श्री मकरंद पिंपुटकर
☆ आनंदडोह… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
भाच्याच्या शुभविवाहाचे निमित्त साधून मी बडोद्याला माझ्या मावसभावाकडे, अभयकडे आलो होतो… बालपणापासूनच्या कडू गोड आठवणी, आयुष्यातील चढ-उतार – सगळ्याची उजळणी झाली. डोहाळे पुरवल्यासारखं खाणंपिणं, कराओकेच्या सुरात गायलेली ती आठवणीतली गाणी आणि हार्मोनियमच्या पट्ट्यांतून उमटलेली ती हृदयाला भिडणारी मैफिल… आज तो आनंद.. आनंद!
ओघाओघाने बोलणं वळलं नाटक आणि चित्रपटांकडे. मी नुकताच योगेश सोमण यांचा “अभंग तुकाराम” हा चित्रपट पाहिला होता. त्याबद्दल बोलताना, माझ्या तोंडून सहजच एक वाक्य आलं, “खरं सांगायचं तर, मला चित्रपटापेक्षा सोमण यांचाच याच विषयावरचा एकपात्री प्रयोग, ‘आनंदडोह’, हा मनाला अधिक शांतता देणारा आणि अधिक भावला. ” आणि योगायोग बघा! लगेचच ७ डिसेंबरला, रविवारी संध्याकाळी ६:३० वाजता, चिंचवडला, श्रीमन महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त तोच प्रयोग सादर होणार होता.
मी क्षणाचाही विलंब न करता विचारलं, “अरे, तुम्ही दोघं येणार आहात का? हा कार्यक्रम आयुष्यात एकदा तरी अनुभवावा असा आहे! “
अभय आणि मीनल वहिनीने खात्री करून घेतली, “७ डिसेंबरला ना? ” आणि मग त्या दोघांचे डोळे एका वेगळ्याच आनंदाने चमकले. ते म्हणाले, “नाही जमणार रे मकरंद. त्या वेळी आमची लेक आणि नात आठवडाभरासाठी इथे बडोद्याला येत आहेत आणि खरं सांगायचं तर, आमच्यासाठी तोच खरा आनंदडोह आहे. “
हो, खरंच आहे त्यांचं! नातवंडांच्या इवल्याशा हातांचा स्पर्श, त्यांच्या निरागस हास्याचा किलबिलाट… कुटुंबाच्या प्रेमाचा आणि सहवासाचा तो अमूल्य अनुभव… याहून अधिक मोठा आनंद तो कोणता असू शकतो? …
… तोच खरा ‘आनंदडोह ‘, जो संत तुकारामांना अभंगात गवसला होता, तोच अभय – मीनलला त्यांच्या लेकीच्या – नातीच्या भेटीत गवसणार होता.
… आणि हा आनंद फक्त अनुभवायचा असतो, शब्दांच्या चौकटीत त्याला बांधण्याचा प्रयत्न करायचा नसतो.
— — —
या आमच्या संभाषणावरून, विशेषत: भावाने त्यात दिलेल्या ‘ आनंदडोह ‘ या उपमेवरून, या पूर्वीच पाहिलेला, अभिनेते योगेश सोमण यांचा ” आनंदडोह “ हा अतिशय सुंदर एकपात्री प्रयोग नकळत माझ्या नजरेसमोर उभा राहिला.. खरं तर त्यांची ती “ आनंदयात्रा “ विसरणे शक्यच नव्हते. आज त्याबद्दल काही सांगायलाच हवे असे मनापासून वाटते आहे. – – –
त्या वर्षी १० जूनला तुकोबारायांच्या पालखीचे श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान झाले आणि या वारीचे औचित्य साधत, तिचा सांगावा घेऊन प्रवास सुरू झाला तो श्री. योगेश सोमण यांच्या एकपात्री “आनंदडोह” या कार्यक्रमाचा. (आनंद सोमण म्हणजे तेच ते …. “उरी” चित्रपटातील मनोहर पर्रीकर आणि “दृश्यम्” चित्रपटातील इन्स्पेक्टर विनायक सावंत साकारणारे सशक्त अभिनेता.)…
… गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या कार्यक्रमाचे प्रयोग होत आहेत आणि तीनशे प्रयोगांचा टप्पा ओलांडून पुढची वाटचाल सुरू आहे. या एकपात्री “ आनंदडोह “ नावाच्या आनंदयात्रेबद्दल थोडक्यात काही सांगायचे झाले तर – – –
– – – – –
सततच्या लोकनिंदेने व्यथित होऊन तुकोबा आपले अभंग इंद्रायणीत विसर्जित करतात आणि आपलीच श्रद्धा योग्य असल्याचं साधार दाखवून देण्याचं साकडं प्रत्यक्ष विठुरायालाच घालतात. तब्बल तेरा दिवस अन्न पाण्याविना ते इंद्रायणीकाठी ठाण मांडून बसतात.
या दिवसांतील त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या भावावस्थेचा आरसा म्हणजे “आनंदडोह”.
तुकोबांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी पांडुरंग दिसतो. ते त्याला जेवू घालतात, त्याच्याशी बोलतात, खेळतात, भांडतात, हट्टही धरतात.
आणि म्हणूनच मग मंदिरात जाऊन, ममत्व नसताना, केवळ स्वार्थासाठी तेथील मूर्तींना पूजणं, मनोवांच्छित फलप्राप्तीसाठी देवांना लालूच दाखवणं – त्यांना पटत नाही. प्रयत्न न करता, मेहनत न करता निव्वळ नवससायासांवर अवलंबून राहाणं त्यांना मंजूर नाही आणि हे सर्व आपल्या अभंगांतून ते ठामपणे मांडतात.
साधी सोपी ओघवती बोलीभाषा आणि त्यातील अनुभवसिद्ध सांगणं – लोकांना रूचतं, पटतं, मान्य होतं आणि परिणामी पूजापाठ, नवस यांच्याकडे श्रद्धा म्हणून न बघता त्याचा व्यवसाय करणारे भगत आणि पुरोहित दुखावले जातात. वैश्यवाणी असून धर्माबद्दल टिप्पणी करतात म्हणून ब्रम्हवृंद खवळलेला असतोच.
मग तुकोबांना नाउमेद करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न सुरू होतात आणि सुरूच रहातात.
तुकोबांची पत्नी आवली हिचा विठ्ठलाशी उभा दावा असतो. काळतोंड्या, विठ्या, मुडद्या अशा शेलक्या विशेषणांनीच ती पांडुरंगाचा उल्लेख करायची. तुकोबांची पांडुरंग भक्ती आणि अभंग यांचा तिला मनापासून तिटकारा.
पण तुकोबांनी गाथा नदीत विसर्जित केल्याचे जेव्हा तिला कळतं, तेव्हा ती चवताळून उठते. घरातल्या सजीव, निर्जीव गोष्टी – विठूरायाचा मनापासून दुस्वास करणाऱ्या अगदी खुद्द आवलीचे हातसुद्धा – जेव्हा तुकोबांच्या “सततं अनुसंधानं”च्या प्रभावाने विठूनामाचा गजर करू लागतात, तेव्हा तर तिला तुकोबांच्या श्रेष्ठत्वाची ग्वाहीच मिळते.
आणि त्या भरात, तुकोबाच कसे योग्य आहेत हे पटवून देताना, ती तुकोबांचे पाच अभंग घडाघडा म्हणते. आणि गाथा बुडवल्या असल्या तरी आपल्याला काही अभंग तरी मुखोद्गत आहेत हे जाणवल्यावर हरखून जाते.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांचीही तीच गत असते. जो तो आपल्याला लक्षात असलेले अभंग कागदांवर उतरवून काढतो, आणि जेव्हा हे सगळे एकत्र येतात, तेव्हा जनसागराकडूनच अशा रीतीने तुकोबांची गाथा पुनरुज्जीवित केली जाते.
पण गाथांना आणि स्वतः तुकोबांना अशा रीतीने मिळालेलं देवत्व तुकोबांना स्वतःलाच मंजूर नसते. तुकोबा काय सांगत आहेत, गाथा काय सांगत आहेत ते लोकांनी अंगिकारावं, अंमलात आणावं, अनुसरावं हीच त्यांची तीव्र इच्छा असते.
गाथांनुसार कृती – आचरण न करता तिचं नुसते स्तोम माजवणं, त्याला चमत्कार म्हणणं हे तुकोबांना सहन होत नाही आणि ते देह ठेवतात.
… असं या “आनंदडोहा”चं ढोबळ कथानक.
प्रत्यक्ष प्रयोगातून योगेशजी जे गारूड घालतात, जी मोहिनी घालतात, त्याची यथार्थता दर्शवण्यास निव्वळ शब्दांचं हे कोरडं वर्णन सर्वथा असमर्थ आहे.
त्यांची ती तंद्री, एकरूपता नुसती बघायला नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवायलाच हवी.
योगेशजींचे शब्दसामर्थ्य आणि अभिनय यांच्याविषयी नव्याने काही सांगायला नको. कोणतेही prop न वापरता, निव्वळ देहबोली व लकबींनी तुकोबा आणि आवली या दोघांनाही ते आपल्यासमोर लीलया सादर करतात.
अभिनयाच्या पलीकडे जाऊन, त्यांचे त्या भूमिकेत रममाण होणं आणि तुमच्यातील भक्ताला विठू माऊलीला साद घालायला भाग पाडणं ही एक अद्वितीय अनुभूती आहे.
जेव्हा शक्य होईल, जिथे शक्य होईल, तिथे हा “आनंदडोह” आवर्जून अनुभवाच अनुभवा.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






