डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “प्रिय जुलै महिना…!!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रिय जुलै महिना,

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष…?

कालच तू निघून गेलास, पण आजही तुझी आठवण आली म्हणून हा पत्र प्रपंच…? 

महिनाभर राहून गेलास, आपण बोललो – भेटलो तरीही मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्याच राहून गेल्या, त्या सांगण्यासाठी हे आंतरदेशीय पत्र तुला टाकत आहे.

हल्ली पत्राचा जमाना गेला, पण आपल्यापासून सुरुवात करायला काय हरकत आहे…?

… लहानपणी मी खूप पत्र लिहायचो… ते फिकट निळं, आभाळाच्या रंगाचं आंतरदेशीय आणायचं, कुणी येणार नाही अशा ठिकाणी खोलीचा एक कोपरा पकडून बसायचं, संध्याकाळ नंतर नक्षीदार चांदण्याची काळी साडी नेसून रात्र जशी नकळत येते… इतका वेळ कुठ्ठेही दिसत नसलेला चंद्र, रात्रीच्या भाळावर चांदीच्या बंद्या रुपयागत जसा अचानकपणे नकळतच चमचमतो, तसे शब्दही नकळत चमचम करत मनात यायचे रे…? 

… पिकात सोडलेलं पाणी जसं जमिनीत मुरतं, तसे सुचलेले शब्द मनात मुरायचे, खडे मीठ टाकून आंब्याच्या कोयीसकट, माठात घातलेल्या पिवळ्याशार लोणच्यासारखे…? 

… रानात पेरणी करावी आणि एक दिवस अचानक उठून बघावं आणि इतके दिवस काळ्याशार दिसत असलेल्या मातीत अचानक हिरवे कोंबच कोंब दिसू लागावेत… काळी मातीच जणू हिरवी होऊन जावी, तसं ते निळं पत्र माझ्या मनातल्या भावनांनी हिरवं होऊन जायचं…? 

शेवटी पत्राच्या एका कडेला जिभेवरून फिरवून थोडं ओलं केलं किंवा भाताची चार शितं या कडेवरून त्या कडेवर बोटानं लावली की, आधीच लावलेला डिंक मनातल्या मनात हरखून जायचा… भात खाऊन पोट भरल्यागत…?!!

हरखून, विरघळलेला तो डिंक पत्र घट्ट चिटकवायचा आणि नाती सुद्धा…? 

… नाती टिकवायला प्रेमाची चार शितं आणि थोडा मायेचा ओलावा लागतो हेच खरं…? 

पत्र लिहून झालं की, हाफ चड्डी सावरत, गावातल्या गल्लीबोळातनं फिरून, पत्र “पोष्टाच्या लाल पेटीत” टाकायला दुडक्या चालीनं पळत सुटायचो… पोस्टाची ती आsss करून उभी असलेली लाल पेटी, अजूनही मनात घर करून आहे रे… लहानपणी ती आsss करून उभी असलेली लाल पेटी दिसायची…

… आज आsss करून उभी असलेली उघडी नागडी चिल्ली पिल्ली दिसतात… पोटात भुकेचा वणवा पेटलेला… तो ही लालच…? 

.. ये लाल रंग कब मुझे छोडेगा…???

असो, यावेळी तू आणलेला पाऊस आम्हाला खूप आवडला. आम्ही तो पुरवून पुरवून वापरत आहोत.

कुणाला भिजवून गेला, तर कोणाची तहान भागवून गेला…

शेतकऱ्यांची चूल पेटवून गेला…? 

तुला सांगायचं राहिलं,

… आपल्या गावात ज्यांच्याकडे धड कपडे नाहीत किंवा घरं नाहीत, रस्त्यावर राहतात अशा सर्वांना रेनकोट आणि छत्र्या दिल्या आहेत, काळजी नसावी.

… आपल्या घरामागे जी गल्ली आहे ना, तिथल्या एकाने त्याच्या अपंग आईला, घराबाहेर काढले, तिला व्हीलचेअर दिली.

… त्याचं बघून दुसऱ्याने त्याच्या वडिलांना बाहेर काढलं, ते आजारी होते, पायाने अधू होते. त्यांना हाताने चालवायची तीन चाकी सायकल घेऊन दिली आहे. गंमत बघ, पूर्वी बाबा आपल्या लहान मुलांना तीन चाकी सायकल घेऊन द्यायचे, आज बाबांना तीन चाकी सायकल घेऊन देताना मला काय वाटलं असेल, हे शब्दात नाही सांगू शकत जुलै…

– – तर घराबाहेर काढलेल्या या आई-बाबांना भेटायला गेल्यानंतर जाणवले, त्यांच्यासारखे अनेक जण रस्त्यावर राहत होते… नाईलाजाने जगण्यासाठी याचना करत होते.

वेळ – मित्र – नाती यांना किंमतीचं लेबल नसतं पण हरवल्यावर त्यांचं मोल कळतं जुलै…

… ज्या आई-बाबांना, त्यांच्या मुला-मुलींनी घराबाहेर काढलं आहे, त्यांना आईबापाचं मोल कधी कळेल रे…?

.. या सर्वांनाच रस्त्यावरच गोळ्या औषधं दिली आहेत, रक्त लघवी तपासण्या केल्या आहेत, कुणाला कुबडी, कुणाला काठी, तर कुणाला मानेचे – कमरेचे पट्टे गरजेप्रमाणे दिले आहेत. जे मला रस्त्यात करायला जमत नाही अशा सर्वांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे.

तुला “तो” आठवला का…? हां… “तोच तो”…

त्याने आता टगेगिरी, मारामारी या सर्व गोष्टी सोडल्या आहेत. काम करू लागला आहे. परवा त्याच्या लग्नाला जाऊन आलो, तुझी आठवण काढत होता. सासरी जाताना मुलीच्या वडिलांना काय वाटेल, म्हणून स्वतःच रडणारा तो हाच तो, त्याच्या भावनांना सलाम करणारा मीच तो…? 

तुला तर माहीतच आहे, आपल्या गावात जे लोक असे बाहेर राहतात आणि याचना करतात त्यांना गोळा करून आपण त्यांच्याकडून जेवढा जमेल तेवढा गावाचा भाग झाडून पुसून स्वच्छ करत आहोत. या संपूर्ण टीमला आपण “खराटा पलटण” असं नाव दिलं आहे.

.. दर आठवड्याला अशी स्वच्छता करून प्रत्येकाला महिनाभर पुरेल इतका किराणा दिला आहे.

.. आई स्वरूप अनेक माऊली होत्या, त्यांना नवीन साड्या दिल्या आहेत.

अरे हो, लहान लहान मुलांनी, जुलै काका कुठे गेला? जुलै काका कुठे गेला? असं म्हणत मला भंडावून सोडलं, मग त्यांची समजूत काढण्यासाठी काकांनी हे लाडू पाठवले आहेत, असं सांगून रस्त्यावरील सर्व चिल्ल्या पिल्लांना लाडू दिले.

आपल्या गावातले जे लोक सध्या कुठे ना कुठे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांना डबा आणून देणारं कुणीही नाही, अशा सर्वांना आपण जेवणाचे डबे पोच केले आहेत, त्याचप्रमाणे आपल्या गावातले जे लोक रस्त्याकडेला पडून आहेत, त्यांनाही जेवण दिले आहे. मागच्या पाच वर्षांपासून आपण रोजच्या रोज हे करत आहोत.

तुला माहित आहे ना जुलै… अनेक पालक घरातल्या लहान मुलांना शाळेत न टाकता, आपल्या मुलांना घेऊन भीक मागायला आपल्या गावातल्या धार्मिक स्थळांच्या बाहेर जमा होतात.

.. अशा अनेक पालकांना भेटून त्यांच्या संमतीने त्यांच्या मुलांना भीक मागणे सोडायला लावून त्यांना शाळा कॉलेजात घातले आहे.

… यावर्षी अशा साठ मुला मुलींना आपण शैक्षणिक मदत केली.

तुला ती चिंगी माहितीय…? तान्ही असल्यापासून तिची आई तिला भीक मागायला घेऊन जायची, यावर्षी आपण तिला नर्सरी मध्ये टाकलं आहे. तो पिंट्या… त्याला टॅलीचे क्लासेस लावले… ती पिंकी आठवते का तुला…? जुलै काका मला गाडीवर चक्कर मार असं म्हणणारी… हां तीच, तीला एमबीएला ऍडमिशन घेऊन दिलं आहे… अजून एकीला आयएएस व्हायचं आहे, हायस कुटं दोस्ता…?

– – सर्वात महत्त्वाची गोष्ट, भीक मागणाऱ्या ज्या लोकांना भीक मागणे सोडायचे आहे अशांसाठी आपण एक रोजगार केंद्र (Employment Centre) सुरू केलं आहे. तिथे आपल्या या लोकांच्या साथीने परफ्युम, कृत्रिम मोती आणि फुलांचे बुके, कापडी पिशव्या आणि लिक्विड वॉश अशा गोष्टी तयार करत आहोत, या सर्व वस्तूंच्या विक्रीतून आलेले पैसे त्यांचा पगार देण्यासाठी वापरत आहोत.

.. सध्या पंधरा ते वीस लोक या प्रकल्पात काम करत आहेत, ते कष्टकरी होऊन गावकरी झाले आहेत, याचा आनंद आहे… आणखीही अनेक लोकांना काम करण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना पगार देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, ही खंत सुद्धा आहे.

.. थोडा वेळ जाऊ दे, होईल सर्व व्यवस्थित, मैं समय हुं… असं तूच म्हणतोस ना जुलै…?

 तुझ्यावर विश्वास आहेच आणि आम्ही प्रयत्न सोडणार नाही, यावर विश्वास ठेव? 

 – – तू म्हणशील हे सर्व करतंय कोण…?

.. तर, मी तुला लिहिलेलं हे माझं पत्र जे आत्ता वाचत आहेत, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…? 

.. ज्यांनी दुसऱ्याच्या “वेदना” समजून घेऊन “वैद्य” होण्याचा प्रयत्न केला, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…?!

.. ज्यांनी स्वतःचे हात मला दान दिले आहेत, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…?!!

– – या सर्वांचे हात घेऊन, मी आणि मनीषा काम करत आहोत, ज्यांच्या समोर आम्ही कायम नतमस्तक होतो, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…

आता हे आंतरदेशीय पत्र पुरे करतो, जिभेनं ओलं करून, भाताची चार शीतं लावून, पत्र टाकायला पुन्हा पोस्टाच्या पेटीकडे पळत जायचं आहे…? 

… जाता जाता एक सांगतो, तू गावातून गेल्यानंतर आज आमच्याकडे ऑगस्ट रहायला आला आहे.

.. तो येताना श्रावण घेऊन आला आहे, अनेक सणवार तो आम्हांला भेट देणार आहे.

मित्रा जुलै, तू सुद्धा वारी आणि आषाढी एकादशी घेऊन आलास. सर्व वातावरण भक्तीमय झालं होतं… अजूनही आहे… कायम राहील…? 

… पण आम्ही काही उपवास केला नाही, कारण आम्ही रोजच पोटभर उपास करतो…

… भंगलेल्या मूर्ती काही दिवसात पुन्हा उठून उभ्या राहून, जेव्हा आशीर्वादाचे दोन शब्द माझ्या झोळीत टाकतात, अभंग मी तिथेच अनुभवतो…

… चंदनाची उटी नाही, माझ्याकडे मलमाची वाटी आहे… जखमांमुळे सडत चाललेले पाय, जेव्हा बरे होऊन चालायला लागतात, त्यांच्या पायाने जणू मीच वारी करतो…

… माझ्या हातातला स्टेथोस्कोप टाळ होतो आणि त्यांच्या हृदयातली धडधड मृदंग… भजन मी इथेच अनुभवतो…

… जीर्ण आणि जराजर्जर झालेल्या वृद्ध शरीरांवर मी भक्ती करतो, मग त्यांच्या कायेमध्येच मला विठ्ठल दर्शन देतो…

– – – म्हणून मग मी नाही गाठला चंद्रभागेचा तीर… ना गाठले पंढरपूर…

कळावे, लोभ असावा.

तुझा मित्र,

अभिजीत 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted