सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २३ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ एक जिद्दी देश— इस्त्रायल  ✈️

‘सी ऑफ गॅलिली’च्या एका किनाऱ्यावर खूप मोठ्या परिसरात, सुरेख झाडा-फुलांचा सान्निध्यात, थोड्या उंचीवर एक छान चर्च आहे. ख्रिश्चन धर्मियांसाठी हे एक पवित्र ठिकाण आहे. येशू ख्रिस्त या परिसरात राहिला होता, इथल्या टेकड्यांवरून त्याने प्रवचने दिली असे मानले जाते.

गेले दोन- तीन दिवस आम्ही ‘सी ऑफ गॅलिली’च्या किनाऱ्यावरील एका हॉटेलात  मुक्कामाला होतो. उगवत्या सूर्याची किरणे गॅलिलीच्या निळ्या-निळ्या लाटांवर स्वार होत आणि आसमंत सोनेरी प्रकाशाने भरून जाई. दिवसभर  स्थलदर्शन करताना दुपारचे कडकडीत उन्ह नकोसे होई तर संध्याकाळी हॉटेलच्या गच्चीवरून गॅलिलीचा किनारा मुला माणसांनी फुललेला दिसे. गॅलिलीवरून आलेला ताजा वारा आणि लिची ज्यूस किंवा चहा कॉफीबरोबर घेतलेल्या ( घरच्या ) चकल्या, चिवड्याच्या समाचार यामुळे संध्याकाळ सुखद होई. आज गॅलिलीचा निरोप घेऊन इस्रायलच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावरील हैफा इथे जायचे होते.

इस्त्रायलच्या पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. हैफा हे समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर शहर व्यापारी व औद्योगिक ठिकाण तसेच महत्त्वाचे बंदर आहे. दोन विद्यापीठे, सागर संशोधन संस्था, कला, नौकानयन आणि पुरातत्व संशोधनाशी संबंधित म्युझियम आहेत. प्रागैतिहासिक काळापासून ऑटोमन साम्राज्यापर्यंतच्या अनेक खाणाखुणा या शहराने जपल्या आहेत.

हैफा,  तेल अव्हिव्ह, बहाई गार्डन्स

हैफाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र किनाऱ्यावर बहाई वर्ल्ड सेंटर व जगप्रसिद्ध बहाई गार्डन्स आहेत. पर्शियामध्ये राहणारा बहाउल्ला हा या पंथाचा संस्थापक आहे. स्त्री- पुरुष समानता, मानवता हा एकच जागतिक धर्म , एकच ईश्वर, गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी नाहीशी करणे अशी या पंथाची उदात्त तत्वे आहेत. जगातील बहुतांश देशांत या पंथाचे अनुयायी आहेत. आपल्याकडे दिल्लीला बहाई पंथाचे ‘लोटस टेंपल’ आहे. बहाउल्लाच्या या विशिष्ट विचारांच्या शिकवणुकीमुळे त्याला पर्शियातून हाकलले गेले . तो हैफा जवळील एकर या ठिकाणी आला. इसवी सन १८९२ मध्ये बहाउल्लाचा मृत्यू झाला. 

आम्ही बसने माउंट कारमेलच्या माथ्यावर पोचलो. प्रवेशद्वारातून खाली उतरण्यासाठी दगडी जिने आहेत दोन जिने उतरून खाली आलो आणि समोरच्या पोपटी- हिरव्या, एकाखाली एक उतरत जाणाऱ्या देखण्या बागा बघुन चकीतच झालो.माउंट कारमेलच्या साडेसातशे फूट उंचीवरून समुद्रकिनारी असलेल्या बहाउल्लाच्या मंदिरापर्यंत १८ सुंदर, भव्य बागा एकाखाली एक उतरत गेल्या आहेत.  आम्ही उभ्या होतो तिथपासून समुद्र किनाऱ्यावरील  मंदिरापर्यंतच्या सर्व बागा,  तळाशी असलेले शुभ्र संगमरवराचे मंदिर, त्याचा लालसर ग्रॅनाईटचा घुमट, त्यावरील सोनेरी टाईल्स  सूर्य प्रकाशात चमकताना दिसत होत्या. पलीकडल्या निळ्या- हिरव्या भूमध्य समुद्रात मोठ्या बोटी बंदरात शिरण्यासाठी वाट पाहत उभ्या होत्या.

२०० फूट ते १२०० फूट रुंद असलेल्या या बागांच्या मधोमध उतरते दगडी जिने, पूल, छोटे-छोटे बोगदे कल्पकतेने आखले आहेत. झाडा फुलांनी डवरलेल्या त्या बागांच्या मध्ये लहान-मोठी कारंजी आहेत.  बागांच्या कडेने मूळ डोंगरावर असलेली रानटी पण रंगीत फुलांची झाडे आणि तिथल्या मूळ वृक्षांच्या प्रजाती यांचे संवर्धन केलेले आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश, निळा हिरवा समुद्र, उतरत्या देखण्या बागा आणि निस्तब्ध , हिरवी शांतता असे एक सुंदर निसर्ग चित्र मनावर कोरले गेले.

माऊंट कारमेलच्या उत्तर भागातील उतारावरून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी उतरत्या बागांचे डिझाईन करण्याचे काम १९८७ मध्ये कॅनडिअन वास्तुशास्त्रज्ञ फरिबोर्झ साबा यांना देण्यात आले तर मंदिराचे डिझाईन कॅनेडियन वास्तुशास्त्रज्ञ विल्यम मॅक्सवेल यांनी केले आहे. मंदिराचा शुभ्र  संगमरवरी बाह्यभाग हा इटलीमधून तयार करून आणण्यात आला. मंदिराचे घुमटाचे खांब लालसर ग्रॅनाईटचे आहेत आणि त्यावर सोन्याच्या पत्र्याने मढविलेल्या टाईल्स बसविल्या आहेत. हे काम हॉलंडमध्ये करण्यात आले. जगभरचे प्रवासी आवर्जून या बागा बघण्यासाठी येतात .मागील वर्षी या बहाई गार्डन्सना साडे सात लाख लोकांनी भेट दिली.

जाफा आणि तेल अव्हिव्ह ही आता जुळी शहरे झाली आहेत. तेल अव्हिव्ह ही इस्त्रायलची आर्थिक, औद्योगिक ,व्यापारी, सांस्कृतिक राजधानी आहे. भूमध्य समुद्रकिनारी असलेल्या या देखण्या शहरात इस्त्रायलच्या एकूण ८२ लाख लोकसंख्येपैकी ४५ लाख लोक राहतात. आपल्या मरीन ड्राईव्हसारख्या सागर किनारी अनेक देशांचे दूतावास, सरकारी कार्यालये,  उच्चभ्रू वस्ती आहे.  गॅलिलीच्या पश्चिमेकडील हा समृद्ध विभाग आहे. या विभागात संत्री-मोसंबी, ऑलिव्ह, ॲव्हाकाडो अशी फळे व शेती होते. भूमध्य समुद्राच्या सुंदर किनाऱ्यावर  सागरी खेळांची सुविधा आहे. अनेक संशोधन केंद्रे आहेत.

तेल अविव इथून जेरुसलेम इथे पोहोचलो. इथल्या हॉटेलात प्रवाशांची सतत ये-जा होती पण कुठेही गडबड गोंधळ नव्हता. जेरूसलेमला पोहोचलो त्या रात्री आम्ही तिथल्या प्राचीन किल्यात ‘साउंड ॲ॑ड लाईट’ शो पाहिला. किल्ल्याच्या आवारात बसण्याची व्यवस्था होती.  किल्ल्याच्या भिंती, बुरुज, दरवाजे, उंच-सखलपणा या विशाल पार्श्वभूमीवर प्रोजेक्टर्स, स्पीकर्स, आणि कम्प्युटर्स यांच्या सहाय्याने हे ४० मिनिटांचे, खुर्चीला खिळवून ठेवणारे, प्राचीन काळाची सफर घडविणारे नाट्य उभे केले गेले. किंग डेव्हिड व किंग सॉलोमनचा कालखंड, जेरुसलेमचा नाश व पुनर्निर्माण, घोडे,उंट, व्यापारी, योद्धे, सामान्य नागरिक, रोमन काळ, चर्चेस, धर्मगुरू,  इस्लामी कालखंड, ऑटोमन साम्राज्य आणि सध्याचे जेरुसलेम असा भव्य कालपट यात उलगडला आहे.स्केर्झो या फ्रेंच कंपनीने या शोची अतिशय देखणी आणि कल्पक उभारणी केली आहे.

दुसऱ्या दिवशी ‘नान दान जैन इरिगेशन प्रोजेक्ट बघायला गेलो. उपलब्ध जमीन, पाणी, हवामान आणि मातीचा कस याचा संपूर्ण अभ्यास व पिकांच्या जातींचे संशोधन करून ड्रिप इरिगेशनने पिकांच्या मुळाशी आवश्यक तेवढेच पाणी व खत पुरविण्याची पद्धत इस्त्रायलने प्रयत्नपूर्वक राबवली आहे. त्यामुळे थोड्या जागेत भरपूर पीक घेतले जाते व नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य उपयोग केला जातो. जगभरातील शंभराहून अधिक देशात ‘नान दान  जैन इरिगेशन’ कंपनीने तांत्रिक सहाय्य केले आहे. ड्रिप इरिगेशन, मायक्रो स्प्रिंकलर्स, हरितगृह उभारणी करून उत्पादन वाढीसाठी क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. तिथल्या प्रोजेक्ट मॅनेजरने सुरुवातीलाच अगदी अभिमानाने सांगितले की,’ आत्ता तुम्ही जे पाणी प्यायलात ते अर्ध्या तासापूर्वी भूमध्य सागराचे पाणी होते. आता आम्ही ‘सी ऑफ गॅलिली’चे गोडे पाणी पिण्यासाठी अजिबात वापरत नाही, and we can’t afford to waste a single drop of water.’

वाढती लोकसंख्या, गोड्या पाण्याची वाढती मागणी, कमी पाऊस, पाण्याचा उपलब्ध साठा याचा भविष्यकालीन वेध घेऊन इस्त्रायलने समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी मोठे प्लांट्स उभारले आहेत. यासाठी रासायनिक प्रक्रियेचा वापर करतात. इस्त्रायलमध्ये प्रत्येक घरातील सिंक, बेसिन, बाथरुम यांचे पाणी प्रक्रिया करून शेतीसाठी वापरले जाते.सतत संशोधन, नवनवीन तंत्रज्ञान व त्याचा रोजच्या जीवनासाठी  आवर्जून वापर हे इस्त्रायलचे एक मोठे वैशिष्ट्य आहे.

इस्त्रायल भाग-२ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments