श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ५ ☆ श्री संभाजी बबन गायके 

देवाची गाडी!

 पंढरीची वारी म्हणजे पायी प्रवास हे समीकरण साहजिकच आहे. ज्या काळात वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या त्या काळात वारकरी संपूर्ण प्रवास पायीच करीत असत. पण कालांतराने वारक-यांची संख्या वाढली, वाटेतील मुक्काम, भोजन व्यवस्था आपली आपण करण्याची गरज भासू लागली तसे सोबत वाहन ठेवणे आवश्यक झाले. त्यामुळे आरंभी पालखी सोहळ्यासोबत लोक बैलगाडी, टांगा अशी वाहने आणीत. या वाहनांमधून साहित्याची आणि गरज पडेल त्यानुसार माणसांची वाहतूक होऊ लागली.

पुढे मोठी स्वयंचलित वाहने उपलब्ध झाल्यावर उत्तम आर्थिक परिस्थिती असलेल्या दिंडीचालकांनी टेम्पो, ट्रक अशी वाहने सोबत घेण्यास सुरुवात केली. यात आरंभी trolly असलेला tractor फार लोकप्रिय आणि सोयीचा होता. अजूनही त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो.

या वाहनांमध्ये दिंडीला आवश्यक असणा-या सर्व साहित्याची वाहतूक करणे किफायतशीर ठरते. तंबू, स्वयंपाक, किराणा इत्यादी साहित्य, दिंडीत पायी चालणा-या वारक-यांच्या पिशव्या हे सर्व या वाहनांत ठेवले जाते. ही वाहने म्हणजे एकाअर्थाने दिंडीची कार्यालयेच ठरतात. ज्यांना पायी प्रवास झेपत नाही, किंवा प्रकृती खालावते असे वारकरी काहीवेळा या वाहनांतून वारीचा प्रवास करत असतात. वारीहून घरी परतण्यासाठी तर हमखास हीच वाहने वापरली जातात.

दानशूर लोक दिंडीसाठी स्वत:ची वाहने देऊ करतात. किंवा ही वाहने भाड्यानेही घेतली जातात. काही मालक, चालक केवळ इंधनखर्च, चालकाचे वेतन एवढा खर्च दिला तरी चालेल, अशा भावनेने वाहनसेवा रुजू करतात.

आज समजा पालखीचा मुक्काम सासवड येथे असेल तर दिंडीची ही वाहने पुण्यातून पालख्या निघण्याआधी निघून हडपसर येथील दुपारच्या भोजनाची जागा गाठतात. दुपारची जेवणे उरकली की, सोहळा निघण्यापूर्वी ही वाहने सासवडकडे रवाना केली जातात. वाहनांची संख्या आणि लोकांची संख्या जास्त झाल्याने बरेचदा रस्त्याच्या एका बाजूने दिंडी चाललेली आहे, आणि शेजारून दिंडीची वाहने चाललेली आहेत, असे दृश्य दिसते.

दुपारच्या भोजनाच्या ठिकाणी वाहनांतून आणलेल्या वस्तूंच्या साहाय्याने स्वयंपाक केला जातो. वाहने मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तंबू ठोकले जातात. तंबूची जागा आधीच राखून ठेवलेली असते. त्यासाठी दिंडीचालक वारी आधी संबंधित व्यक्तींच्या, संस्थांच्या भेटी घेऊन व्यवस्था ठरवून घेतात. पंढरपुरात ब-याच गावांच्या, दिंड्या यांच्या स्वत:च्या मालकीच्या धर्मशाळा आहेत. पण इतर लोकांना मात्र मोकळ्या जागांत तंबू ठोकावे लागतात.

या वाहनांसोबत स्वयंपाकासाठी आचारी, त्यांचे साहाय्यक प्रवास करीत असतात. बहुतेक वेळा ही मंडळी अल्प मानधनावर आणि देवाची सेवा म्हणून हे काम करीत असतात. काही श्रीमंत दिंड्या स्वत:चे मोठे कामगार पथक सोबत घेऊन चालतात. यात वीज व्यवस्था, तंबू व्यवस्था, भोजन व्यवस्था त्यामानाने काहीशी वरच्या दर्जाची असते. काही ठिकाणी तर प्रत्येक तंबूमध्ये ट्यूब लाईटस, गाड्या, खुर्च्या आणि इतर वीजव्यवस्थाही करण्यात येते. अर्थात बहुतांश ठिकाणी वीज महामंडळाच्या तारांवर धातूच्या तारांचे आकडे टाकून वीज घेतली जाते… कारण तंबू माळावर, उघड्या जागी टाकलेले असतात. अशावेळी अधिकृतपणे वीज जोड घेता येणे शक्य नसते. अर्थात वाढत्या शहरीकरणामुळे हे प्रकार कमी झालेले आहेत. पूर्वी कंदिलाच्या उजेडात काम केले जाई. त्यामुळेच आजही दिंडी वाहनांच्या बाजूला कंदील दिसतात, पाण्याच्या बादल्या, तंबूचे साहित्य दिसते.

