तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ अनोळखी गुरू…  ☆ तृप्ती देव ☆

गुरुपौर्णिमेच्या दिवस होता ऑफिसमधून परतताना एसटी स्टँडवर नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती.

एका बाकावर मी आणि एक वृद्ध गृहस्थ शांतपणे बसले होतो. साधा पांढरा कुर्ता, हातात जुनी कापडी पिशवी आणि डोळ्यांत विलक्षण शांतता. एकीकडे माझ्या शेजारी एक तरुण सतत मोबाईलवर ओरडत होता. बाबा तुम्हाला काहीच कळत नाही, प्रत्येक गोष्टीत सल्ले देऊ नका, मी आता लहाना राहिलेला नाही, माझं आयुष्य मी स्वतः बघेन, तुम्ही उगाच माझ्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणं बंद करा, असा रोजचाच त्रास झालाय मला तुमचा, असं रागारागाने बोलून त्याने फोन कट केला. त्याच्या चेहऱ्यावर संताप आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. माझ्या मनालाही वाटलं की आजकालची मुलं आईवडिलांचा आदरच करत नाही. कोणाची परिस्थिती कशी आणि मनस्थिती मला ओळखता. येत नव्हती. नक्की काय झालं हे कळत नाही. पण एका बापाची काळजी समजत होती. कुठलातरी ताण मुलाच्या मनावर होता त्याच्या शब्दातून तो जाणवत होता.

तेवढ्यात समोर बसलेले आजोबा उठले आणि त्या मुलाजवळ गेले. ते रागावले नाहीत किंवा त्यांनी उपदेशही केला नाही. त्यांनी फक्त अत्यंत आपुलकीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की बाळा एक विनंती करू. तो चिडून म्हणाला की काय. आजोबा हसले आणि म्हणाले की आज घरी गेल्यावर बाबांच्या खोलीत जा, ते झोपले असतील तर त्यांच्या पायाशी दोन मिनिटं शांत बस. तो हळूच हसला आणि म्हणाला की त्याने काय होणार. आजोबा अतिशय हळुवार आवाजात म्हणाले की काही नाही झालं तरी चालेल,

पण एक दिवस असा येईल की त्या खोलीत पलंग असेल, उशी असेल, त्यांच्या चप्पलाही दारात तशाच असतील, त्यांचा कपड्यांचा वासही खोलीत असेल, फक्त हाक मारायला बाबा नसतील आणि त्या दिवशी पश्चात्तापाचे अश्रू ढाळले तरी ती गमावलेली दोन मिनिटं जगातील संपूर्ण संपत्ती दिली तरी विकत मिळत नाहीत. क्षणभर संपूर्ण स्टँडवर गहिवरलेली शांतता पसरली. त्या शब्दांचा थेट त्याच्या हृदयाला स्पर्श झाला.

आईवडिलांचं असणं हे किती मोठं छत्र असतं आणि आपण काय गमावून बसू शकतो याची जाणीव त्याला झाली. त्याच्या डोळ्यात क्षणार्धात पाणी आलं. त्याने थरथरत्या हातांनी पुन्हा फोन काढला आणि बाबांना फोन लावला. यावेळी त्याचा आवाज पूर्णपणे बदलला होता, गळ्यात हुंदका दाटून आला होता. तो कातर आवाजात म्हणाला की बाबा मला माफ करा, मी खरंच खूप चुकलो, मी आत्ताच घरी येतोय, आज आपण एकत्र बसून चहा पिऊया आणि मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. फोनच्या दुसऱ्या टोकाला काय उत्तर आलं माहीत नाही, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर पश्चात्तापानंतरचं एक वेगळंच समाधान आणि हसू होतं. मी त्या आजोबांकडे पाहिलं आणि विचारलं की तुम्ही शिक्षक आहात का. 

ते हसले आणि म्हणाले की नाही बाई, मी फक्त आयुष्याकडून शिकलेला विद्यार्थी आहे. इतकं बोलून ते गर्दीत बस मधे चढून निघून गेले. मी त्यांचं नावही विचारू शकले नाही. आज अनेक वर्षांनीही गुरुपौर्णिमा आली की मी देवापुढे दिवा लावते, पण त्याआधी घरातल्या माणसांसोबत दहा मिनिटं बसते. कारण त्या अनोळखी वृद्धाने मला शिकवलं की गुरू तो नसतो जो मोठमोठी प्रवचनं देतो, गुरू तो असतो जो एका वाक्यात आयुष्याचा आणि नात्यांचा अर्थ बदलून टाकतो. त्या अनोळखी माणसाचं नाव मला आजही माहीत नाही, पण प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी मनात त्यांना नमस्कार करते. कारण काही गुरू पुस्तकात भेटतात, काही मंदिरात आणि काही अचानक एखाद्या एसटी स्टँडवर. मनामध्ये गुरुचे स्थान मिळवतात.

असे गुरू कोणत्याही शाळेच्या पाटीवर किंवा पुस्तकात नसतात, तर ते आयुष्याच्या वळणावर अचानक भेटतात. त्यांची एकच साधी गोष्ट आपल्याला नात्यांचं खरं मोल शिकवून जाते. कोणतीही अपेक्षा न ठेवता मनाला स्पर्श करून आयुष्य बदलणारा हाच अनुभव खऱ्या अर्थाने गुरू असतो.

 ┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted