📖 वाचताना वेचलेले 📖

☆ लेक माझी… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

अशी कशी लेक, देवा,

माझ्या पोटी येते

नावसुद्धा माझं ती

इथेच ठेवून जाते

 *

 पहिला घास, देवा, ती

माझ्याकडून खाते

माझाच हात धरुन ती

पहिलं पाऊल टाकते

 *

 माझ्याकडूनच ती

पहिलं अक्षर शिकते

तिच्यासाठीसुद्धा मी

रात्र रात्र जागतो

 *

कुशीत माझ्या झोपण्यासाठी

ती गाल फुगवून बसते

मी आणलेला फ्रॉक घालून

घरभर नाचते

 *

अशी कशी लेक, देवा,

माझ्या पोटी येते

असे कसे वेगळे हे

तिचे माझे नाते

 *

 एक दिवस अचानक, ती,

मोठी होऊन जाते

बाबा, तुम्ही दमला का?

हळूच मला विचारते

 *

 माझ्यासाठी कपडे, चप्पल,

खाऊ घेऊन येते

नव्या जगातील नवीन गोष्टी

मलाच ती शिकवते

 *

 तिच्या दूर जाण्याने

कातर मी होतो

हळूच हसून मला ती

कुशीत घेऊन बसते

 *

 कळत नाही मला, देवा,

असे कसे होते

कधी जागा बदलून ती

माझीच आई होते

 *

 देव म्हणाला, ऐक, पोरा

तुझे, तिचे नाते

 विश्वाच्या ह्या साखळीची

एक कडी असते

 *

तुझ्या दारी फुलण्यासाठी

हे रोप दिले असते

सावली आणि सुगंधाशी तर

तुझेच नाते असते

 *

 वाहत्या प्रवाहाला, कोणी,

मुठीत कधी, का, धरते ?

मार्ग आहे ज्याचा, त्याचा

पुढेच असते जायचे

 *

 तुझ्या अंगणातली धारा ही

“जीवनदात्री” होते

आणि वाहती राहण्यासाठीच

“गंगा” सागराला” मिळते

 *

एक तरी मुलगी असावी

उमलताना बघावी

नाजूक नखरे करताना

न्याहाळायला मिळावी

 *

एक तरी मुलगी असावी

साजिरी गोजिरी दिसावी

नाना मागण्या पुरवताना

तारांबळ माझी उडावी

 *

 एक तरी मुलगी असावी

मॅचिंग करताना बघावी

नटता नटता आईला तिने

नात्यातली गंमत शिकवावी

 *

 एक तरी मुलगी असावी

जवळ येऊन बसावी

मनातली गुपितं तिने

हळूच कानात सांगावी

 *

एक तरी मुलगी असावी

गालातल्या गालात हसावी

कधीतरी भावनेच्या भरात

गळ्यात मिठी मारावी

 *

एक तरी मुलगी असावी

एक तरी मुलगी असावी

 ☆ ☆ ☆ ☆

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments