श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. १० ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
मनामनातील वेताळ ::: समारोप
विक्रम आणि वेताळाच्या गोष्टी आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकल्या असतील, वाचल्या असतील…
त्या गोष्टीतील वेताळ जसा त्या विक्रम राजास त्रास द्यायचा तसा त्रास सध्या अनेक प्रकारचे अनेक वेताळ अनेक प्रकारांनी आपल्याला त्रास देत आहेत… , छळत आहेत, नव्हे छळकपट करीत आहेत, असे आपल्या लक्षात येईल.
श्रीरामरक्षेमध्ये एक श्लोक आहे…
*”पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥”*
अर्थ: पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः – याची फोड पातालभूतलव्योमचारिण: + छद्मचारिणः अशी आहे. पातालभूतलव्योमचारिण: – पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः – कपटी, मायावी खोटे सोंग घेणारे (राक्षस)
रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे असे (पहिल्या ओळीत वर्णन केलेले) मायावी आणि कपटी राक्षस नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत.
या श्लोकाचा संदर्भ आपल्याला आज सुद्धा लागू होतो…
अनेक वेताळ आपले मायावी रूप घेऊन आपल्या मनावर अधिराज्य करीत आहेत. त्यातील मोजक्या वेताळांचे वर्णन करण्याचा प्रयत्न मी माझ्या काही लेखात केला आहे…
तरीही काही छद्मी वेताळ आपल्या मनात दडून बसलेले आहेत, त्यांचा उल्लेख जाताजाता करतो…
# अतिरेकी सर्वधर्मसमभाव
# सद्गुण विकृती
# अंधानुकरण
# कुपमंडुक वृत्ती
# मला काय त्याचे?
# चांगले आईबाप न होता लोकप्रिय पालक होण्याची चढाओढ
# विहीत स्वार्थ न पाहता वैयक्तिक स्वार्थाकडे धावण्याची वृत्ती
…
माझ्या अल्पमतीने हे वेताळ मांडण्याचा प्रयत्न मी केला. या वेताळांचा त्याग करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी माझी नम्र विनंती आहे…!
राजेश खन्ना यांच्या तोंडी आनंद चित्रपटात एक छान संवाद आहे. तो सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही…
*”बाबूमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं”*
आपल्याला जर खऱ्या अर्थाने जीवन जगायचे असेल तर मग वर उल्लेख केलेल्या आणि आपल्या मनात दडून बसलेल्या अनेक वेताळांचा आपल्याला त्याग करावा लागेल…
तसा प्रयत्न आपण खात्रीने कराल असा विश्वास वाटतो…
कोणतीही रेघ जर न खोडता छोटी करायची असेल तर त्या रेघेच्या बाजूला आणिक एक मोठी रेघ आखावी लागते…
ही रेघ विवेकाची असावी…
विवेक या शब्दाची व्याप्ती खूप विशाल आहे. आपण ती नीट समजून घ्यावी अशी प्रार्थना.
शुभेच्छा!!!
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर




