श्री मेघःशाम सोनवणे
☆ माझा शिक्षणप्रवास… ☆ श्री मेघःशाम सोनवणे ☆
आमच्या काळात शाळा सुरू व्हायची तीच पहिल्या इयत्तेपासून. प्राथमिक शाळा म्हणायचे त्याला. पहिली ते चौथी शुद्ध मराठी माध्यम (मेडियम). मराठीचा पाया, गणिताचे पाढे पक्के व्हायचे ते येथेच. ‘ए बी सी डी’ ची ओळख पाचवी नंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक (हायस्कूल) शाळेत गेल्यावरच व्हायची. तोपर्यंत मातृभाषा मराठी बऱ्यापैकी अंगवळणी पडलेली असायची व इंग्रजी आणि हिंदी फक्त एका विषयापर्यंत मर्यादित होती, ती ही इतर व्यवहारीक भाषा विद्यार्थ्यांना माहित व्हावी यासाठी. बाकी गणित, इतिहास, भुगोल, समाजशास्त्र, सर्व मराठी, मातृभाषेत असल्याने लवकर उमजत असे व पाया ही पक्का होत असे. यात शिक्षकांचा मोठा वाटा होता. शिकवण्यांचा सुकाळ ही तेव्हा आलेला नव्हता.
नंतर बालवाड्या आल्या. नंतर ज्युनिअर के जी, सिनियर के जी, आणि आता तर प्री नर्सरी, अंगणवाड्या… काही येत नसलं तरी कोट (ब्लेझर), टाय घालून शाळेच्या पिवळ्या रंगाच्या गाडीतून किंवा पालकांच्या गाडीतून रुबाबात शाळेत जाणारी मुलं भावी स्पर्धेत स्पर्धक होणार आहेत हे पाहून वाईट वाटतं. त्यांच्या फी भरण्यासाठी बहुतांश पालकांचं कंबरडं मोडतं.
आम्हाला तर पहिली दूसरी पर्यंत नाक ही पूसता येत नव्हतं. कोपरापासून मनगटापर्यंत (हे अवयव मोठं झाल्यावर समजले) नाकातून पाझरलेला द्रव वाळून कोरडा झालेला असायचा आणि त्याचे कुणाला वावगं ही वाटतं नसे. बहुतेकांच्या फाटक्या चड्डी (खाकी पॅन्ट) ला ठिगळंच असायचं, ते ही गोधडी शिवायच्या दोऱ्याने शिवलेले, त्यामुळे लांबूनच उठून दिसणारं, पण तरीही फाटकी चड्डी घातली नाही याचं समाधान असायचं.
आठवडाभर तोच पांढरा शर्ट आणि तीच खाकी पॅन्ट. फक्त रविवारीच ते धुतले जायचे. वर्षभर एकच जोडी. कधीकधी पुढच्या वर्षीही चालून जाईल म्हणून वाढत्या अंगाची (मापापेक्षा मोठी) घेतलेली. आता ढगळ वाटत असली तरी नवी असल्याचा आनंद आकाश ठेंगणे करून जायचा.
पायतान (चप्पल) हा प्रकार उभ्या गावातल्या मुलांना माहीतच नसायचा. कितीही लांब शाळा असू देत, पायपीट ही एकमेकांच्या साथीनं सहज शक्य व्हायची. शाळेची पुस्तकं म्हणजे घरातल्या आपल्यापेक्षा मोठ्या भाऊ किंवा बहिणीची वापरलेलीच आणि घरात तसं कुणी नसेल तर शाळेचं वर्ष संपण्याआधीच आपल्या पुढच्या वर्गातील मुलांच्या घरच्यांना सांगून निम्म्या किंमतीत ती पुस्तकं विकत व त्यातही घासाघीस करून घेतली जायची. तेव्हा आल्यासारखा सारखा सारखा अभ्यासक्रम (सिलॅबस) बदलायचा नाही त्यामुळे ही पुस्तके वर्षोनुवर्षे चालून जायची. यंदाच्या वह्यांतील उरलेली कोरी पानं काढून ती घरीच एकत्र शिवून नव्या वह्या तयार करून त्या वापरल्या जायच्या. कसणी असलेल्या पिशवीत वह्या पुस्तकं कोंबली की सूबाल्या करत पळत जातांना वाटेत काटे, दगड रुतायची केव्हा ते समजायचंही नाही.
अकरावी उच्च माध्यमिक ला कालीजात (काॅलेज) गेल्यावर पहिलं पायतान (चप्पल) घालायला मिळाली ती स्लिपर. काॅलेज ला गणवेश नसल्याने कुठलाही रंगाचे कपडे परिधान करू शकत होतो. माझे काका एस टी मध्ये वाहतूक नियंत्रक (कंट्रोलर) होते. त्यांना गणवेशासाठी खाकी कापड मिळायचे. ते शिल्लक रहात होते. त्याचे दोन शर्ट दोन पॅन्ट शिवून ते वर्षभर वापरले.
काॅलेज साठी मामाच्या गावाला राहून तेथून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात काॅलेज ला प्रवेश घेतला. घरच्यांच्या सांगण्यावरून विज्ञान (सायन्स) शाखेत प्रवेश घेतला पण मोठे नामांकित काॅलेज असल्याने तेथे मराठी विषय सोडून सर्व विषय हायफाय इंग्रजी मध्ये शिकवले जात असत. आधीचं शिक्षण ग्रामीण भागात मराठी माध्यमातून झाल्याने हे इंग्रजी डोक्यावरून जात होते.
वर्षाच्या शेवटी परिक्षा काळात फक्त पंधरा दिवस काॅलेज राहिले होते व पंधरा दिवसांसाठी एस टी चा मासीक पास मिळत नव्हता म्हणून शेवटचे पंधरा दिवस दररोज पंधरा किलोमीटर सायकलवर येणे व जाणे केले.
परिक्षा संपली व परिक्षेचा आणि माझाही निकाल लागला. तीन विषय काठावर त्यात दोन विषयांना गुण वाढवून देण्यात येऊन (ग्रेस मार्क) पास झालो. येथे आपली डाळ काही शिजणार नाही हे लक्षात आल्याने बारावी ला गावच्या काॅलेजात प्रवेश घेतला पण नुकतीच घराची वाटणी झाल्याने घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणात वेळ घालवण्यापेक्षा एखादी नोकरी शोधावी असा विचार केला.
शिक्षण फक्त अकरावी असल्याने सैन्यात जावे असा विचार केला व बारावी मध्येच सोडून सैन्य भरतीसाठी परिक्षा दिल्या आणि तिसऱ्या प्रयत्नात वयाच्या सतराव्या वर्षी हवाई दल (एअर फोर्स) मध्ये भरती झालो. त्यानंतर बाहेरून बारावी ची परिक्षा दिली व उत्तीर्ण होऊन पदवी साठी कला (आर्टस्) शाखेत प्रवेश घेतला.
त्यावेळी सहामाही (सेमिस्टर) पद्धत होती व दर सहा महिन्यांनी सुट्टी घेवून परिक्षेला यावे लागत असे. कला शाखेत वेगवेगळे विषय असल्याने प्रत्येक पेपरमध्ये खूप गॅप असायची. तेवढी सुट्टी मिळत नसे त्यामुळे काही विषय बाकी रहात असत. त्या विषयांचे पेपर पुढच्या सेमिस्टर सोबत देता येत असत. तेव्हाही काही विषय शिल्लक रहात. असे करत शेवटच्या सेमिस्टर ला पंधरा विषयांचे पेपर मला द्यावे लागले. त्यासाठी सकाळी आठ ते दहा पहिल्या वर्षाचे, बारा ते दोन दूसऱ्या व तीन ते पाच तिसऱ्या वर्षाचे पेपर असत. असे सुट्टीवर असूनही दिवसभर काॅलेज वरच रहावे लागायचे. अशा त-हेने एकदाची पदवी पदरात पडली.
यापुढे आताच्या शिक्षणाविषयी काय लिहावे. आताच्या पहिलीच्या पहिल्या वर्षाच्या इतकी फी ही न लागता आमचं पहिली ते पदवी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण पार पडलं आणि आमचं कुठंही घोडं अडलं नाही, मग आताच शिक्षणाचा एवढा बाऊ का केला जातो. मातृभाषेतून शिक्षण घेतले तर ते लवकर आत्मसात होते पण इंग्रजी भाषेला अवाजवी महत्त्व दिले गेल्याने सर्व गोंधळ झाला आहे. त्यात व्यावसायिक स्वरुपाच्या खाजगी शाळांचे पेव सुटल्याने परिस्थिती अजूनच अवघड झाली आहे.
हे स्पर्धेचे युग आहे हे मान्य आहे पण स्पर्धा ही स्वस्थ असावी, जीवघेणी नसावी. आणि यशस्वी होण्यासाठी भरपूर शिक्षणच पदरी असलं पाहिजे असे नाही, हे बऱ्याच उदाहरणांनी सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले गेले तर त्यात पारंगत होऊन हमखास यश मिळू शकते.
या विषयावर लिहिण्यासारखे भरपूर आहे व बहुतेकांना याविषयी माहीत ही आहे त्यामुळे जास्त ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत न पडता लेखणीला विराम देतो व सर्वांना सुयश प्राप्त होवो ही सदिच्छा व्यक्त करतो.
© श्री मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





