सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ थिंक पॉझिटिव्ह… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच नसतात, काही आपल्या जवळपासही असतात.

एक व्यक्ती ऑटोरिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालली होती. ऑटो ड्रायव्हर आरामात ऑटो चालवत होता. तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली. ऑटो ड्रायव्हरने जोराने ब्रेक लावला आणि कार-ऑटोचा अपघात होता-होता राहिला. कारचालकाची चूक असूनही तो रागाने ऑटो ड्रायव्हरला घालून-पाडून बोलू लागला.

ऑटो ड्रायव्हर कारचालकावर क्रोधीत झाला नाही, उलट त्यालाच ‘सॉरी’ म्हणून पुढे निघून गेला. ऑटोमध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप राग आला होता, आणि त्याने ऑटो ड्रायव्हरला विचारले ‘तू त्या कार चालकाला काहीही न बोलता तसेच कसे काय जाऊ दिलेस? त्याची चूक असूनही तो तुला किती वाईट बोलून गेला. आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो अन्यथा आता दवाखान्यात असतो. ‘

ऑटोवाला म्हणाला, ‘साहेब, अनेक लोक गार्बेज ट्रक (कचऱ्याचा ट्रक) प्रमाणे असतात. हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात. ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही, त्या गोष्टी मेहनत करून जोडत राहतात. उदा. क्रोध, घृणा, चिंता, निराशा इ.

अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि हे आपले ओझे कमी करण्यासाठी इतरांवर हा कचरा फेकण्याच्या शोधात राहतात. यामुळे मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दुरूनच स्मितहास्य करून त्यांना वाटेला लावतो. कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मीसुद्धा कचऱ्याचा एक ट्रक बनेन आणि स्वतःसोबतच जवळपास असलेल्या लोकांवरही कचरा फेकत राहीन. ‘

मला असे वाटते की आयुष्य खूप सुंदर आहे. त्यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद द्या आणि जे लोक वाईट वागतात, त्यांना मोठ्या मनाने माफ करा. आपण हे नेहमी लक्षात ठेवावे की सर्व मानसिक रुग्ण फक्त हॉस्पिटलमध्ये नसतात, तर काही आपल्या जवळपासही फिरत राहतात.

लाइफ मॅनेजमेंट नियम

पहिला नियम – शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.

दुसरा नियम – ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. सुखी माणूस सुख, दुःखी माणूस दुःख, ज्ञानी माणूस ज्ञान, भ्रमित माणूस भ्रम आणि भयभीत माणूस भय वाटत राहतो.

तिसरा नियम – जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही, कायम दुःखी आणि आजारी राहणे पसंत करतो, त्याला इतरांचे सुख तरी कसे भावणार?तो इतरांवर निर्व्याज प्रेमही करू शकत नाही.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments