सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “थेटरांचं गाव… सोलापूर” – लेखक श्री चंद्रकांत कुलकर्णी ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

श्री चंद्रकांत कुलकर्णी

सोलापूरचे नाव काढले की सगळ्यांना चादर आठवते..

पण सोलापूर हे सिनेमा थेटरांचे पण गाव आहे. त्याला ” थेटरच “म्हटले जायचे.  गरीबाचे गाव.. त्याच्यामुळे तिकीट दर कमी. सर्वांना  परवडणारे.

आम्ही नव्या पेठेत राहत होतो. उजव्या हाताला पाच सात मिनिटे चालले की लगेच “लक्ष्मी” थेटर… 

हे साधारण 58 /59 साल. तिथे सिनेमा एकाच मशीन वरती दाखवायचे. रील बदलताना ब्रेक असायचा. सिनेमा सुरू असताना मध्येच  फिल्म तुटायची. पुन्हा ब्रेक. त्या ब्रेक मध्ये  थेटरातच

“ए पापड पापड ” अशी घोषणा करत मोठ्या आकाराचे तळलेले पापड एका टोपलीमध्ये घेऊन काही मुलं विकायला यायची. एक पैशाला एक पापड.

तिकीट एक आणा .. सहा पैसे. अशीच अजून दोन थेटर होती. त्यांना  “गिन्नी गिन्नी” थिएटर म्हणत. या लक्ष्मी टॉकीज मध्ये तिकीट खिडकीतलाच माणूस बाहेरच्या माणसाकडून दहा पैसे देऊन तिकीट  घ्या असे सांगायचा .लोक आनंदाने चार पैसे जास्ती द्यायचे. 

मी इथे जुना सिंहगड, रामराज्य, संत तुकाराम, आणि आफ्रिका हे  सिनेमे बघितले.

लक्ष्मी थेटर च्या पुढे सरळ चालू लागले की तीन मिनिटात “चित्रा” टॉकीज… त्यामध्ये जास्ती करून मराठी सिनेमे लागायचे. मी इथे राजा गोसावीची गोष्ट, दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव, आधी कळस मग पाया हे सिनेमे पाहिलेले चांगले  आठवतेय.

सरळ पुढे गेलं की “मेकॅनिकी” चौक. हा सिनेमाचा चौक.

समोरच “मीना” टॉकीज. त्याच्या मागे डाव्या कोपऱ्यात ” आशा” टॉकीज. त्याच्या आणखी पुढे डाव्या कोपऱ्यात “श्री” टॉकीज.

मीना टॉकीज च्या उजव्या बाजूला रस्त्यावर  भागवतांची एका जागी चार  थिएटर्स. …

भागवत चित्रमंदिर, उमा चित्रमंदिर, कला चित्र मंदिर आणि छायाचित्र मंदिर. कला आणि छाया एकावर एक होती. कदाचित देशातले पहिले मल्टिप्लेक्स थिएटर हेच असावे.

उमाचित्र मंदिराचे उद्घाटन राज कपूर यांच्या हस्ते त्यांच्या संगम चित्रपटाने झाले. त्यावेळेस भागवत बंधूंनी राज कपूर आणि इतर कलाकारांची सोलापुरात उघड्या मोटारीतून मिरवणूक काढली होती, राज कपूरला बघण्यास आतुर झालेले सगळे सोलापूरकर  रस्त्याच्या कडेला ,  दुकानात आणि सज्जामध्ये जमले होते.

नवी वेस पोलीस चौकीच्या पुढे डावीकडे पाटलांचे प्रशस्त “प्रभात” टॉकीज होते.  तिथे मराठी पण सिनेमे लागत.

सरस्वती मंदिर शाळेच्या समोर ” सेंट्रल टॉकीज” होते .मंडईच्या जवळ ” उमा टॉकीज”  माणिक चौकात 

“विणा” टॉकीज  होते.

सेंट्रल आणि विणा टॉकीज मध्ये सेकंड रन चे पिक्चर लागायचे. दर 19 पैसे. विणा टॉकीज ने एकदा 

“राज कपूर महोत्सव”  केला होता. तिथे आग, आवारा,

आह, बरसात, श्री 420 हे सिनेमे आम्ही कॉलेजचे मित्र  मिळून  खुर्च्याची पूर्ण लाईन पकडून  बघितले होते.

पूर्व भागामध्ये तेलगू भाषिक लोक खूप असल्यामुळे तेथे “पद्मा” थेटर होते .तेथे कायम तेलगू सिनेमे लागत असत.

एकदा एका टॉकीज मध्ये  इन्सानियत सिनेमा चालू असताना एका देवानंद प्रेमी ने दिलीप कुमार वर मोठ्याने काही भाष्य केले. त्यानंतर लगेचच दिलीप कुमारच्या  चाहत्यांनी त्यांच्यावर  काही भाष्य केले. सिनेमा चालू असताना दोघात वादावादी सुरू झाली. त्यांचे समर्थक उठून बोलायला लागले. मारामारीचीच वेळ यायला लागली होती. शेवटी मॅनेजरने येऊन मध्यस्थी केली भांडण मिटवले.

असे प्रसंग थेटरात अधून मधून घडायचे.

इंटरवेलमध्ये सोडा पिण्याचे प्रस्थ फार होते. थेटरच्या दाराच्या बाहेर टेबला वरती सोड्याच्या बाटल्या ठेवून त्याच्यावरती ओपनर फिरवून  सरररर्र आवाज काढायचा… काहीजण  सिगरेट ओढायचे..देवानंद स्टाईलने….

कला, छाया च्या खाली असणाऱ्या हॉटेलमध्ये गर्दीत जाऊन  काही लोक घाईघाईत उकळता चहा पिऊन परत अंधारात येऊन थेटरातून आपली खुर्ची शोधायचे .

लक्ष्मी थिएटर मध्ये तर इंटरवेल  नंतर  परत आल्यावर आपली खुर्ची  जागेवर असेल  याची गॅरंटी नसायची. तिथल्या लाकडी सीट काढता घालता यायच्या.ज्याची सीट तुटली आहे तो दुसऱ्याची सीट उचलून आपल्या खुर्चीला लावून  बसायचा .मग सिनेमा सुरू असताना भांडण.  

“खाली बसा”  “भांडण बाहेर जाऊन करा” “आम्हाला सिनेमा बघू द्या” “आवाज बंद करा” असा  गदारोळ थोडा वेळ  चालायचा. 

इंटरवेल मध्ये  चहा पिणे, सोडा पिणे, सिगरेट ओढणे हे सोलापुरात त्याकाळी  कॉमन होते.

या कलाछायाचे वैशिष्ट्य म्हणजे याच इमारतीमध्ये सोलापूरची जुनी शाळा “न्यू हायस्कूल” होती.  शिकत असताना सिनेमाची गाणी ऐकून सुध्दा ईथली मुलं खूप हुशार झाली.   

प्रसिद्ध सिने रसिक , “गीतयात्री” या पुस्तकाचे लेखक आणि मुंबईच्या इस्माईल युसूफ आजाद कॉलेजचे माजी प्राचार्य कैलासवासी श्री. माधव मोहोळकर याच शाळेचे विद्यार्थी. सोलापुरात नवी पेठेतल्या ज्या

“जिक्रिया “हॉटेलमध्ये ते  गाणी ऐकायला जात त्याच हॉटेलमध्ये मी पण गाणी ऐकायला जात असे.

भागवतांच्या थिएटरमध्ये   मॅटीनीला जुने इंग्लिश सिनेमे लागायचे. मोठ्या  कापडी बोर्ड वरती निळ्या रंगात सिनेमाची स्टोरी मराठीत लिहिलेली असायची . कडेला एक आकर्षक पोस्टर चिकटवलेले…. ते बघूनच आम्ही सिनेमा बघायला जात होतो.

आम्हाला त्या वयात या इंग्लिश सिनेमाचे  आकर्षण होते. तिथेच आम्ही क्लिओपात्रा, रोमन हॉलिडे, द ग्रेट एस्केप, बेनहर  असे गाजलेले सिनेमे बघितले. तिथेच आमची ग्रेगरी  पेक , कर्क  डग्लस ,  अॅथनी  कॉइल, एलिझाबेथ टेलर, एल्विस प्रिसले,मर्लिन मनरो, यांची पडद्यावरती ओळख झाली.

काही दिवसांनी श्री टॉकीज च्या मागे डाव्या कोपऱ्यात मोठे “कल्पना” टॉकीज सुरू झाले. येथे फक्त करंट इंग्लिश सिनेमाच लागायचे. नंतर हिंदी सुरू झाले.

रेग्युलर सिनेमाचे तिकीट दर… पाच 

आणे आणि साडेआठ आणे .  तिकीट खिडकीवर थोडीशी तिकीटं दिली की खिडकी बंद. मग बाहेर लगेच  पाच आण्याचे आठ आण्यात. विक्री सुरू. 

किशोर कुमारच्या पहिली तारीख या गाण्यात “पाच आनेका  दस आना” ” पाच आनेका दस आना” हे शब्द बहुतेक सोलापूरच्या थेटर मधूनच घेतले असावेत….

ह्या विक्रेत्याकडे तिकिटांचे गठ्ठे असायचे.  पुन्हा आत जाण्यासाठी वेगळी लाईन. ती लांब पर्यंत वाकडीतिकडी पसरलेलली असायची. थिएटर  मालकांनी धिप्पाड माणसे कमाला  ठेवली होती. ही माणसे दोन्ही हात लांब पसरून जोर लावून पूर्ण रांग मागे ढकलायचे आणि  सरळ करायचे.

लाईनीतले लोक हे मूकाटपणे सहन करायचे.

या  ढकलाढकली चा आणि काळ्या बाजाराचा राग काही प्रेक्षक प्रेक्षागृहात मालकाचा उद्धार करून काढायचे . तर काही प्रेक्षक या अन्यायाचे उट्ट  काढण्यासाठी . पुढच्या वेळेस येताना ब्लेड घेऊन यायचे आणि सिनेमा संपताना खुर्च्यावरती फिरवून जायचे.

सिनेमाच्या रांगेत आबाल वृद्ध सगळेच असायचे .त्यात काही जण रांगेतल्या दुसऱ्याला विचारायचे

“कसा आहे सिनेमा ?चांगला आहे का? तो दुसरा सांगायचा..

“हाय्येस (हायक्लास) आहे… बेस्ट आहे सिनेमा” हॉलमध्ये  ज्यांनी आधी सिनेमा  पाहिला आहे ते पडद्यावर चालू असलेल्या सिनची  कॉमेंट्री  करत, पुढे काय होणार आहे ते आधीच  सांगत. 

सोलापुरात  आंबट  शौकीन होते.  फर्स्ट  डे फर्स्ट शो ची  क्रेझ खूप होती. शो बघायला हे लोक बँड लावून थिएटरला जायचे.

देवानंद सारखे दात दिसावे म्हणून आपला एक दात  पाडून घेतलेला एक रसिक होता.

इस्माईल लस्सी वाले हे दिलीप कुमार चे प्रचंड फॅन होते. त्यांच्या लस्सीच्या  छोट्या गाडीवर सगळीकडे दिलीप कुमार चे फोटो असायचे. आणि दिलीप कुमारचे आलेले सिनेमे आणि येणारे सिनेमे यांची यादी टांगलेली असे. दिलीप कुमार बद्दल काही  माहिती देणारा त्यांच्याजवळ आला तर त्याच्याशी ते खूप आस्थेने बोलायचे.  खुश होऊन त्याला म्हणायचे 

“लेव  थोडी लस्सी पिओ.” अणि लस्सी द्यायचे.

ते दिलीप कुमार च्या लग्नाला गेले होते. तिथे त्यानी दिलिपकुमार अणि ते दिसतील असे खूप फोटो काढून घेतले. आणि परत आल्यावर गाडीवरती  लग्नाची फोटो गॅलरी लावली.

त्यावेळी बऱ्याच थिएटरमध्ये स्त्रियांसाठी सिनेमा हॉलमध्ये मागच्या बाजूला वेगळी व्यवस्था असायची. स्त्रियांसाठी  तिकीट दर कमी असायचे .आणि ते जाहिरातीमध्ये लिहायचे” स्त्रिया पाच आणे ” फॅमिली साठी काही थेटरामध्ये केबिन  केलेल्या असत. चोरून सिनेमाला  येणाऱ्या प्रियकर प्रेयसी साठी ही  खास सोय….. 

आम्हाला कधी हा चान्स मिळाला नाही…

सिनेमा पाहून परत येताना बाहेर सिनेमाच्या गाण्याचे पुस्तक  एक आण्यात  मिळायचे. अशी  पुस्तकं  मी  घेत असे . बरीचशी गाणी सिनेमा पाहून आणि ऐकूनच पाठ होत  असत. 

सिनेमा बघून आल्यावरती रात्री नवी पेठेत दुकानाच्या कट्ट्यावरती बसून मित्रांना  सिनेमाची स्टोरी सांगण्याचा कार्यक्रम रंगत असे. साधारण असे शब्द असायचे.

“काल कोहिनुर बघीतलो रे…दिलीप कुमार हिरो असतय आणि  मीनाकुमारी हिरोईन अस्तीय.  त्याचं प्रेम अस्तय.जीवन कप्टी अस्तय बघ…. त्येला मीनाकुमारी पाहिजे असतिय. दोघांची मारा मारी होतिय.  दिलीप कुमार जिंकतय. मग त्यन  आणि मीनाकुमारी गाण म्हनतेत “कोई प्यार की देखे जादू गरी”  लय मस्त गाणय.  एक दासी पण असतिय. मूक्रिबी लै हसवतय . कुमकुम चा डान्स मस्तय.  डायरेक्शन बी बरय.   डायलग तर  एक से एक हैत.तू बघ बे शिनेमा.”

ह्या स्टोरी कथनातच समोर येणाऱ्या तिन चाकी गाडी वरचा  गोटी सोडा हातात बाटली घेऊन प्यायचा असे.  सोडेवाला डाव्या हातात बाटली धरून उजव्या हाताच्या बोटाने वरुन दाबून  गोटी खाली  ढकलायचा..

त्यावेळी  येणारा “चुइंग” असा आवाज अजुनही कानात आहे.

थेटर मध्ये बाहेर काचेच्या शोकेसमध्ये सिनेमातले ठराविक फोटो लावलेले असत. हे फोटो आम्ही खूप आनंदाने बघत  असू. सिनेमाचे पोस्टर बघायला जाणे हा एक कार्यक्रमच…

काहीजण पोस्टर बघून सिनेमाला जायचे की नाही हे ठरवायचे . आम्ही मात्र सगळ्याच सिनेमाला जायचो .

जॉन कवस ,रंजन , बाबुराव मजनू यांचे पण सिनेमे बघितले. ” तुम जो आओ तो प्यार आ जाये” या मन्ना डे च्या गाण्यासाठी  “सखी रॉबिन” हा थर्ड ग्रेड  सिनेमा बघितला होता.

आत्ता लेख लिहिताना या सोनेरी आठवणी जाग्या झाल्या …

या सगळ्या थेटरांनी मला भरपूर आनंद दिला .

माझे जीवन” सिने समृद्ध” केले. आजही सोलापुरात नवी पेठेत , मेकॅनिकी चौकात गेलो की ती जुनी थेटरं आणि तिथे लावलेले मोठे पोस्टर्स ….डोळ्यासमोर येतात.

त्यात शकिला आणि राजकपूर मला दिसत असतात…

© श्री चंद्रकांत कुलकर्णी

मो 9850916406.

प्रस्तुती : सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted