श्री सुभाष धारणकर
मनमंजुषेतून
☆ बॅंकेतल्या मुली ! – लेखक : हेमंत खेर ☆ श्री सुभाष धारणकर ☆
बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बॅंक शाखा उघडण्याचे प्रमाण वाढले आणि सेवा भरतीही वाढली. १९७४ ते १९९२ पर्यंत बॅंका, जनरल इन्शुरन्स, एल्आयसी ह्या मध्ये स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून भरपूर भरती झाली. ह्या भरतीत महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. पांढरपेशा आणि तुलनेने सुरक्षीत वातावरणातील कार्य संस्कृती मुळे ही क्षेत्रे त्यांना भावली. प्रथमच शिक्षीका, नर्सिंग, पोस्ट आणि सरकारी विभागा बाहेर एवढ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या. महिला सक्षमीकरण हा शब्द खूप नंतर आला. त्या आधीच ही शांततापूर्ण क्रांती झाली होती.
बॅंक व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी सुद्धा सहानुभूतीचा आणि काहीसा उदार दृष्टिकोन स्विकारून ह्या महिलांचे जिणे सुखकर केले.
मी १९८४ साली बॅंकेत लागलो. आमच्या बरोबरचे सहकारी जवळपास सगळे गरीब ते कनिष्ठ मध्यमवर्गीय परिवारातून आले होते.
ह्या मुली सुद्धा अशाच परिवारातून आल्या होत्या. आपल्या बरोबर काटकसरीचे, निगुतीने काम करण्याचे, पापभिरू संस्कार घेऊन आलेल्या. जबाबदारीची जाणीव असलेल्या. काही जणींनी बॅंकेत प्रेमविवाह केले. तरी बहुतांशी जणींचे विवाह पारंपारिक मार्गाने झाले. उच्छृंखलपणा अत्यंत अपवादात्मक होता. नटवेपणाही जवळपास नव्हताच (बऱ्याच जणींनी आपल्या मुलीं बरोबर वा मुलांच्या लग्नात ब्युटी पार्लर बघितले असावे)
आणि कधी काळी कुणी केलाच तर केस हाताबाहेर जाऊ न देण्याचा सर्वांचा प्रयत्न असायचा. मत्सर हा स्त्रीसुलभ असला तरिही सहकार्य आणि सांभाळून घेणं असायचं. अनेकदा सासुरवास भोगणाऱ्यांना बॅंकेत एकमेकींशी बोलून मन मोकळं करता येत असे.
आजच्या तुलनेत तेंव्हा स्वातंत्र्य कमी होतं जबादाऱ्या जास्त होत्या. मुलाबाळांचे करण्यात वेळ मिळत नसे. सासू सासरे छान आणि नातवंडांना सांभाळतायत असं दृष्य कमीच.
खरं तर आमच्या पिढीचे नशीब म्हणजे आधी आई वडिल, सासू सासरे ह्यांची सेवा आणि नंतर मुलांची सेवा.
ह्या मुलींनी हसत हसत सगळं केलं. घरं बांधली, पर्यटन केलं, कर्ज काढून वस्तू केल्या.
अपवाद वगळता फार कोणी प्रमोशनच्या मागे लागल्या नाहीत. पण ज्यांनी घेतली त्या कुठेच कमी पडल्या नाहीत.
एकेकाळी जाड आणि जड लेजर उचलणाऱ्या. काऊंटर, खुर्च्या पुरुषांच्या उंचीच्या विचाराने असत त्यावर उशा टाकून किंवा जुनी लेजर टाकून बसणाऱ्या मुली, सफाईदारपणे संगणक चालवू लागल्या. नाकावर आलेल्या चष्म्यातून स्क्रीन पाहू लागल्या.
जवळपास सर्वांच्याच मुलांनी छान शिक्षण घेतलं. देश विदेशात कर्तृत्व गाजवत आहेत.
ह्या मुलींनी काय दिलं? त्यांच्या मुळे कार्यालयात सभ्यपणा टिकून राहिला.
येणाऱ्या अडाणी महिला ग्राहकांना आधार वाटला. समाजातील महिलांचे स्थान उंचावले.
माझ्या बदल्यांच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मला आमच्या पिढीच्या ह्या प्रतिनिधी भेटल्या.
त्यावेळी लढणाऱ्या मुली आज निवृत्त होत आहेत. जवळपास सर्व जणी आज निवृत्त होऊन सासू, आजी ह्या रोल मध्ये गेल्या आहेत. आमच्या पिढीने झगडून मिळवलेली पेन्शन अजूनही त्यांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
त्यांनी चाललेल्या वाटेचा आज महामार्ग झाला आहे.
हे आज आठवण्याचे कारण म्हणजे मागच्या महिन्यात सिनकर मॅडम निवृत्त झाल्या. आणि ह्या महिन्यात लोटलीकर मॅडम निवृत्त होतील. त्यांना शुभेच्छा.
– वर सांगितलेल्या पिढीतील या बहुतेक शेवटच्या प्रतिनिधी.
त्यांना शुभेच्छा देताना हे विचार मनात आले. ते दिवस पुन्हा आठवले. म्हणून जमेल तसं लिहिलं. (काही चुकलं असेल तर कान उपटायला अजूनही अनेक जणी समर्थ आहेत.)
त्या सर्व सहकाऱ्यांना सादर प्रणाम आणि स्मरण.
—
लेखक : हेमंत खेर
प्रस्तुती : सुभाष धारणकर
बिबवेवाडी, पुणे. भ्र. ध्व. ९४२३००२९५४ ध्व. क्र. ०२०-२६९६००६४. ईमेल – address-subhashdharankar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





