”बाई,मी रोज प्रॅक्टिस पहायला येते.भिडे कधी,कशा,कोणत्या ऑर्डर्स देते ते मला माहिती आहे.मी करू का लीडरशीप….तुम्ही सांगा ना चुकेल ते…मी लक्षात ठेवीन.” हे सगळं खूप अनपेक्षित, अद्भुत,धिटाईचं आणि जरा धोक्याचच होतं.पण ती म्हणत्येय तर एक प्रॅक्टिस पाहू करून असं बापटनी ठरवलं.हा एकच पर्याय हातात होता….आज नाव आठवतं नाही त्या मुलीचं याची खंत वाटते….पण ती मुलगी कमाल होती.तिनं आत्मविश्वासानं, अचूक ऑर्डर्स दिल्या.अगदी परीक्षकांना देतात तसा सॅल्युट देखील ठोकला.हॉलमधे…सगळं शॉकिंगच होतं..पण उद्याची स्पर्धा पार पडू शकणार होती.मुलींना धीर आला.परीक्षकांना हे गंभीर कारण सांगून लीडर बदलायला परवानगी मागायची असं ठरलं…. यशाची मात्र साशंकता होती कारण शाळेत प्रॅक्टिस झाली तरी प्रत्यक्ष मैदानावर काय होईल याचा अंदाज बांधणं अवघड होतं.
स्पर्धा सकाळी होती.रिझल्टही लगेच लागत असे.नेहमीसारखी शाळा भरली.सगळ्यांच्या मनात स्पर्धेचेच विचार होते.तेव्हा मोबाईल वगैरे नव्हतेच….मुली परत आल्याशिवाय काही कळणार नव्हतं…. उत्सुकता शिगेला पोहोचली होती.शाळा भरून तासभर झाला.आणि आनंदानें ओरडत,आरोळ्या देत जल्लोष करत मुली आल्या आणि यशाची बातमी आपोआप दरवळली.शाळेचा पहिला नंबर आला होता आणि बेस्ट लीडरचं पारितोषिक पण मिळवलं पोरींनी….त्या नव्या लीडरचं कौतुक करायला शिक्षक व्हरांड्यात आले….. आणि त्या टीम पुढे होती शोभना भिडे….सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण बेस्ट लीडरचं बक्षिस भिडेला मिळालं होतं.हे कसं झालं?…
झालं होतं असं की आईचा अंत्यसंस्कार करून सारे घरी आले.कुणी दिलेलं भात पिठलं खाऊन सारे आपापल्या घरी गेले.संध्याकाळ अधिकच भयाण झाली.तेंव्हा भिडे भावाशी बोलली..,” दादा आई तर गेली.ती परत येणार नाही कधीच….पण मी उद्याच्या स्पर्धेची जबाबदारी टाळलेली तिला स्वर्गात ही आवडणार नाही.मी जाऊ का सकाळी….माझ्यावर मुली,बापट बाईंच्या आशा आहेत.कोण करील रे लीडरशीप एका दिवसात?” भाऊ पण तिचाच…तिच्यासारखा….घरात सगळं बोलला आणि रात्री दोघं बापट बाईंच्या घरी गेले…बापट चिंतेनं, मनाशी निराश झालेली,थकलेली होती.इतक्या रात्री दार वाजल्यानं वैतागानं तिनं दार उघडलं…दारात भिडेला पाहून ती स्तब्ध झाली.थक्क झाली.भिडेच्या मनातलं भाऊ बोलला.त्या लहानशा,शाळकरी, आई गमावलेल्या मुलीचं बोलणं ऐकून तिनं भिडेला मिठीतच घेतलं.तिच्या या भूमिकेचं अफाट कौतुक वाटलं तिला.भिडे आणि बापट मायलेकी झाल्या…..
आणि खरंच तो इस्त्रीचा युनिफॉर्म घालून ती शाळेत सकाळी हजर झाली.शांतपणे, जबाबदारीनं,भान ठेवून तिनं लीडरशीप केली.जणू काही काल तिच्या आयुष्यात एवढी मोठी उलथापालथ झालीच नव्हती.सादरीकरण झालं आणि ती बापटांच्या कुशीत शिरून ढसढसा रंगली.इतका वेळ कोंडलेलं दुःख बांध फोडून अक्षरशः बाहेर फुटलं.एका शाळकरी मुलीनं कसं निभावलं एवढं मोठं दु:ख!!!! सारेच थक्क झालो…..
तिच्या आईला मी काही वेळा भेटले होते.मी संगीत शिक्षिका… आणि भिडे सुंदर गातंही असे…त्या स्पर्धा,कार्यक्रम संदर्भात भेटलो होतो असं स्मरतं.एक अत्यंत साधी, खूप न शिकलेली,घरातल्या कामात,मुलांचं करण्यात,कुटुंबाच्या जबाबदारीत बुडालेली, मोजक्या आर्थिक गणितात टुकीनं, निगुतीनं संसार करणारी…एक साधी गृहिणी…
पण तिनं मुलांना किती छान वाढवलं.कसलाही आव न आणता किती देखणे संस्कार केले.आपलं काम चोख करा.जबाबदारी टाळू नका.खूप शिका…प्रामाणिक कष्ट करा….हेच तर संस्कार सहज जातांना आपल्या मुलांना दिले.अगदी नकळतपणे….ही मुलं पण भारी..अगदी सारी शिकवण जपणारी.. अंमलात आणणारी..खरंच गुणी मुलं….
आज ४० वर्ष व्हायला आली..तो प्रसंग,ती घटना आणि भिडेचं धैर्य, कूलनेस प्रचंड थक्क करतं.कठीण प्रसंगात आठवतं.शिकणारी नकळत शिकवणारी झाली आणि हो…त्या ऐनवेळी उभ्या राहिलेल्या लीडरचं पण मनापासून कौतुक….
खरं तर आम्ही त्यांचे शिक्षक… त्यांना शिकवणारे…पण या प्रसंगातून आम्ही पण खूप काही शिकलो असंच वाटतं मला…..
© डॉ.माधुरी जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




