डॉ. माधुरी जोशी
मनमंजुषेतून
☆ सांगता… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆
अगदी माहेरी वाड्यात… वाडा संस्कृतीतलं मोकळंढाकळं राहणं… अंगणात धमाल खेळणं…. सगळ्या घरांची दारं मनापासून मोकळी उघडी.. साऱ्या घरांशी जणू नातंच असणं… मग लग्न होऊन सासरी गेल्यावर भाड्याच्या २/३ जागा…. मग १५ वर्षांनी झाला स्वतःचा ओनरशिपमधल्या वाड्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या संस्कृतीतला फ्लॅट… दारं बंद… आणि जरा मनं पण…. असा जागांचा प्रवास झाला खरा…. पण सगळ्या जागा तळमजल्यावर…. म्हणजे उजेड, वारा, ऊन्ह, प्रकाश सगळ्यांना बऱ्यापैकी “उणे” चिन्ह.. तरी जगणं आनंदातच. वर्षं सरकली… हळुहळू गर्दी वाढत गेली… ते शांत निवांत पुणं हळुहळू मिटंत चाललं…. जुने वाडे संपत चालले…. स्थित्यंतरं होत होती. जमवून घेत जगंत होती माणसं… आम्ही तर जन्मापासून आजतागायत याच पुण्याशी घट्ट बांधलेले… आणि असेच असंख्य…. जसजसा काळ बदलला, नोकरीच्या संधी वाढत चालल्या, शिक्षणासाठी संस्था वाढल्या…. आधीच पुणं सुशिक्षित, सुसंस्कृत, कलाप्रेमी, व्याख्यानमाला, नाटक, संगीत महोत्सवाची पर्वणी असणारं…. हवा पाणी ऊत्तम असणारं, हॉस्पिटल, हॉटेल, बाजार…. सगळं मुबलक… आणि खरं म्हणजे सहज घुसता येणारं… स्थिरावता येणारं. अक्षरशः लोंढे वगैरे आकर्षित झाले… आणि वाढली गर्दी, गर्दी, फक्त गर्दी… असंख्य वाहनं… असुरक्षित, अपघात ग्रस्त असं रुपडं झालं… शांत, निवांत पुण्याचं… क्वचित अपघात, चोऱ्या, खून, मारामाऱ्या अशा बातम्या येत.. आता त्या नित्याच्या झाल्या. आजही बाकी खूप सारं चांगलं आहेच पण दुसरी वाईट बाजू फोफावत राहिली नदीवरच्या पाणवेलीसारखी… पाणीच दिसू नाही इतकी गडद, दाट, भयावह..
जगण्याची गरज, पैशांचा मोह, इमारतीचं जुनेपण. त्यातल्या अडचणी…. यातून आधी जुने वाडे जात चालले… मग आता बंगले, जुन्या इमारती… ओळखीचे संपत चालले सगळे… नवीन गर्दीची नवीन भितीदायक भविष्याची चाहूल…. कारण हे आवरणार कसं हा भितीदायक प्रश्न आ वासून जनतेच्या मनात उभा राहतो. नवनिर्मितीची
हीच लाट माझ्या इमारती पर्यंत पण आलीच. मग तोच पाढा… जागा शोधा… सामान आवरा, हलवा, लावा….
इतरांसारखा मी पण हाच पाढा रटला… ते सामानानी खचाखच भरलेलं तात्पुरतं रहायचं घर पाहून दडपणंच आलं. आता सामान लावा हे शेवटचं कडवं…. आणि एक दिवस जवळजवळ सगळं सामान लागलं…. आता दोन अडीच वर्षं इथे मुक्काम…
पण तो इतका… इतका आनंदी अपेक्षिलाच नव्हता…. आधी ही जागा पाचव्या मजल्यावर…. हवा, वारा, उजेड, प्रकाश, ऊन्ह, हिरवाई…. सगळ्यांचं उणे चिन्ह जाऊन अधिक चिन्ह झालं लीलया…. या अपार्टमेंटचं रीसॉर्टच झालं माझ्यासाठी…. जे मी कधीच अनुभवलं नव्हतं ते रोजचं झालं…
रोजचा हलका अबोली सूर्योदय… आधी कोवळं ते हळुहळू तापलेले ऊन्ह… चांदण्यांचं आकाश… चंद्राची रूपं…
पहाटे अलगद प्रकाशमान होणारा अंधार आणि संध्याकाळी अलगद प्रकाश सोबत घेऊन जाणारा सूर्य अन् मग अंधाराचं राज्य… रोज नवीन पेंटिंग्ज… रोज नवीन निसर्ग रूपं… आणि त्या सगळ्याला सुंदर पार्श्वसंगीत अगणित पक्षांच्या स्वरांचं… आजही पहाट घड्याळात होत नाही…. तर ती उमलते त्या सुंदर सुगंधी गार हवेत, त्या अलगद होणाऱ्या प्रकाशात, त्या पक्षांच्या जागेपणात, रात्री अंधारात लपलेल्या आणि पहाटे पुन्हा उघडणाऱ्या हिरव्या रंगात… अशी सुंदर, मोहक, प्रसन्न. आणि मग जाणिवेतून उमलतं.. कानाला तृप्त करतं…
“भारद्वाजाचं मंत्रपठण
मोरांच्या आर्त केका
पोपटांचा हा वाद की हाका
आणि कोकीळांचा
चक्क सुरेल गलका
हळुहळू हळुहळू बहरतं झाड
मैफलीत रंगतात सुरेल नाद
मी आहे बरं का इथे
कुठूनशी सांगते
कीर्रर शिळेतून घार
कधी कावळ्यांची भांडणं
कठड्यांवर झाडांवर खारींचं
वेगवान सावध धावणं
मैना साळुंक्यांचा जास्तंच गलका
नुसताच गोंधळ घालणं..
एखादाच हळद्या
एखादाच हमिंग बर्ड
राखून आपलं वैभव
अचानक सुंदर दर्शन
काही ओळखीचे
काही अनोळखी
सुंदर स्वर रंग देतात
भेट सारखी
अचानक आनंदाची येते लाट
आणि देखणी देखणी
होते माझी पहाट
नाही वाहनांचा हॉर्न कर्कश्श
विषारी धूर ही इथे अदृश्य
निवांत निरामय निराळीच शांतता
सृष्टीची सुरेल मैफल सजते
वर येतो सूर्य
आणि अलगद होते
पहाटेची सांगता!!!!
© डॉ.माधुरी जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



