श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ३ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
स्पर्धा…
सध्या अनेक प्रकारच्या आणि अनेक विषयांवर स्पर्धा भरवल्या जातात, घेतल्या जातात, आयोजित केल्या जातात. त्या त्या क्षेत्रातील गुणवत्ता यातून झळकावी, योग्य उमेदवारास संधी मिळावी, त्याचे कौतुक व्हावे असा यामागील उदात्त हेतू असावा असे सामान्य मनुष्याला वाटणे अगदी स्वाभाविक म्हटले पाहिजे…! सदर स्पर्धांचा थोडा अधिक अभ्यास आणि विचार करताना असे लक्षात आले की यामागे वर नमूद केलेला उदात्त उद्देश नसून त्याला अनेक कंगोरे जोडले गेले आहेत. यामागे अर्थकारण तर आहेच, पण त्यातील स्पर्धा ही निव्वळ गुणवत्तेवर न राहता ती आता सामाजिक माध्यमांच्या ताब्यात, पर्यायाने काही मुठभर लोकांच्या ताब्यात गेली असल्याचे आपल्या लक्षात येईल…! आता महान गायक/गायिका व्हायचे असल्यास त्या अथवा तिला रियाज करायला लागेल की नाही ते सांगता येणार नाही पण सामाजिक माध्यमांवर जास्तीतजास्त लाईक्स मिळवणे बंधनकारक…!! *”पतिव्रतेच्या माथी धोंडा, वेश्येला मणीहार”* असा हा प्रकार नव्हे काय?
उदा. म्हणून विचार केला करूया. संगीत ही एक साधना आहे. साधना करून एखादी विद्या किंवा त्या विद्येत प्राविण्य प्राप्त करता येते. पण ते सुध्दा सामाजिक माध्यमांवर अवलंबून ठेवले गेले, किंवा तसे प्रस्थापित केले गेले तर कोणी साधना करण्याच्या फंदात पडणार नाही, आणि काहीही करून यश संपादन करण्याची चुकीची सवय लागू शकेल…
पटतंय ना?
समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशा वृत्ती फोफावल्याचे आपल्याला आढळून येईल. वानगीदाखल वरील संगीत क्षेत्राचे उदाहरण दिले आहे. IPL सारखे सामने सुध्दा याचीच री ओढत नाहीत असे म्हणता येईल…? अशा फोफावलेल्या विविध क्षेत्रांतील समाजाने एकत्र येऊन बहिष्कार घातला पाहिजे असे आपल्याला वाटतं नाही का?
हा वेताळ थोडेसे गोंडस रूप घेऊन आपल्या सर्वांच्या निव्वळ मानगुटीवर नव्हे, तर मनावर राज्य करू लागला आहे, त्याला वेळीच आपण सर्वांनी आवर घालण्याची गरज आहे असे सुचवावे वाटते…
बदलत्या जमान्यात स्पर्धांचे प्रकार आणि स्वरूप बदलत गेले…!! ती स्पर्धा आता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आता दोन भावांमध्ये स्पर्धा आहे, नव्हे इर्षा आहे, दोन बहिणींमध्ये, नव्हे ती आता मायलेकी पर्यंत पोचली आहे…!! पटतंय ना?
सकाळ, दुपार, संध्याकाळ याप्रमाणे मनुष्याच्या जीवनात बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था येणे अगदी नैसर्गिक आहे. त्यानुसार शरीराची कांती आणि केसांचा रंग आणि आयुष्य कमीअधिक असणे नैसर्गिक नव्हे काय? वयाच्या पंचविशी मध्ये तसा दिसणे आणि पन्नाशीला मी पन्नाशीसारखा दिसणे हे अपेक्षित नव्हे काय? पण आता यात बदल होताना दिसत आहे. मुलगी आणि आई छान दिसतात असे म्हणणे अगदी स्वाभाविक आहे. दोघी सारख्या दिसता असे म्हणणेही स्वाभाविक म्हणता येईल… , पण आता आयांना मुलीपेक्षा तरुण दिसण्यात धन्यता वाटू लागली आहे… , याला विकृती पेक्षा चांगला शब्द माझ्या मनात येत नाही…
एक कथा आहे. एका राजाला तरुण दिसायचे होते म्हणून त्याने आपल्या मुलाकडून तारुण्य मागून घेतले तरी त्याचे समाधान झाले नाही… , या कथा नाहीत तर आरसा आहेत… , आरसा पाहून आपण आपली दृष्टी नव्हे दृष्टीवर बसलेला वेताळ हाकलून द्यायला हवा…
पहा, पटतंय का?
लेख : तिसरा
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर






