सुश्री नीला महाबळ गोडबोले
☆ अंधेराची खोली… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆
सतत रिमझिमणारा पाऊस नि काळंभोर आभाळ..चराचराला अंधारून टाकणारं..
त्यातलाच थोडा अंधार मनातही शिरतो नि वर्तमानातून थेट भूतकाळात नेतो…
.. पंधरा-वीस कुटुंबियांना सामावणारं आमचं भलंमोठ्ठं घर..किंवा वाडा..जुन्या पद्धतीचा..
अंगण,ओसरी,सोपा,माजघर,स्वयंपाकघर,पडवी.. माडी..
माडीतल्या अनेक खोल्या…
.. दिंडी दरवाजाला पोटाशी धरत आगतांच्या स्वागताला सज्ज असलेलं भलं थोरलं प्रवेशद्वार…
प्रशस्त अंगण..
.. सारा भोवताल देखणा नि सुगंधित करणारी अंगणातली सोनचाफा,तगर,पेरू सारखी वृक्षवल्ली..
.. स्वत: कुरकुरत… बसलेल्याला मात्रं झुलवत स्वप्नांच्या राज्यात नेणारा शिसवीचा लालसर काळा.. राजेशाही झोपाळा…
.. समईच्या मंद प्रकाशात दिव्यत्त्वाचं दर्शन घडवणारं सुरेखसं देवघर…
असे कितीतरी अलंकार अंगावर मिरवणारं आमचं घर…
पण तरीही मला मात्रं आकर्षण वाटायचं ते.. “अंधेराच्या खोली ” चं…!!
माजघराला लागून घराच्या उत्तरेच्या टोकाला असलेली ही खोली…
तसं पाहिलं तर घरात असणारी तरीही सा-या घरापासून वेगळी…
” रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा “
अशी….
फारतर बारा बाय तेरा फुटाची ही काळोखी खोली….
इथे प्रकाश यायचाच नाही म्हणून हिला असं नाव पडलं होतं की तिनं असच असावं म्हणून मुद्दाम हिला असच बांधलं गेलं.. ते माहीत नाही..
पण जसं मला कळायला लागलं तशी ही “अंधेराची खोली ” च..!!
या खोलीवर नेहमी मोठसं कुलूप मिरवत असायचं..
इथे सहजी कुणाला प्रवेश नसे..
” शशी, साखर काढ गं जरा अंधेराच्या खोलीतून..”..थोरल्या काकुच्या सांगण्यावरून आई अंधेराच्या खोलीत जायची नि तिच्यामागून मीही…
…… खोलीत शिरताना पोटात गोळा यायचा..
याचं कारण आईची लाडकी ” हट्टी पुंडुची गोष्ट “…
आम्हा भावंडापैकी कुणी हट्ट केला की ही गोष्ट ठरलेली..
– – पुंडु नावाचा हट्टी मुलगा एकदा त्याच्या वाढदिवसादिवशी हट्ट करतो.म्हणून त्याचे बाबा त्याला ” अंधेराच्या खोलीत” ठेवतात. त्या खोलीत विंचू,झुरळ असे प्राणी असतात.. त्यातला एक विंचू त्याला चावतो…
पुढची गोष्ट आम्ही आईला बिलगून ऐकायचो..
या गोष्टीनं हट्ट करायचा नाही हे आमच्या बालमनावर जितकं बिंबवलं त्यापेक्षा अंधाराची खोली भयानक असते,हे काळजात जास्त रुतून बसलं.
– – म्हणूनच एका बाजुला या बंद खोलीची उत्सुकता नि दुसरीकडे भीती वाटायची..
आईचा पदर धरून या खोलीत शिरलं की भस्सकन थंडावा नि मिट्ट काळोख अंगावर यायचा..
एखादा उंदीर नाहीतर पाल पत्र्यांच्या डब्यातून वाट काढत खडखडत पळत जायची.
नि मी अजुनच आईला बिलगायची..
आईनं लावलेल्या मंदशा दिव्यानं खोलीचं अंतरंग उजळायचं..
भिंतीशी टेकून असलेलं भलंमोठं शेल्फ..त्यात ओळीनं लावलेले मोठमोठे डबे..पिपं,बरण्या..रोज न लागणारी जास्तीची भांडी…
वाणसामान,तेल,लोणची,वाळवणं..कांदे,बटाटे…समस्त संसार अवतरलेला..
शेजारी मोठ्ठं लोखंडी कपाट..
यात पलंगपोस,चादरी नि दागिने-पैशाचा मुद्देमाल असावा..
त्या कपाटाला लागून गाद्या नि उशांचा ढीग..
समोरच्या भिंतीशेजारी एक लोखंडी खाट…
भिंतीवर अनेक खुंट्या नि कोनाडे…
नि एकुलती एक खिडकी..फक्त हवेला आत सोडणारी नि प्रकाशाला अडवणारी..
आईचं साखर काढणं आणि माझं खोली डोळ्यात साठवणं एकाच वेळी संपायचं नि आमची दुक्कल खोलीबाहेर पडायची..
दिवसभर मला उगीचच ” ऍडव्हेंचर ” केल्यासारखं वाटत रहायचं..
…. अशी ही अंधेराची खोली…
या अंधेराच्या खोलीनं तिन्ही जावांना त्यांच्या मासिकधर्मात दरमहिन्याला त्यांचं माहेरपण केलं.
खोलीत येणारी आयती चहा-कॉफी,जेवणाचं ताट..दुपारच्या वेळेत रंगलेल्या तिन्ही जावांच्या गप्पा, हास्यविनोद,सुख-दु:खांची देवाण-घेवाण या खोलीनं अनुभवली..
तीन दिवस का होईना शरीराबरोबरच मनालाही आराम देण्याचं काम या अंधाराने केलं..
बाबा-काकांची कुटुंबाविषयी-धंद्याविषयीची महत्त्वाची बोलणी याच खोलीनं ऐकली..
बायकामुलांना कोणत्याही चिंतेची,काळजीची झळ लागू नये म्हणून…!!
उन्हाळ्याच्या दोन महिन्यात गावठी,पायरी,हापूसच्या करंड्यांनी,पेट्यांनी इथच ठाण मांडलं नि हिला आंब्याच्या वासानं भणाणून सोडलं.
लग्न-कार्यात हीच अंधेराची खोली लग्नाच्या तयारीनं,फराळाच्या लाडु-चिवड्यानं भरून गेली..
पाहुण्या म्हणून आलेल्या सुना-लेकींनी इथंच हसत-खिदळत अंधाराच्या मदतीनं साड्या नेसल्या..
लग्नात आलेल्या आहेराच्या वस्तुही इथंच विसावल्या..
नि आम्ही भावंडे त्या वस्तू फोडून त्यावर कॉमेंट करत इथेच पोट धरून हसलो..तेंव्हा नेहमी गंभीर असणारी ही अंधेराची खोली आमच्याबरोबर पोर बनून खिदळली..
आम्हा पोरांचे लपंडाव इथे रंगले..या खोलीनं तिच्या आधाराला गेलेल्याला कधी कुणाच्या नजरेस पडू दिलं नाही..
परीक्षेत कमी मार्क पडल्यावर किंवा एखादी स्पर्धा हरल्यावर काळोखभरल्या मनानं आम्ही भावंडे हिच्याच आस-याला गेलो..
तिनं आमच्या दु:खाला मनसोक्त वाहू दिलं..
अस्वस्थ मनाला शांतवलं..
नि
गमावलेल्या स्वप्नांना पुन्हा पंख देत जगाच्या उजेडात मायेनं पाठवणी केली..
आमच्या थोरल्या बहीणीनं म्हणजे आक्कानं तिच्या पहिल्या लेकराला जन्म दिला..
नि हॉस्पिटलमधून त्या माय-लेकरांची रवानगी थेट या अंधेराच्या खोलीत झाली.
बाज, पाळणा, शेक-शेगडी,वेखंड,गुटी,बाळाची पावडर,धूप या बाललेण्यांनी कधी नव्हे ती अंधेराची खोली गंधधुंद होऊन गेली..
नऊ महिने गर्भ पोकळीत विसावलेल्या त्या बालजिवाला अंधेराची खोली काही वेगळी वाटली नसावी.म्हणूनच तो चिमुकला जीव न रडता शांतपणानं झोपून रहायचा..जणू भोवतालच्या काळोखाला अफाट विश्वाची पोकळी समजून…!!
आणि अंकुराला जन्म देऊन थकलेली त्याची माऊलीही आपल्या चिमुकल्याच्या भविष्याची स्वप्ने पहात त्या खोलीत निश्चिंतपणे विसावलेली असायची!
आयुष्याचा नुकताच श्रीगणेशा केलेला तो इवलासा जीव,त्याच्या बाललीला, पिल्लाला छातीशी धरून त्याला आयुष्यभराचा अमृताचा ठेवा पाजणारी त्याची जन्मदात्री..
आणि या सोहळ्याला कुणाची नजर लागू नये म्हणून..काळोखाचा पहारा देत असलेली ती अंधेराची खोली…!!
काळाबरोबर दिवस बदलले..
एका घराची तीन घरे झाली..
आमचं ते घरही वयोवृद्ध झालं..
त्याला तिथच सोडून सारी पाखरं उडून गेली..
प्रत्येकानं आपलं नवीन घरटं बांधलं..नवीनसं..सुंदरसं..!!
जुनं घरटं आहे तिथंच आहे..
कुणीतरी येण्याची वाट पहात..
जुन्या आठवणी काढत..
अंधेराची खोली अजूनच म्हातारी झालीय..
तिच्या उरातला काळोख तिला सोसेनासा झाला की ती गतस्मृतीत रमते..
तिच्या कुशीत लपलेल्या आम्हा पोरांना आठवते..
आमच्या आया-काकवांच्या गप्पा,सासुबाईं-नणंदबाईंच्या कागाळ्या आठवून खुदकन् हसते.
बाबा-काकांच्या गंभीर चर्चांच्या स्मृतीने स्वत:ही गंभीर होते..
नि आक्काच्या लेकराचं रडणं स्मरून तिलाही पान्हा फुटतो..
…… आमच्या कुटुंबाची कितीतरी चांगली,वाईट,हळवी,गुलाबी गुपितं उराशी जपत ती आजही उभी आहे!
.. संधीकाळाचा जिवाला घोर लावणारा क्षण असतो किंवा उदास सूर छेडणारा एखादा पावसाळ्यातला दिवस असतो..
.. नव-याबरोबर भांडण झालेलं असतं..
.. नाहीतर पराभवाच्या सावटानं मनाला पोखरलेलं असतं…
– – अशा हळव्या क्षणी ती अंधेराची खोली डोळ्यासमोर येते.. मनावर फुंकर घालते नि वाटतं…
– – – घर कसंही असो..
नवीन..जुनं – लहान- मोठ्ठं – स्वस्त-महाग – साधसं नाहीतर अलिशान
.. पण प्रत्येक घरात एक अंधाराची खोली हवीच…
…. जगाच्या फसव्या झगमगाटाचा कंटाळा आला की कवेत घेणारी…
…. उदासीनतेच्या क्षणी आसरा देऊन अश्रूंना मोकळेपणाने वाहू देणारी..
…. घरात राहूनही एकटेपणा बहाल करणारी..
…. काळीज आक्रसलं की तिचा नि काळजातल्या काळोखाचा संगम घडवून विश्वात्मक करणारी..
…. नि काळजातला अंधार स्वत:कडे खेचून बाहेर पडताना लख्ख प्रकाशाचे,आत्मज्ञानाचे नि आत्मविश्वासाचे दान देणारी… ज्ञानेश्वरांच्या झोपडीसारखी..
आणि……
…. सा-या जगाने अपमानित केल्यावरही स्वत:च्या मिठीत घेऊन अंधारातसुद्धा शतसूर्यांच्या लखलखीत प्रकाशाने उजळून टाकून अख्ख्या विश्वाच्या कल्याणाच्या मागणीला…
पसायदानाला……
मुखातून जन्माला घालणारी…
…… एक अंधेराची खोली..
© सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
फोन नं. 9820206306, ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





