सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “लक्ष्मी – –” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

संध्याकाळी बाहेर निघाले होते. तर रस्त्याच्या कडेला एक बाई गाठोड सोडत होती. बुटकी तीस पस्तीस वयाची असावी. कॉटनची साडी,  दोन्ही खांद्यावरून पदर घेतलेला,  कपाळावर मोठ्ठ कुंकू…

गाठोड्यातून ती काय काढते हे बघत मी उभे राहिले. तिने गाठोडं सोडलं. त्यात छोट्या आणि मोठ्या केरसुण्या होत्या. त्या तिनी कापडावर नीट मांडून ठेवल्या आणि मला म्हणाली,  

” या ताई पूजेला लक्ष्मी घ्या. माझी बोहनी करा “

दिवाळी जवळ आली की अशा बायका दिसतात. मी थांबले. तिच्याजवळ गेले आणि तिच्याशी गप्पा मारल्या. तळेगाव वरून ती आली होती.

” या दिवसात आम्ही केरसुण्या जास्ती बनवतो. आता इतर वेळी कोणी घेत नाही बघा. पण दिवाळीत पुजायला घेऊन जातात. ” तिने सांगितल.

 तिच्याकडून केरसुणी घेतली. तिच्यावरून हात फिरवला… जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

मन साठ वर्ष मागे गेले. पूर्वी घरोघरी केरसुणींनीच केर काढला जायचा. केर काढताना खूप खाली वाकायला लागायचे. तेव्हा सहजपणे हे काम बायका करत असत. सकाळी उठून पहिलं काम घर झाडायचंच असायचं. लगेच बंब पेटवला जायचा. साडेसातच्या आत सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या असायच्या.

संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान परत घर झाडून घ्यायचं. तेव्हा दोन वेळी घर झाडायची पद्धतच होती. जरा उशीर झाला तर घरातले मोठे लगेच रागवायचे…

” दिवेलागणीची वेळ होईल.. अजून झाडून झालं नाही का? “

तेव्हा मोठ्यांचा धाकही होता. अशी वेळ सहसा यायची नाही…

सहज सवयीनुसार कामं केली जायची.

मंडईत केरसुण्या विकणारी एक बाई होती. वर्षानुवर्षे आई तिच्याकडूनच केरसुणी घ्यायची.

या बाईच्या शेतात शिंदीची झाडं होती. त्या स्वतः केरसुणी बांधायच्या. केरसुणी झिजायची पण एक हीर इकडे का तिकडे व्हायचा नाही.

आज त्या ताईंची पण आठवण झाली.

केरसुणीला चुकून पाय लागला तरी तिला हात लावून परत तो हात कपाळाला,  छातीला लावून नमस्कार केला जायचा. एक प्रकारची शिस्त.. वळण रोजच्या जीवनाला होते.

मुख्य म्हणजे तो संस्कारांचा भाग होता. अगदी साध्या गोष्टीतही कृतज्ञता व्यक्त केली जात होती.

घरातला नुसता केरच नाही तर घरातलं दारिद्र्य दूर करणारी ती 

” लक्ष्मी ” म्हणून आजही केरसुणीची पूजा केली जाते.

घरातला केर काढण्यासाठी कुंचे आले आणि केरसुणी वापरातून पार हद्दपार झाली…

माझ्या मनात मात्र अजूनही तिला जागा आहे. घरी आले आणि अनेक आठवणी दाटून आल्या त्यासाठी हे चार शब्द…

या” लक्ष्मीला” माझा मनापासून नमस्कार.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted