सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २३ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ एक जिद्दी देश— इस्त्रायल  ✈️

जॉर्डनची राजधानी अम्मान इथून दोन तासांचा बस प्रवास करून ‘शेख हुसेन ब्रिज’ हा जॉर्डन नदीवरील पूल ओलांडला. इथे जॉर्डनची सरहद्द ओलांडून इस्त्रायलमध्ये प्रवेश केला.

‘इस्त्रायल म्हणजे काय’? याची झलक चेकपोस्टपासूनच दिसायला लागली. आमच्या दहा जणींचा इस्रायलचा व्हिसा चेकपोस्टवर दाखवला. यांत्रिक तपासणी झाली तरी प्रत्येकीवर प्रश्नांची फैर झडत होती. ‘कशासाठी आलात? तुम्हाला कोणी काही गिफ्ट इथे द्यायला दिली आहे का? बॅगेत काही घातक वस्तू आहे का? तुमची बॅग तुम्हीच भरली आहे का? तुम्ही सर्वजणी एकमेकींना किती वर्षं ओळखता?’ अशा तऱ्हेचे प्रश्न विचारले गेले. प्रत्येकीला स्वतःच्या बॅगा उघडून दाखवाव्या लागल्या.त्या अधिकाऱ्यांचे समाधान झाल्यावरच प्रवेश परवाना मिळाला. ‘आव- जाव घर तुम्हारा’ असा ढिला कारभार कुठेही नव्हता.

गाईड बरोबर बसने यारडेनीट या ठिकाणी गेलो. इथे जॉर्डन नदी ‘सी ऑफ गॅलिली’तून बाहेर पडते. नदीच्या पाण्यात उभे राहिल्यावर अनेक छोटे मासे पायाशी भुळभुळू लागले. जगभरातील अनेक देशांतून आलेले ख्रिश्चन भाविक इथे पांढरे स्वच्छ अंगरखे घालून धर्म गुरूंकडून बाप्तिस्माचा विधी करून घेत होते. नदीकाठच्या छोट्या हॉटेलात पोटपूजा केली.

तिथून ‘सी ऑफ गॅलिली’ इथे गेलो. नाव ‘सी ऑफ गॅलिली’  असले तरी हा समुद्र नाही. याला ‘लेक टिबेरियस’ असेही नाव आहे. समुद्रसपाटीपासून ७०० फूट खाली असलेले हे एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. याचा परीघ ५३ किलोमीटर (३३मैल ),लांबी २१ किलोमीटर आणि रुंदी १३ किलोमीटर  आहे. या सरोवराची खोली शंभर ते दीडशे फूट आहे. इस्त्रायलच्या उत्तरभागातील डोंगररांगातून येणारे काही झरे, नद्या या सरोवराला मिळतात पण या सरोवराचा मुख्य स्रोत म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी जॉर्डन नदी!

या सरोवरात दोन तासांचे बोटिंग करायचे होते. ती लाकडी बोट चांगली लांबरुंद, स्वच्छ होती. बोट सुरू झाल्यावर गाईडने ग्रुपमधील सर्वात ज्येष्ठ म्हणून मी व आमची ग्रुप लीडर शोभा असे आम्हा दोघींना बोलावले व बोटीच्या चार पायर्‍या चढून  थोड्या वरच्या डेकवर नेले. बोटीवरचा एक स्टाफ मेंबर आपल्या भारताचा तिरंगा झेंडा घेऊन आला. तो त्याने तिथे असलेल्या  काठीच्या दोरीला लावला. त्याने सांगितले की ‘आता आम्ही तुमच्या राष्ट्रगीताची धून सुरू करणार आहोत. तुम्ही दोरी ओढून झेंडा फडकवा’. त्याक्षणी थरारल्यासारखे झाले. आम्ही व समोर उभ्या असलेल्या बाकी साऱ्या मैत्रीणी उजव्या हाताने सॅल्युट  करून उभ्या राहिलो. राष्ट्रगीताची धून सुरू झाली.  झेंडा फडकविला. अनपेक्षितपणे एका वेगळ्याच अनुभवाला सामोरी गेले.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे या प्रसंगाचे फोटो व्हाट्सॲप वरून लगेच घरी पाठविले गेले. ट्रीप संपवून घरी आल्यावर सतेज म्हणजे आमचा नातू म्हणाला,’ आजी, तू झेंड्याची दोरी अशी काय ‘टग् ऑफ वॉर’ ( रस्सीखेच ) सारखी खेचून धरली आहेस?’ ‘अरे काय सांगू? अजिबात ध्यानीमनी नसताना आयुष्यात पहिल्यांदाच भारताचा तिरंगा झेंडा फडकविण्याचं भाग्य लाभलं आणि तेसुद्धा परदेशात! भर पाण्यात असल्याने, बोट चांगली हलत होती. भरपूर वारा सुटला होता. कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रगीताची धून पूर्ण होईपर्यंत फडकविलेला झेंडा खाली येता कामा नये असं मनाने ठरविले आणि मी हातातली दोरी गच्च आवळून धरली.’

झेंडा वंदनानंतर  त्यांनी आम्हाला त्यांच्या एका हिब्रू गाण्यावरच्या चार स्टेप्स शिकविल्या व हिब्रू गाणे लावले.   त्यावर आम्ही त्यांनी दाखविल्याप्रमाणे नाचण्याचा प्रयत्न केला. झेंडा उभारण्याचा, झेंडावंदनाचा हृद्य कार्यक्रम आयुष्यभराची ठेव म्हणून मनात जपला.

आम्ही बोटीतून उतरल्यावर एक जपानी ग्रुप बोटीत चढण्यासाठी सज्ज होता. मला खात्री आहे की त्यांनी जपानी ग्रुपसाठी नक्की जपानी राष्ट्रगीत व त्यांचा झेंडा लावला असेल. टुरिझम म्हणजे काय व टुरिझम वाढविण्यासाठी काय काय करता येऊ शकते याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण समजायला हरकत नाही. ज्या चिमुकल्या देशाची एकूण लोकसंख्या साधारण ८२ लाख आहे त्या इस्त्रायलला दरवर्षी तीस लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात . ज्यू धर्मियांबरोबरच ख्रिश्चन व मुस्लिम धर्मियांसाठी इस्त्रायल हे पवित्र ठिकाण आहे. धार्मिक कारणासाठीही इस्त्रायलमध्ये पर्यटकांचा ओघ असतो.

राजकीय परिस्थितीमुळे ज्यू लोक जगभर विखुरले गेले होते. त्यांचा जर्मनीमध्ये झालेला अमानुष छळ सर्वज्ञात आहे. इसवी सन १९४८ साली ब्रिटिशांच्या मदतीने जॉर्डन नदीच्या प्रदेशात इस्त्रायल या राष्ट्राचा जन्म झाला. जगभरचे राष्ट्रप्रेमाने भारावलेले ज्यू इस्त्रायलमध्ये आले.जॉर्डन,लेबोनान, सिरिया, इजिप्त अशा सभोवतालच्या अरबी राष्ट्रांच्या गराड्यात अनेक लहान- मोठ्या लढायांना तोंड देत इस्त्रायल ठामपणे उभे राहिले आणि बारा-पंधरा वर्षात एक विकसित राष्ट्र म्हणून त्यांनी जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळविले. अत्यंत कष्टाळू,कणखर, देशप्रेमी ज्यू नागरिकांनी प्रथम त्यांची अर्थव्यवस्था बळकट केली. प्रत्येक क्षेत्रात सतत संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध व त्याचा परिणामकारक वापर हे इस्त्रायलचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. इस्त्रायलचा दक्षिण भाग हा निगेव्ह आणि ज्युदियन वाळवंटाचा प्रदेश आहे तर उत्तरेकडील डोंगररांगा व पश्चिमेकडील भूमध्य समुद्र यामुळे तिथल्या गॅलिली खोऱ्यात समशीतोष्ण हवामान आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती नसूनही इस्त्रायलने शेती,फळे व दुग्ध व्यवसायात आश्चर्यकारक प्रगती केली आहे.

दुसर्‍या दिवशी आम्ही एक ‘किबुत्स’बघायला गेलो. एका छोट्या गावासारख्या वस्तीने एकत्रितपणे केलेली शेती आणि दुग्ध व्यवसाय  याला ‘किबुत्स’ असे नाव आहे. इथल्या ४३० हेक्टरच्या अवाढव्य शेती व दुग्ध व्यवसायामध्ये फक्त पाचशे माणसे कामाला होती. हजारो संकरित गाई होत्या. त्यांच्यासाठी पत्र्याच्या मोठ्या मोठ्या शेडस् बांधलेल्या होत्या. गाईंच्या डोक्यावर खूप मोठ्या आकाराचे पंखे सतत फिरत होते. मध्येच पाण्याच्या फवार्‍याने त्यांना अंघोळ घातली जात होती. आम्ही इस्त्रायलला गेलो तेंव्हा उन्हाळा होता म्हणून ही व्यवस्था असावी. प्रत्येक गाईच्या कानाला तिचा नंबर पंच केलेला होता आणि एका पायात कॉम्प्युटरला जोडलेली पट्टी होती. दररोज तीन वेळा प्रत्येक गायीचे दूध काढले जाते. या गाई दिवसाला ४० लिटर दूध देतात.आचळांना सक्शन पंप लावून दूध काढले जात असताना त्यांच्या नंबरप्रमाणे सर्व माहिती कॉम्प्युटरमध्ये जमा होते. त्यावरून त्या गाईच्या दुधाचा कस व त्यात बॅक्टेरिया आहेत का हे  तपासले जाते. लगेच सर्व दूध स्टीलच्या नळ्यांतून कुलींगसाठी जाते. दूध, दुधाचे पदार्थ व चीझ यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. उत्तम बीज असलेले, जरुरी पुरेसे वळू निगुतीने सांभाळले जातात. बाकीच्यांची रवानगी कत्तलखान्यात होते. एवढेच नाही तर गाईंची दूध देण्याची क्षमता कमी झाली, दुधाचा कस कमी झाला, दुधात बॅक्टेरिया आढळले तर त्यांचीही रवानगी कत्तलखान्यात होते.

या सगळ्या गाई अगदी आज्ञाधारक आहेत. गोठ्यामध्ये लांब काठीसारखा सपाट यांत्रिक झाडू सतत गोल फिरत होता. त्यामुळे जमिनीवरील शेण, मूत्र गोळा केले जात होते . यांत्रिक झाडू आपल्या पायाशी आला की गाई शहाण्यासारखा पाय उचलून त्या झाडूला जाऊ देत होत्या.  दूध काढण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन उभ्या राहत होत्या व त्यांचे सक्शन पंप सुटले की लगेच पुन्हा वळून आपल्या जागेवर जाऊन राहत होत्या. गोळा केलेले शेण व मूत्र खत बनविण्यासाठी जात होते.

जवळच लालसर आंब्यांनी लगडलेली दहा फूट उंचीची झाडे एका लाइनीत शिस्तीत उभी होती. प्रत्येक झाडाच्या बुंध्यात ड्रीप इरिगेशनने ठराविक पाणी देण्यात येत होते. त्यातूनच योग्य प्रमाणात खत देण्यात येत होते. अशीच रसदार लिचीची झाडे होती. ॲव्हाकाडो, ऑलिव्ह भरपूर प्रमाणात पिकवितात. झाडाची फळे हातांनी किंवा शिडी लावून काढता येतील एवढीच झाडाची उंची ठेवतात.केळींवर भरपूर संशोधन केले आहे.टिश्शू कल्चर पध्दतीने केळीच्या अनेक  जाती शोधून त्याचे भरपूर पीक घेतले जाते. कुठेही पाण्याचा टिपूससुद्धा जमिनीवर नव्हता. सर्व पाणी व खत ड्रीप लाईन्समधूनच दिले जाते. इस्त्रायलमधून मधून मोठ्या प्रमाणावर ऑलिव्ह व फळे निर्यात होतात.

इस्त्रायल भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments