श्री दिवाकर बुरसे
☆ राग मल्हार (महुडे) ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
बघता बघता आकाश काळ्या कुट्ट ढगांनी भरून गेले. पिसाट वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू झाला.
रानात मोर आपले पिसारे फुलवून, माना उंचावून, म्याँव, म्याँव करीत आनंदाने केकारव करू लागले. क्षणातच पावसाच्या टपो-या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. बहुप्रतिक्षित वर्षाऋतुचे हवेहवेसे वाटणारे विभ्रम सुरू झाले! पाऊस आला, पाऊस आला!!
हा भावनाविष्कार
साकार करी मल्हार।।
टीप :- आई मुलाला लाडाने जसे “बबड्या, छबड्या” म्हणते तसे मल्हार या लोकप्रीय रागाला काहीजण “महुडे” या लाडक्या नावाने संबोधितात. (ही माहिती कवी कै. वसंत बापट यांच्याकडून मी ऐकली होती.)
☆ राग मल्हार (महुडे) ☆
☆
मत्त गजांसम धुंद गडद घन घुमती गगनात
मूर्तिमान मल्हार दाटला आज सकल विश्वात।।धृ।।
*
घुमती सागर, घुमति पयोधर, घुमती वादळवारे
मंदिरात जणु मृदंग घुमती, घुमती कडे-कपारे
काळ नागिणीपरी धावती सरिता फेसाळत
मूर्तिमान मल्हार दाटला आज सकल विश्वात।।१।।
*
रत्ने तोलित मोर नाचती धारांच्या तालात
लयकारी पाहून तयांची बिजली स्तिमित मनात
स्थिरावल्या त्या बलाकमाला थकुनी दूर वनात
मूर्तिमान मल्हार दाटला आज सकल विश्वात।।२।।
*
धडका देती डोंगरमाथी मेघ झिंगल्यापरी
प्रियकर स्मृतीने धडके काळिज सखिचे वरचेवरी
काय करिल परी खुळी! झाकळे ‘महुडे‘ नयनात
मूर्तिमान मल्हार दाटला ‘असा‘ सकल विश्वात।।३।।
गीत रचना : श्री दिवाकर बुरसे
🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





