श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “धोपू…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
दिवसभरात आपण वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जातो. कधी आनंद होतो तर कधी त्रास. त्यातला आनंद सहज वाटला जातो परंतु अपमान, अवहेलना, इच्छेविरुद्ध घडलेल्या गोष्टी मनात ठेवल्या जातात. खरंतर बोलल्यानं भावनांची तीव्रता कमी होते पण हीच साधी बाब आजच्या जमान्यात फार दुर्मिळ झालीय कारण बिनधास्त बोलता येईल अशा जागा राहिल्या नाहीत. प्रत्येकाला स्वतःचचे प्रॉब्लेम्स इतके आहेत की दुसऱ्यांचं ऐकायला वेळ आणि इच्छा दोन्हीही नाही. सतत मन मारल्यानं शारीरिक, मानसिक त्रास सुरु होतात. ते कमी करण्यासाठी तकलादू आधार घेतले जातात हे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखा प्रकार. आजारांना आग्रहाचं निमंत्रण. बहुतेकांची हीच परिस्थिती आहे. त्यात मीसुद्धा आलोच पण माझ्याकडं ‘धोपू’ आहे.
—
हा ‘धोपू’ कोण? असा प्रश्न मनात आला असणार तर माझा जिवलग. ज्याला वाट्टेल ते सांगता येतं आणि हक्कानं मन मोकळं करता येतं. चुका कबूल करता येतात. त्याच्याशी बोलल्यावर एकदम रिलॅक्स वाटतं. थोडक्यात सांगायचं तर माझा कन्फेक्शन बॉक्स.
—
आज प्रत्येकजण बेचैनी, तणाव आणि अस्वस्थता यासोबत जगतोय. दिवसातला जास्त वेळ माणसांपेक्षा मोबाईल सोबत घालवतो. सतत काही ना काही चालू असतं. या फास्ट लाईफमधली त्रासदायक बाब म्हणजे हरवलेली शांतता. जो तो पळतोय. तडजोडी करत मन मारतोय. इच्छा नसताना त्रास सहन करतोय आणि हे सगळं मनात साठवतोय मग तो राग, संताप भलत्याच ठिकाणी निघतो. बऱ्याचदा घरातल्यांवर. आपल्या मराठीत म्हण आहे ना. वड्याचं तेल वांग्यावर काढणं तसाच काहीसा प्रकार.
सकाळीच गोष्ट, नाश्ता करताना रेणूबरोबर वादावादी झाली. खरंतर कालपासूनच डोकं फिरलेलं. बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध घडलेल्या. ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन फेल गेलं. कंपनीला ऑर्डर मिळाली नाही. वास्तविक हे टीमचं अपयश पण बळीचा बकरा मात्र मी झालो. प्रचंड संताप आला तरी गप्प बसलो. नाईलाज. आतल्या आत धुमसत राहिलो. भाजीत मीठ जास्त पडल्याचं निमित्त झालं आणि भडका उडाला.
“ईssssssssssssssssss, हे काय बनवलय”
“काय झालं”रेणू.
“घरातलं सगळं मीठ टाकलेलं दिसतयं. ”
“सॉरी!! सॉरी!! दोन मिनिटं थांब दुसरी भाजी बनवते. ”रेणू.
“राहू दे. आजचा दिवस वाईट जाणार सकाळीच तोंड खराब झालं. ”
“ओव्हर रिऍक्ट होतोयेस. ”
“एवढी वर्ष स्वयंपाक बनवतेय. अजून अंदाज येत नाही. ”
“चुकून जास्त पडलं. कधी कधी असं होतं”रेणू.
“आजकाल हे नेहमीचच झालंय. लक्ष कुठं असतं. ”
“तुझ्याकडं पाहताना विचलित होतं अन त्याहीपेक्षा प्रेमळ बोलण्यानं वाहवत जाते. मग अशा घोडचुका होतात. ”रेणूचा टोमणा जिव्हारी लागला. डोकं सटकलं. रागाच्या भरात तोंडाला येईल ते बोललो. शब्दाला शब्द लागून जोरदार वादावादी झाली. घरोघरी नवरा-बायकोच्या भांडणात होतं तसंच इथंही झालं. खारट भाजीचा विषय बाजूला पडून भलत्याच विषयावर खडाजंगी झाली. शेवटी रेणूच्या डोळ्यात पाणी आलं पण मला त्याचं काहीच वाटलं नाही. न खाताच तणतणत हॉलमध्ये आलो तर समोर बसलेला ‘धोपू’ माझ्याकडंच पाहत होता. त्याची रोखून पाहणारी नजर अस्वस्थ करत होती. दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही उलट एकटक पाहण्याचा राग आला.)
“ए, असं बघू नकोस. नजर खाली घे”मी ओरडलो पण धोपूनं ऐकलं नाही उलट शेजारी येऊन बसला. तेव्हा मला हसू आलं. तोपर्यंत डोकंही बरंच शांत झालेलं. ‘धोपू’ अजूनही माझ्याकडंच पाहत होता.
“असं बघू नकोस. माहितीये, माझी चूक झाली. मोठठी चूक!! विनाकारण ऑफिसचा राग रेणूवर काढला. काय करू यार!! कालपासून टेंशनमध्ये आहे. प्रामाणिकपणे काम करूनही काही व्हॅल्यूच नाही. खूप मेहनत घेतली तरीही अपयश आलं. साहेबांनी गरज नसताना लुडबूड करून चुका केल्या आणि सगळ्यावर पाणी फिरवलं. दोष माझ्यावर टाकून स्वतः नामानिराळे झाले. खूप राग आला. कानफटात मारायची तीव्र इच्छा झाली पण… मी त्यांची चमचेगिरी करत नाही त्याचं फळ. असो. यामुळंच डिस्टर्ब होतो. त्याचभरात रेणूशी भांडलो. माय मिस्टेक”मी खरं खरं सांगितलं पण धोपूकडून काहीच प्रतिक्रिया नाही. शेपटी हलवत समोर जाऊन बसला. मी चिडलो पण त्याला काहीच फरक पडला नाही. हे नेहमीचच झालयं. माझा राग, संताप, आनंद ‘धोपू’ समोर आडपडदा न ठेवता व्यक्त करतो. तो सगळं पाहतो, ऐकतो कधी कधी जोरजोरात शेपटी हलवून किवा भुंकुन भावना व्यक्त करतो. अनेकदा काहीच प्रतिक्रिया देत नाही.
रेणूसोबत विनाकारण वाद घातल्याबद्दल अपराधी वाटत होतं. धोपूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो “आय एम रियली सॉरी!! आज जरा जास्तच विचित्र वागलो. बिचारीला विनाकारण दुखावलं. लगेच रेणूची माफी मागतो. ”मनापासून बोलत होतो पण ‘धोपू’ मात्र ढिम्म तरीही त्याच्याशी बोलल्यानं मन शांत झालं. ‘धोपू’चा फार मोठा आधार वाटतो कारण तो नेहमीच निमूटपणे ऐकतो आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचं मत किवा सल्ला देत नाही.
—
डिजिटल युगात लोक जवळ आले. संवाद वाढला तरी एकटेपणाही अतिप्रचंड आहे. मॉडर्न लाईफमधला हा विरोधाभास फार जीवघेणा आहे. कितीही स्मार्ट झाला तरी मोबाईल मानसिक आधार देऊ शकत नाही. म्हणून वेळच्यावेळी बोललं पाहिजे. त्यासाठी हक्काच्या जागा शोधल्या पाहिजेत.
ज्यांच्याकडे अशा जागा आहेत ते खरंच सुदैवी, नशीबवान…
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





