सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 279
☆ अनुभव… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
हे तुझ्यामाझ्यात वाहते आहे…
अखंड ते काय आहे ?
नदीचे सागरात
मिसळून जाणे
माहित होते….
पण हे वेगळेच आहे !
तू नद आहेस…
निळाशार, अथांग, असीम..
तुझे जळ ही किती मधूर,
जन्म जन्मांतरीची,
तहान मिटविणारे….
हे पाणी… जल.. नीर…
ही ओढ,
पाण्याची पाण्याला…..
हे असे मिसळून जाणे,
एकमेकात…..
अशा ओढीला
आकर्षण म्हणतात !
पण हा निरंतर..
आणि चिरंतन…
जिवंत अनुभव….
“सर्व बंध सोडून
जेव्हा नदी धुंद धावे,
मीलन वा मरण पुढे—
तिला नसे ठावे”
या गाण्यातली आर्तता
अनुभवण्याची,
हीच ती अनावर ओढ,
जे तुझ्यामाझ्यात
वाहते आहे अखंड,
ते हेच आहे !
-प्रभा सोनवणे
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




