श्री सुधीर करंदीकर
☆ “जर्मनीमधल्या कार्लशी गप्पा…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
मी लिहिलेल्या “म्हैस” या पुस्तकाची जाहिरातबाजी करताना छान गमती जमती होत आहेत. फेसबुक वर, वॉट्सअपच्या निरनिराळ्या ग्रुपवर कळवल्यामुळे ॲमेझॉन कडून पुस्तक घेतल्याचे बऱ्याच जणांचे फोन/मेसेज आले. अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये पण तिथल्या ॲमेझॉन कडून लोकांना म्हैस पुस्तक मिळाल्याचे समजले. विचार केला जर्मनी मध्ये कोणी ओळखीचे आहे का ते बघावं, म्हणजे त्यांना पण पुस्तकाबद्दल सांगता येईल, आणि जर्मनीत थोडी पब्लिसिटी होईल. पण पटकन डोळ्यासमोर ओळखीचं असं कोणीच येईना ज्यांना पुस्तकाबद्दल सांगता येईल..
आणि एकदम स्ट्राईक झाले की मागे टूरवर गेलो होतो, तेव्हा तिथल्या कार्ल यांच्याशी ओळख झाली होती आणि त्यांच्याशी व्हाट्सअप वर अधून मधून संभाषण पण असते. विचार केला की यांना फोन लावावा आणि विचारावं की कोणी मराठी फॅमिली ओळखीचे आहेत का?
एक दिवस दुपारी ४ च्या सुमारास व्हाट्सअप वर फोन लावला. म्हणजे तिकडे दुपारचे साडेबारा वाजले असणार.
लगेच फोन लागला.
(कार्ल यांचं आणि माझं बोलणं इंग्रजीमधे झालं. खाली अनुवाद देत आहे)
कार्ल: शुभ दुपार, बऱ्याच दिवसांनी तुमचा आवाज ऐकून मस्तच वाटतंय. काय नवीन
मी: कार्ल, माझं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं आहे.
कार्ल: बढिया, अभिनंदन. पुस्तकाचं नाव काय आहे?
मी: पुस्तकाचं नाव म्हैस आहे
कार्ल: काय नाव आहे? मला नाव जरा विचित्र वाटते आहे
मी: म्हैस म्हणजे बफेल्लो
कार्ल: नाव एकदम वेगळेच आहे. म्हशीवर तुम्ही पूर्ण पुस्तक कसे लिहू शकता. मी फार फार तर ५ – ६ ओळी लिहू शकेन
मी: पूर्ण पुस्तक म्हशींबद्दल नाही आहे. फक्त पहिला लेख म्हैस असा आहे. आणि ट्रॅफिक चा रस्ता क्रॉस करण्याकरता म्हशींची मदत घेणे यावर तो लेख आहे.
कार्लला जरा हे बंपरच गेले. तीन-चार वेळा त्याचे व्हॉट व्हॉट असे विचारून झाले. मी त्यांना सांगितले ट्रॅफिकचा रस्ता ओलांडताना लोकांना वाहनांची भीती वाटते. बाजूला म्हैस असली की रस्ता न घाबरता ओलांडता येतो आणि यावरच पहिला लेख आहे.
त्याला याचा काहीच अर्थ लागत नव्हता. कारण तिकडे त्यांनी आपल्या इथल्या सारख्या रस्त्यावर म्हशी कधीच बघितल्या नसणार. आणि रस्ता क्रॉस करताना कोणाला तिथे भीती पण वाटत नसणार.
कार्ल: इथे पादचारी मंडळींकरता रास्ता क्रॉस करण्याकरता लाल – हिरवे दिवे असतात. दिवा लाल असेल तर लोक थांबतात. आणि हिरवा झाला, की चुकून एखादी गाडी अंगावर येईल का, वगैरे अशी भीती न बाळगता रस्ता क्रॉस करतात. काही क्रॉसिंगवर लाईट नसतात. अशा ठिकाणी ट्रॅफिक मध्ये थोडी गॅप पडण्याची चालणारे वाट बघतात आणि रस्ता क्रॉस करतात. काठी घेऊन चालणारी मंडळी/व्हील चेअर वरची मंडळी कुठलाही रस्ता न घाबरता क्रॉस करू शकतात. सगळेच वाहन चालक चालणाऱ्यांकडे नेहेमीच आदरपूर्वक बघतात. आणि रस्त्यावर चालणाऱ्यांचा पहिला मान असतो असे मानतात. आता म्हैस रस्ता क्रॉस करायला काय आणि कशी मदत करते हे मला जरा डोक्यावरून जाते आहे.
मी: रस्ता क्रॉस करतांना म्हैस बरोबर असली कि आम्हाला सुरक्षित कसे वाटते हे एक्सप्लेन करणे जरा कठीण आहे..
कार्ल: माझं खरं मत सांगू का – एखाद्या म्हशीला जर रस्ता क्रॉस करायचा असेल, तर तिनी चालणाऱ्यांची मदत घ्यावी. कारण म्हशींना लाल – हिरव्या दिव्याचा अर्थ समजणे कठीण आहे.
मी (मनात): ह्याला सांगण्यात काही पॉईंट नाही की इथे गाड्या चालवणाऱ्या बहुतांशी लोकांना ट्रॅफिक कंट्रोल करता लावलेल्या लाल हिरव्या दिव्यांशी काहीही देणे घेणे नसते. त्यांना अगदी झेब्रा क्रॉसिंगशी पण काही देणे घेणे नसते/स्पीड ब्रेकरशी देणे घेणे नसते/आणि चालणाऱ्यांशी तर नसतेच नसते. आता सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने आहेत, त्यामुळे अशा देणे घेणे नसणाऱ्यांच्या यादीमध्ये पूर्वी फक्त पुरुषच असायचे, आणि आता स्त्रिया पण त्यांच्याबरोबरीने असतात. सगळेच स्वतःच्या घाईमध्ये असतात आणि मन मानेल तसे वेगाने जात असतात. बरेच जण गाडी चालवतांना मोबाईलवर असतात, त्यामुळे तसेही त्यांचे स्पीड लिमिट चे बोर्ड, नो एन्ट्री बोर्ड, लाल हिरवे दिवे इकडे लक्ष नसतेच.
रस्त्यावर लावलेले ट्रॅफिकचे दिवे त्यांना जोडलेल्या टायमर प्रमाणे लाल हिरवे होत असतात. त्यांना पण ट्रॅफिकशी काही देणे घेणे नसते.
त्यामुळे रस्त्यावर सगळ्यात बिचारा प्राणी कोण असेल, तर तो म्हणजे चालणारा माणूस किंवा स्त्री किंवा मुलं, आणि कुत्री आणि मांजरी काही प्रमाणात.
आणि ट्रॅफिकला न घाबरणारे कोणी असेल, तर ते म्हणजे म्हैस, गाय, बैल, मेंढ्यांचे कळप.
मी (थोडा विषय बदलून): कार्ल, मला आठवतंय की तुमचा काही कामाकरता पुढच्या महिन्यामध्ये इथे येण्याचा प्लॅन आहे. त्यावेळेस आपण म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करू. म्हणजे तुम्हाला तो फील येईल.
आणखीन एक विचारायचं म्हणजे, तुमचे मराठी बोलणारे काही मित्र आहेत का? किंवा ऑफिस मध्ये कुणी मराठी सहकारी आहेत का?
कार्ल: आहेत आहेत. बरेच आहेत, त्यांच्याशी फोन वर म्हैस पुस्तकाबद्दल बोलायचे आहे का?
मी: नाही. मी तुम्हाला म्हैस पुस्तकाची जर्मनी मधल्या अमेझॉन ची लिंक पाठवतो. ती त्यांना फॉरवर्ड करा. त्यांना म्हैस पुस्तक तिथे मागवता येईल. आणि पुस्तक वाचल्यानंतर ते तुम्हाला म्हैस ही स्टोरी समजावून सांगतील. आणि तुम्ही इथे याल तेव्हा आपण म्हशींबरोबर रस्ता क्रॉस करू म्हणजे तुमच्या सगळ्या शंकांचे समाधान होईल.
थोड्या इतर गप्पा झाल्या आणि फोन बंद झाला.
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