वारी काळात त्या त्या शहरांत gas cyllinders, रॉकेल, जळणासाठी लाकडे अशी व्यवस्था शासकीय पातळीवर माफक दरांत केली जाते. स्वयंसेवी संस्था सुद्धा अनेक सुविधा पुरवतात. हल्ली मोबाईल चार्जिंग व्यवस्थाही महत्त्वाची ठरलेली आहे.

वाहनांचे चालक, साहाय्यक सुद्धा या काळात वारक-यांच्या भूमिकेत दिसतात. हे लोक स्वयंपाक, दिंडीप्रवास यांत साहाय्य करताना दिसतात.

पालखी मार्गावर त्या त्या दिवशी केवळ दिंडीच्या वाहनांना प्रवेश दिला जातो. या वाहनांवर दिंडीचे फलक, पताका लावलेल्या दिसतात. हल्ली या वाहनांना टोल माफीही दिली जाते.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून पंढरपूरला पोहोचण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या (एस. टी.) बसेसशिवाय पर्याय नव्हता. इंग्रज काळात १९५९ मध्ये पुणे ते बार्शी अशी रेल्वे व्यवस्था निर्माण झाली. पुढे पुणे ते सोलापूर अशी रेल्वे १८६० मध्ये सुरु झाली. पण सोलापूरहून पंढरपूर तसे बरेच दूर आहे. त्यामुळे तिथून एस. टी. ने जाण्याशिवाय पर्याय नसे. पण दूर मराठवाड्यातील लोकांना पंढरीस येण्यासाठी रेल्वे उपलब्ध नव्हती.

एवरार्ड कॅलथोर्प नावाच्या हुशार, मेह्नती इंग्रज अधिका-याच्या अथक परिश्रमांतून बार्शी ते पंढरपूर अशी narrow guage अर्थात दोन रूळांमध्ये कमी अंतर असलेली रेल्वे सेवा सुरु होऊ शकली. मराठवाड्यातील प्रवाशांसाठी (बार्शी) मिरज ते लातूर असा मार्ग सुरु केला गेल्याने खूप भाविकांची सोय झाली. कुर्डूवाडीनंतर पुढे या गाडीसाठी पंढरपूर रेल्वे स्टेशनची उभारणी झाल्यावर या गाडीला देवाची गाडी हे नाव चिकटले. या गाडीत केवळ सामान्य बैठक व्यवस्था होती. तिकीटदर माफक होते. आणि वेग अतिशय कमी. म्हणजे गाडीतून उतरून जाऊन आपले एखादे छोटे काम उरकून थोडेफार पळत जाऊन ही गाडी पकडता येत असे. आणि लोकांना फार घाईसुद्धा नसे. वारकरी गाडीच्या डब्यातच भजनाचा फड उभारीत आणि संपूर्ण प्रवास नामस्मरणात पूर्ण होई. असो.

पंढरीला देहू-आळंदीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून पायी दिंड्या येत असतात. काही दिंड्या तर कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतूनही येतात. अर्थात या दिंड्यांसोबत चालणा-या लोकांची संख्याही कमी असते. सर्वच दिंड्यांना पोलिस बंदोबस्त देणे शक्य होणारे नसते. या दिंड्या महामार्ग, राज्य मार्ग इत्यादी रस्त्यांवरून प्रवास करीत असतात. बहुदा प्रवास पहाटे लवकर सुरु केला जातो, आणि काही वेळा रात्री उशीरा, अंधार पडेपर्यंत सुरु असतो. दिंडीसोबत चोपदार आणि शिपाई लोक चालत असतात, आणि हे लोक वाहतुकीपासून दिंडीचे संरक्षण करतात. पण अशा कमी संख्येन चालणा-या, अंधारात चालणा-या दिंड्यांमध्ये रस्त्यावरून धावणारी वाहने घुसून अपघात घडल्याची उदाहरणे बरीच आहेत. यात काही बळीही गेलेले आहेत. देहू, आळंदी, शेगाव, त्र्यंबकेश्वर, पैठण येथून येणा-या मोठ्या दिंड्यांच्या बाबतीत असे अपघात झाल्याचे फारसे प्रकार ऐकिवात नाहीत. कारण गर्दी पाहून वाहन चालक काळजीपूर्वक वाहने चालवतात, पोलिस बंदोबस्त असत, शिवाय दिंडी सोबतचे कार्यकर्ते, चोपदार, शिपाई शिस्त सांभाळत असतात.

दिंड्यांसोबत छोटे टेम्पो, मध्यम आकाराच्या ट्रक्स आणि काहीवेळा गरजेनुसार मोठे ट्रक्स असू शकतात. त्याच प्रमाणे शासकीय पाणी पुरवठा व्यवस्थेची वाहने, आरोग्य विभागाची वाहने, पोलिसांची वाहने, खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांची वाहने, हौशी प्रेक्षकांची वाहने असतात. शिवाय संबंधित मार्गांवर नेहमीची प्रवासी वाहतूक सुरूच असते. फक्त गरजेनुसार मार्गांचे नियोजन केले जाते.

पूर्वी ही वाहने रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण अधिक होते. वारीपूर्वी वाहनांची पूर्व तपासणी करून घेण्याची अट असल्याने आता हे प्रकार फारसे दिसत नाहीत. माल वाहतुकीच्या वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास कायद्याने मज्जाव असला तरी मोठी संख्या, जनमताचा दबाव या काही कारणांमुळे प्रशासनाला या नियमाकडे डोळेझाक करावी लागते, हेही खरे आहे!

१३ जुलै, २०२६ रोजी सासवड ते जेजुरी मार्गावर एका दिंडीमध्ये ट्रक घुसून काही वारकरी मृत्युमुखी पडल्याची, जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर ट्रक हा त्या दिंडीचाच, त्यांच्या लोकांची, मालाची वाहतूक करणारा होता असे समजते. वाहनचालक वयस्कर असून, त्यांना अचानक प्रकृती खालावल्यामुळे वाहन नियंत्रणात ठेवता आले नाही, व सदर वाहन दुर्दैवाने पायी चालणा-या बिचा-या महिला वारक-यांना चिरडत पुढे गेले. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली! ही परिस्थिती त्यावेळी तरी मानवी नियंत्रणात नव्हती, असे निदर्शनास आले आहे. या पुढील काळात चालकांची आरोग्य तपासणी आणि इतर सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा आहे! पूर्वी हत्ती दिंडीसोबत आणला जाई. पण त्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर प्रतिबंध आणले गेले आहेत. दिंडीरथाला जोडलेले बैल, घोडे यांच्यामुळे सुद्धा काहीवेळा अपघात घडतात. पण हे प्रमाण अतिशय कमी आहे. दरवर्षी अनुभवातून सुधारणा केल्या जातात. अधिकृत दिंडीत चालणा-या वारकरी मंडळीची स्वयंशिस्त उत्तम असल्याने चेंगराचेंगरीचे प्रकार सहसा होत नाहीत. पण संख्याच मोठी असल्याने वारीचे नियोजन खूप अवघड बनले आहे. सोहळा ज्या ज्या जिल्ह्यांतून जातो, त्या त्या जिल्ह्यांतील पोलिसांकडे सोहळ्याला संरक्षण देण्याची जबाबदारी दिलेली असते. पोलिसांत महिला पोलिसांची संख्याही नजरेत भरण्यासारखी मोठी असून त्यामुळे महिला वारकरी, भाविक यांचे उत्तम संरक्षण होते. वारीत चोरांची संख्याही बरीच असते. पोलिसांमुळे यावर खूप नियंत्रण आलेले आहे.

सासवड-जेज्रुरी मार्गावर झालेल्या या दुर्दैवी अपघातात जीव गमवावा लागलेल्या वारकरी भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली! यापुढे अधिक काळजी घेतली जाईल, ही अपेक्षा! रामकृष्णहरी!

– लेख क्र. ५ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted