सुश्री तृप्ती कुलकर्णी
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ कादंबरी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
काही काही साहित्य प्रकारांशी आपली एक वेगळीच नाळ जुळलेली असते. आता कादंबरी या साहित्यप्रकारचं नाव काढलं रे काढलं की मला आठवतात नववी दहावीतल्या मे महिन्यातल्या सुट्टीचे दिवस. मोठी सुट्टी आणि अभ्यासाव्यतिरिक्त फार काही करता येण्याचं ते वर्ष नसल्यामुळे थोड्याशा रिकाम्या वेळात काय करायचं तर पुस्तक वाचायचं. कारण टीव्ही तर आमच्याकडे मी अकरावीत जाईपर्यंत नव्हताच, त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. मग आम्ही दिवसा अभ्यास करून दुपारनंतरच्या वेळात मात्र पूर्णपणे पुस्तक वाचण्यात घालवायचो. आजही मला त्या आठवणी खूप आनंद देतात. साधारणतः साडेचार-पाचच्या सुमारास सगळं आटपून, कार्ड पुस्तक असं सगळं घेऊन आम्ही आमच्या जवळ असलेल्या पॉप्युलर लायब्ररीमध्ये जायचो.
आजही मला ती लायब्ररी जशीच्या तशी स्पष्ट आठवते. याचं कारण म्हणजे अनेक प्रकारच्या कादंबऱ्या, कथा आणि इतर पुस्तकही पहिल्यांदा माझ्या वाचनात आली ती त्या लायब्ररीमुळे. ती लायब्ररी चालवायचा एक कॉमर्सचा कॉलेजमधला मुलगा. एका छानशा दुकानवजा जागेत त्यांनी आपली लायब्ररी नीट मांडली होती. त्या दादाचं नाव आता आठवत नाही परंतु खरंच वाचनाची अतिशय आवड असलेला आणि सभ्य म्हणावा असाच तो मुलगा होता. आम्ही लहानपणापासून त्याच्याकडे जात असायचो. पण कधीही वागण्या-बोलण्यात खोट जाणवली नाही. व्यवस्थित पुस्तक मांडून द्यायचा. नवीन पुस्तकं कुठली आली ते सांगायचा. हे वाचा, हे वाचू नका असा सल्लाही द्यायचा. आणि आम्ही सगळी लहान मुलं ते ऐकायचो. अगदी मोठी माणसंही त्याला विचारायचे की काय रे ही कादंबरी कशी आहे? हे पुस्तक कसंय? कारण त्या मुलाला वाचनाची फार आवड होती. त्यामुळे बहुतांश पुस्तक त्यांनी वाचलेली असायची. त्याकाळी आम्हाला त्याचे याबाबतीत भयंकर कौतुक वाटायचं. दादाची सगळी पुस्तकं वाचून झालेली असतात. मोठं झाल्यावर त्या दादासारखं आपणसुद्धा भरपूर पुस्तक वाचायचं असं आमच्या मनात यायचं.
तर तो दादासुद्धा प्रयोगशील होता. उत्साही होता. एखादा नवीन कथासंग्रह, कादंबरी व कुठलेही पुस्तक येणार असेल तर तो आपल्या साध्या पुठ्ठ्यावरती स्केचपेनने मोठ्या पण सुवाच्च्य अक्षरात त्याची आगाऊ सूचना लिहायचा. आणि ती लिहितानासुद्धा त्याची क्रिएटिव्हिटी झळकत होती. अर्थात तेव्हा आम्हाला क्रिएटिव्हिटी वगैरे काही कळत नव्हतं. परंतु तो काहीतरी गमतीशीर पद्धतीने लिहितो याची नोंद मात्र घेतली जायची.
उदाहरणार्थ सुहास शिरवाळकर हे त्याकाळी अनेक तरुणांचे दिल की धडकन म्हणावे असे आवडते लेखक होते. तर हा त्यांची पुस्तकं येणार असेल तर सु.शि. उद्या चार नंतर असं पुठ्ठ्यावर लिहून टाकायचा. याचा अर्थ सुहास शिरवळकर यांचं नवीन पुस्तक उद्या चार नंतर वाचकांसाठी उपलब्ध असणार आहे. मग सगळेजण नंबर प्रमाणे आपला क्लेम लावून ठेवायचे. त्या काळामध्ये नवीन पुस्तकाची जी क्रेझ होती जी मी माझ्या डोळ्यांनी पाहिली तशी आज कुठेही पाहायला मिळणार नाही. लोक अक्षरशः चार वाजता त्याची लायब्ररी उघडण्याची वेळ होण्याआधीच जाऊन रांगेत उभे राहायचे. आणि आपण पहिला क्लेम लावला असेल तर ते नवकोरं पुस्तक हातात घेऊन त्याचा वास घ्यायचे. आणि मग घेऊन जायचे. त्यावेळेला तो अगदी नेहमीप्रमाणे सगळ्या सूचना न कंटाळता पुन्हा रिपीट करायचा. काका नवी प्रत आहे. त्याला तेला-तुपाचे, चहा-पाण्याचे कसलेही डाग नकोत. जशी कॉपी स्वच्छ कोरी नेत आहात तशीच कोरी आणून द्या. नाहीतर दंड पडेल. आणि मग समोरचा माणूसही उत्साहाने हो हो नक्कीच असं म्हणून ती प्रत व्यवस्थित सांभाळून घेऊन जायचा. आणि सांभाळून आणूनही द्यायचा. क्लेम वरून कितीतरी वेळा भांडणंसुद्धा व्हायची की एकाच दिवशी दोघेजण क्लेम लावायचे. मग त्यावेळेला तो निर्णय घ्यायचा की ज्यांनी क्लेम आधी लावलाय त्याची वेळ बघायचा. त्या लायब्ररी कार्डवर वेळपण लिहिलेली असायची. आणि मग ज्याची आधीची वेळ आहे त्याला अर्थात दिलं जायचं. वाचनावरून आवडत्या लेखकाच्या पुस्तकावरून पुष्कळ वाद निर्माण व्हायचे. पण तो कायम हसतमुखाने काका, काकू ताई, माई, दादा असं प्रेमाने बोलून सगळ्यांचं समाधान करायचा. बहुतेक जण त्याच्या बोलण्यावरच खुश असायचे.
माझी वाचण्याची आवड लक्षात घेऊन तो मला सांगायचा की हे वाच, ते वाच आणि मी आईला विचारून ते वाचायचे. कारण आपण काय वाचतोय हे घरी कळणं आवश्यकच होतं, तसा दंडक होता. त्यावेळेस मी पुष्कळ कादंबऱ्या वाचल्या पण अर्थात त्या सगळ्या आपल्या नेहमीच्या पठडीतल्या ऐतिहासिक स्वरूपाच्या होत्या. ऐतिहासिक व्यतिरिक्त पहिल्यांदाच काहीतरी वेगळं वाचण्याचा योग आला तो सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीमुळेच. म्हणजे मला एक वेगळीच कादंबरी हवी होती मला आता नक्की कोणाची हवी होती ती आठवत नाहीये. पण ती आली नव्हती अजून वाचायची राहिली होती म्हणून त्यांनी पुन्हा तीच कादंबरी परत नेली होती. मग आता माझं आधीचं वाचून झालं होतं काय वाचावं? तेव्हा दादा मला म्हणाला की सु.शिं.ची वाच ना. बघ आता जस्ट येऊन गेली आहे आणि लकीली यावेळेस कोणाचा क्लेम नाहीये तर वाचून बघ कसं वाटतंय. मी पुस्तक हातात घेतलं पण ऐतिहासिक आणि थोडसं काहीतरी प्रेरणादायक असं वाचण्याची सवय असणाऱ्याला एकदम सुहास शिरवळकर हातात घेऊन वाचावं असं कसं वाटेल? तरी पण उत्सुकता मात्र होती की इतके सगळेजण त्यांच्याबद्दल बोलतात तर एकदा वाचायला हरकत नाही आणि मग मी ती घेतली. तेव्हा सुहास शिरवळकर कळण्याचं तितकं वय नव्हतं पण तरीसुद्धा ती घेतली. कारण त्यावेळेस त्याची इतकी चर्चा असायची म्हणजे अगदी असे संवाद घडायचे, “काय तू सुशिंचं हे वाचलं नाहीस?? व्यर्थ आहे तुझं जीवन गड्या!” त्यामुळे आपणसुद्धा एकदा वाचलं पाहिजे असं वाटून मी लागोपाठ दोन कादंबऱ्या वाचल्या. त्यातली पहिली अर्थातच बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध ‘ दुनियादारी ‘ आणि दुसरी होती ‘ हृदयस्पर्श..’.
…. जेव्हा मी या कादंबऱ्या वाचायला घेतल्या त्या वेळेला कादंबरी लेखनामध्ये काय प्रचंड ताकद असू शकते आणि लोक सु.शि. सु.शि म्हणून का वेडं होतात हे मला पहिल्यांदा कळलं. त्या कादंबरी नंतर मी सुहास शिरवळकर यांची फॅन झाले. मात्र वाचन झालं नाही कारण नंतर दहावी मग परीक्षा आणि मग पुढे कॉलेज त्यानंतर तर वेगळ्याच प्रकारचे लेखन वाचायला लागले. वैचारिक आणि अभ्यासाच्या दृष्टीने संदर्भ देणाऱ्या लेखनावर माझा भर होता. परंतु त्या कादंबरीने आजही माझ्या मनात एक घर केलेलं आहे. निवांतपणे सुट्टीत बसून दोन दिवसात कादंबरीचा फडशा पाडून झाला होता. त्यावेळेला फक्त वाचण्याची आवड होती. लेखन फारसं आवडत नव्हतं, त्यामुळे तिच्याबद्दल फार काही लिहिलं गेलं नाही. मात्र तिच्या मधल्या ज्या शेरोशायरी होत्या त्या मी एका वहीमध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्यामुळे नंतर कितीतरी दिवस ते पुस्तक परत केल्यावर त्या ओळींवरनं मी हात फिरवायचे. फार सुंदर कादंबरी आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचली असेल.
त्यानंतर पुष्कळ वाचन घडत गेलं व मध्ये अनेक वर्ष वाचनाचा संपर्क पूर्णपणे तुटला. म्हणजे अगदी शून्यच होता. आणि आता पुन्हा सुरू झाला. पण आजही कादंबरी म्हणलं की मला सर्वात प्रथम “हृदयस्पर्शी “आठवते …. का कोण जाणे…
© तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





