संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “माणुसकीचा धर्म आणि देवधर्म..“ ☆ संध्या बेडेकर ☆
“माणुसकीचा धर्म म्हणजेच देव धर्म का?? “
सध्या पुण्यात वारीमय वातावरण. किती वाट बघतो या दिवसांची. या भव्य दिव्य उत्सवाची. महाराष्ट्रातील एक पारंपरिक सोहळा. पंधरा दिवस चालणारा हा उत्सव. लोकांचे थवेच्या थवे पंढरपूर मार्गी चालताना दिसतात. पालखी प्रस्थान सोहळा बघण्यासारखा असतो. जागोजागी त्यांचे स्वागत, त्यांची व्यवस्था बघणारे सेवेकरी सज्ज असतात. ‘फूल नाही फूलाची पाकळी’ समजून, आपली सेवा म्हणून, लोक श्रध्दाभावाने साधारण जनमाणूस हे सर्व करतो. स्वतः ला धन्य समजतो. मी वारी करू शकत नाही. तेंव्हा जेवढं जमेल तेवढं करावे, अशा विचाराने मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा.
पंढरपूर वारी म्हणजे अगदी भक्तिमय वातावरण. विठ्ठलाचा नामगजर, माऊली माऊली चा उदघोष आसमंतात दुमदुमतो. ही वेळ म्हणजे जणू काही वातावरणाचे शुध्दीकरणच चालू आहे असे वाटते. एक वेगळीच उर्जा अनुभवायला मिळते. बातम्या वर्तमानपत्रात अनेक माहिती, घटना ऐकून, प्रमूख पाहुण्यांचे विचार वाचून / ऐकून आपल्याही विचारांत परिवर्तन नकळत होते. नकळत हात जोडले जातात. थोड्या प्रमाणात का होईना घर गृहस्थीतून बाहेर पडून मनात वेगळे विचार येतात. वारी ला जाता आलं नाही म्हणून लोकांची तगमग बघून त्यांच्या श्रद्धेचा अंदाज येतो.
माझी पण देवावर खूप श्रद्धा आहे. देवाचे रोज मी अनेकदा आभारही मानते. मला खूप साग्रसंगीत पूजा करता येत नाही. म्हणजे अगदी साधी रामरक्षा म्हणताना सुद्धा माझे लक्ष इथे तिथे जाते. त्या पाच मिनिटांत पाचशे विचार मनात येतात. मला नेहमी वाटतं जर भक्तांची देवासमोर लाइन लावली तर माझा नंबर कुठे लागेल बरं?? बहुतेक सगळ्यात शेवटचे स्थान मिळेल का मला??
मी वारी करू शकत नाही हे मला चांगले माहीत आहे. माझी शारीरिक शक्ती कमी झाली आहे. किंवा भक्तित तेवढी शक्ति नसावी. मला जमणार नाही असे मात्र वाटते. आपल्याला जेवढं शक्य आहे, आपल्या क्षमतेप्रमाणे देवधर्म करावा. असे मी खूपदा ऐकलंय. वाचलंय. मी माझ्या करिता हाच नियम पाळते.
माझ्या आजीचे एक वाक्य माझ्या मनावर बिंबलेले आहे, ते म्हणजे, आजी म्हणायची,
“मी माणुसकी चा धर्म पाळते. ” तो धर्म मी लक्षपूर्वक, विचार पूर्वक पाळू शकते. माझ्या सहवासात येणाऱ्या लोकांशी चांगले वागायचे. जमेल तेवढी मदत करायची. हेच माझं आयुष्यातील ध्येय मी ठरवून टाकले आहे. मलाही आजीचे हे विचार, म्हणणे पटले.
खरच लक्ष देऊन बघीतल तर माझ्या आजूबाजूला खूप माऊली दिसतात. पंढरपूर ला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही. पण माझ्या आजूबाजूला बऱ्याच माऊलींचे दर्शन मला रोज घडते. मला रोज दूधाचे पॅकेट घरपोच देणारा ‘अजिंक्य’, मला घर कामात मदत करणारी ‘साक्षी ‘, ‘मंदाताई ‘, माझ्या घरचा कचरा घ्यायला येणाऱ्या ‘मावशी ‘. रोज न चूकता आपले काम व्यवस्थित पार पाडतात. सर्वांनी कोरोनाच्या कळातही स्वतः चा जीव धोक्यात घालून आमची सेवा केली. मला या नेहमी म्हणायच्या “काकू स्वतः ला जपा. बाहेर निघू नका. काळजी घ्या. “
नाइलाजाने काम करायला घरा बाहेर निघणाऱ्या या माऊली, स्वतः रोज रिस्क घेऊन बाहेर पडतात, तरीही दुसऱ्यांचा विचार करतात. दुसऱ्यांची काळजी घेतात. देवाच्या रूपात असणाऱ्या या माऊलीचे मला रोज दर्शन होते. फक्त पंढरपूर वारी काळातच नाही तर नेहमीच या सर्व माऊली, माझे सख्खे शेजारी माझ्या आजूबाजूला आहेत. हे सर्व माझ्या extended family चेच मेंबर्स आहेत..
देवाला बघीतले नाही. पण देवाचे representative बरेच दिसतात. कोरोना काळात तर माणसातल्या देवाचे दर्शन झाले. जिव्हाळ्याचे ॠणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येतं नाही. माझे व यांचे पूर्व जन्मीचे काही तरी संबंध नक्कीच असावेत. आपणही नेहमी त्यांच्या समाधानाचा हिस्सा असावं. समस्याचां नाही. त्यांच्या बद्दल आदर असावा.
ही माझ्या’ contact ‘मधे असणारी सर्व मंडळी माझ्या ‘connection’ मधे पण आहे. जीवाभावाचे नाते आहे आमचे. माझा त्यांच्या शी संपर्क आहे, संवाद आहे. आम्ही एकमेकांना समजतो. जाणतो.
हा माणुसकीचा धर्म पाळला तर देवधर्म झाला का??
आपल्या आजूबाजूला समाधान, आनंदी वातावरण ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा एक चांगला संसर्गजन्य रोग आहे जेवढा पसरेल तेवढा चांगला.
“We rise by lifting others “.
म्हणतात ना,
“मधूर संबंध ज्ञान और पैसे सेभी बड़ा होता है।जब ज्ञान और पैसा विफल हो जाता है, तब मधूर संबंध से स्थिति संभाली जा सकती हैं ।”
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




