सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – २ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

(पीठ पेरून असो, डाळ घालून असो नाहीतर गोळा भाजी असो.. पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर… मेथी स्वत:च्या गंधाची पदोपदी जाणीव देत असते.. अगदी दुसरे दिवशीपर्यंत…) –

इथून पुढे —-

ताकातला पालक, ताकातलं चाकवत किंवा अळूचं फदफदं… गरम गरम आंबेमोहर किंवा इंद्रायणीचा मऊसर भात, त्यावर भरपूर लोणकढं तूप… तो भात पाचही बोटांनी शिते मोडेपर्यंत कालवावा आणि एकेक घास करून त्यावर ही पातळ भाजी ओतून तो घास पुन्हा कालवावा नि पाच बोटांनी तोंडात घालावा. जिव्हा आणि आत्मा असा काही तृप्त होतो की जगणं जगणं रहात नाही.. त्याचं गाणं होऊन जातं!

बटाट्याची बातच और… वरून नशीब घेऊन आलेला… त्याचं काहीही केलं तरी सोनच व्हावं असा!

उगाच नाही राहुल गांधी बटाट्याचं सोनं बनवणारं मशीन करणार होता!

तर अशा या भाज्या… किती नावं घ्यावीत त्यांची नि किती वर्णन करावं त्यांचं?

रोजच्या जेवणात वैविध्य निर्माण करणा-या या भाज्या ” कोणती भाजी करावी? ” या रोजच्या प्रश्नचिन्हानं गृहिणींना सतावणा-या नि “अमुक भाजी करावी तर सुधानेच बरं का… ” असं प्रशस्तीपत्रक बहाल करणा-या… म्हणूनच भाजी हा गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय..

आज विविध अॅपद्वारे घरापर्यंत भाजी येते नि फ्रीजमधे ती आठवडाभर साठवलीही जाते.

पण माझ्या बालपणी ना ऐप होते ना फ्रीज… गृहिणींना रोजची भाजी रोज आणावी लागे… टी. व्ही. , इंटरनेट, मोबाईल नसण्याच्या त्या काळात रोज संध्याकाळी बाजारात जाऊन भाजी आणणे, हा एक विरंगुळा होता… रोजची वेगळी भाजी हा जसा खाद्यजीवनातील विरंगुळा तसा भाजी आणायला जाणे हा रोजच्या जीवनातला!!

माझी आईही याला अपवाद नव्हती… चेहरा धुवून, छान साडी नेसून आई पावडर, कुंकु लावायची. कानातलं घालायची… आधीच गोरीपान, निळ्या डोळ्यांची अशी छान दिसणारी माझी आई अजूनच सुरेख दिसायची. आठ-नऊ वर्षांची मी तिचं बोट पकडून तिच्या बरोबर भाजीला जायचे. वाटेत ओळखीच्या बायका भेटायच्या. त्यांच्याबरोबरच्या गप्पा व्हायच्या. मग भाजी खरेदी व्हायची.

भेंडी, दुधी, मुळा, काकडी यांना नख लावून त्यांचं कोवळेपण पारखणे, गोल, पातळ पानांची मेथी कडू नसते, वांगी किडलेली नाही नं ते पाहून कशी घ्यायची.. अशा अनेक गोष्टी मी कोणीही न शिकवता केवळ पाहून शिकले… विविधरंगी ताज्या भाज्यांतून घडणारा निसर्गाचा अविष्कार मला तेंव्हापासून आजतागायत आनंद देतोय..

“कमी पैशांत जास्तीत जास्त खरेदीचा आनंद भाज्या देतात. “. हे सत्य मला खूप लहानपणी समजलं. म्हणूनच कदाचित आजही मला इतर कोणत्याही खरेदीत रस वाटत नाही पण भाजी खरेदी मात्र मनापासून आवडते.

कधी कलिंगडासाठी तर उसाच्या रसासाठी केलेला हट्ट आणि तो पूर्ण झाल्यावर मिळालेला जग जिंकण्याचा आनंद…!! परतीला आईच्या मैत्रिणीच्या घरी जाणं, तिथे प्यालेली कॉफी किंवा सरबत… किंवा त्यांच्या पायरीवर बसून मारलेल्या गप्पा… कधी कधी बाजारात जाताना घरच्या विवंचनेनी वैतागलेल्या आईची कळी परतताना मात्र खुललेली असे!!

गवारी, घेवडा किंवा पालेभाजी निवडणे हा घरातला एक सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. आई गच्चीत किंवा घराच्या पायरीवर बसून भाजी निवडे. मी, माझी थोरली बहीण घरी असलो तर तिला मदत करायचो. भाजी निवडताना आई तिच्या लहानपणीच्या सुखदु:खाच्या गोष्टी सांगायची.. तिच्या बरोबर तिच्या आठवणींच्या सहलीत आम्हीही सामील व्हायचो… मोठ्या होताना आम्ही भाजी निवडतानाच तिची सुखं दु:खं वाटून घेतली.. नि तिनेही आमची!! .. सुखात आम्ही तिघीही हसलो नि डोळ्यातल्या पाण्याबरोबर दु:खही साजरं केलं!! … कदाचित त्या भाजीने आमच्यातील बंध अजूनच घट्ट केले..

” आज भरलेली वांगी करा “, ” उद्या चाकवताची भाजी करणार नां? ” बाबा हक्काने सांगायचे नि आई आवडीने त्या भाज्या करायची..

कधीतरी आईबाबांचं काहीतरी बिनसलेलं असायचं.. काही दिवस सारं घर शांत असायचं.. दोघांत अबोला.. त्या तणावाने आम्ही मुलेही गप्प गप्प असायचो..

एक दिवस पानात बाबांची आवडती भरल्या वांग्याची भाजी आणि तोंडलीभात दिसायचा … बाबांचं आईकडे पाहून खुदकन् हसणं आमच्या चिमुकल्या नजरांनाही जाणवायचं… आईचा चेहराही प्रसन्न व्हायचा नि अमावस्येचं सावट सरून सारं घर चांदण्याच्या शुभ्र प्रकाशात हसतं खेळतं व्हायचं!!

एकदा आमच्या कारखान्यातल्या पाठीमागच्या भल्यामोठ्या मोकळ्या जागेत भाजी लावायचं आईबाबांच्या डोक्यात आलं. रोज सकाळी बागकाम सुरू झालं.. गवा-या, दुधीभोपळे जोमाने आले.. घरी, दारी, काकांकडे रोज गवा-या नि दुधी जाऊ लागले..

सुरुवातीला सगळा आनंदीआनंद होता.. नंतर मात्र गवारी नि दुधीच्या रोजच्या वासाने जेवणावरची वासना उडू लागली..

 ” चार कानाखाली द्या पण गवारी, दुधी नको ” असे शेजारीपाजारीही म्हणू लागले नि आई बाबांच्या बागकामाच्या आवडीने निरोप घेतला..

भाजी पुराण तर झालं … पण माझी आवडीची भाजी मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं…

मला ” लाल माठाची ” भाजी भयंकर आवडायची.. मी वाटीभर भाजी नुसतीसुद्धा खायचे.. पोळी, भाकरीबरोबर अगदी गरमगरम तूप भातासोबतही मी लाल माठाची भाजी मिटक्या मारत खात असे..

एखादी रविवारची सकाळ असायची.. बाबा कारखान्यात गेलेले असायचे. भाऊ बहीण जादा तासाला किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणीकडे… मी खोलीत अभ्यास करत बसलेली.. आदले दिवशी गणिताच्या पेपरात बरेच कमी मार्क पडलेले.. आईने अभ्यास घेऊनही… आईने पाठीत घातलेले दोन धपाटे नि धरलेला अबोलाही… जगणंच फोल वाटायला लावणारा… दिवसभर नि रात्रीही डोळ्यातून न थांबणारं पाणी… आई नि माझ्यात पडलेलं हजारो मैलाचं भावनिक अंतर… नि आईचा आलेला हजारो टन राग…

आदले दिवशी रात्रीच्या जेवणावर टाकलेला बहिष्कार… त्यामुळे सकाळी पोटात उसळलेला भुकेचा डोंब..!! .. स्वयंपाकघरातून जाणवणारी आईची चाहूल… हळूच सवयंपाकघरात डोकावणं… आई विळीवर एक पाय वर घेऊन बसलेली… शेजारी स्टीलच्या चाळणीत धुतलेली लालबुंद माठाच्या भाजीची पाने… आईचं ती पाने मुठीत घेऊन विळीवर चिरणं.. चिरण्याचा येणारा चरचर आवाज… आईचे भाजीमुळे लालबुंद झालेले हात… गॅसवर ठेवलेला काळाभोर लोखंडी तवा… त्यात घातलेलं तेल नि पाठोपाठ घातलेला भरपूर लसूण… नि त्यावर घातलेली चिरलेली माठाची भाजी… चर्रर्र… आवाज नि पाठोपाठ उसळलेला स्वर्गीय सुगंध… एका बाजुला पोटातली जबरदस्त भूक नि दुसरीकडे आईवरचा राग..

“हिने मुद्दाम आज माझ्या आवडीची भाजी केलीय पण मी जेवणार नाही “… मनाशी केलेला निश्चय… आईचं खोलीत येणं नि हाताला धरून स्वयंपाकघरात ओढत नेणं! दुस-या तव्यावर टाकलेली भाकरी… आता ताटलीत टम्म फुगलेली गरमागरम भाकरी, त्यावर तूप नि कडेला मला भयानक आवडणारी लाल माठाची भाजी…

आई ताटली घेऊन माझ्याजवळ बसलेली… भाजी लावून भाकरीचा एक घास माझ्या तोंडाजवळ आईने नेलेला… मला भरवण्यासाठी..

” मला नको… मी नाही खाणार “

” असं रागावतात आईवर? आई चांगल्यासाठीच रागावते नं? आता पुढच्यावेळी जास्त अभ्यास करून छान मार्क मिळवायचे.. शहाणं माझं बाळ! आणि माझे हात पाहिले का कसे लाल झालेत.. आणि भाकरी पाहिली का.. माझ्या बांगडीची कशी नक्षी उमटलीय भाकरीवर!! “

आईचे भाजीमुळे रंगलेले हात नि भाकरीवरची तिच्या सोन्याच्या बांगडीची नक्षी पाहिली नि मला हसू आवरेना नि त्याचवेळी डोळे पाझरू लागले… आईला घट्ट मिठी मारली… आईची मऊ साडी ओलीकच्च झाली नि त्याचवेळी माझे केसही…!!

माठाने रंगलेल्या आईचे हात नि भाकरीवर उमटणारी तिच्या सोन्याच्या बांगड्यांची नक्षी आम्हा भावंडांना प्रत्येक वेळी हसवायची… यावेळी मात्र त्यांनी आम्हा दोघी़ंना रडवलं!!

दिवस कसे पळत होते ते कळलच नाही…

एके दिवशी डोक्यावर अक्षता पडल्या नि सासरचा मार्ग धरला… माहेर मागे पडलं.. नव्या आयुष्यात जुन्या गोष्टी दिसेनाशा झाल्या… सासरी रोज स्वयंपाक करायचे पण सोलापुरात ” तांबडा माठ ” मिळत नाही ही गोष्ट लक्षातही आली नाही… प्राधान्यक्रम बदलले होते..

मिरजेला माहेरी गेल्यावर आई विचारायची, ” उद्या लाल माठाची भाजी करू कां गं? “

पण त्या तारुण्याच्या बहरात आईनं केलेल्या लाल माठाच्या भाजीपेक्षा हॉटेलातील लाल रंग घातलेल्या बटर पनीर मसाल्याकडे जीव ओढला जायचा… अशावेळी त्या माऊलीचं अंत:करण नक्कीच दुखावत असणार.. पण तिने ते चेह-यावर कधीच दाखवलं नाही!

काळ पुढे जातच होता… त्याने आईच्या स्वय़ंपाक करणा-या हातांचा वेग कमी केला… आता आई फक्त भाजी निवडण्याचं काम करू शकायची…

… आणि एके दिवशी काळाने तिला पुर्णपणेच थांबवलं… नि तिला अनंताच्या प्रवासाला तो घेऊन गेला…!!

मानवी मन मात्रं अनाकलनीय असतं..

त्याचे हिशोब, त्याचं वर्तन सारं गूढ प्रदेशातलं…!!

आई गेल्यानंतर तिच्या आठवणींनी पिंगा घालायला सुरूवात केली.. ती असताना जी लाल माठाची भाजी मनाच्या पडद्याआड गेली होती… तिची रोज आठवण येऊ लागली…

… म्हणूनच वहिनीकडे फक्त लाल माठाची मागणी केली… वहिनीने आणलेला लाल माठ पाहून जीव सुखाच्या गावातून फिरून आला…

भाऊ वहिनी दुसरे दिवशी सकाळीच परत गेले… त्याच दिवशी लाल माठाची भाजी नि भाकरीचा बेत आखला… स्वयंपाकाच्या मावशींनी मी सांगितल्याप्रमाणे भाजी नि भाकरी केल्या… भाजी चांगलीच लागत होती… भाकरी तर आईच्या भाकरींपेक्षा पातळ होत्या..

 

– – पण… भाजी-भाकरी घशात अडकत होती… कारण लेकराला आनंदाने जेवताना पहाणारी माझ्या माऊलीची ती स्निग्ध नजर आज नव्हती… लाल माठाच्या भाजीमुळे लाल लाल झालेले आईचे गोरेपान हात नव्हते… नि ते पाहून वेड्यासारखं हसत सुटणारी माझी बहीण माझ्यासोबत नव्हती..

… आणि मुख्य म्हणजे पांढ-याशुभ्र भाकरीवर आईच्या सोन्याच्या बांगड्यांची नक्षी उमटलेली नव्हती!

– समाप्त –

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments