श्री मोहन निमोणकर
वाचताना वेचलेले
☆ “माणुसकी अजूनही जिवंत आहे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
★★★
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा रवींद्रनाथ नावाचा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या 15 साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दिया जवळ मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला, जोरदार वादळ उठलं, लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं.
सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले… रवींद्रनाथही.
…. पण तो घाबरणारा नव्हता. मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता, तर साथी होता. त्याने हार मानली नाही… तो पोहत राहिला… पोहत राहिला… वर फक्त आकाश, खाली अथांग पाणी. तास निघून गेले, दिवस सरले.
5 दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला, ना खाणं, ना पिण्याचं पाणी, फक्त जगण्याचा हट्ट. जेव्हा पाऊस पडायचा, तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा. प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ होता, पण त्याची हिम्मत त्यापेक्षा जास्त मजबूत होती.
5व्या दिवशी… सुमारे 600 किलोमीटर दूर, बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ, ‘एमव्ही जवाद’ नावाचं जहाज जात होतं. जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं. नीट पाहिलं… कोणीतरी माणूस पोहत होता!
कॅप्टनने तात्काळ लाइफ जॅकेट फेकलं, पण ते रवींद्रनाथपर्यंत पोहोचलं नाही. तरीही कॅप्टन थांबले नाहीत… त्यांनी सीमा, धर्म, जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली — माणूस.
काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला, आणि यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं. लाइफ जॅकेट पुन्हा फेकलं, आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं.
क्रेनने त्याला वर खेचलं गेलं, थकलेला, अर्धमेला, पण जिवंत. जेव्हा तो जहाजावर चढला, तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले. त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही, तर माणुसकीला जिवंत पाहिलं.
धन्यवाद, त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाला…..
‘ तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही, तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे… ‘
– – कधी कधी एका माणसाचा हट्ट आणि दुसऱ्या माणसाची करुणा, संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनवू शकते.
★★★
लेखक : अज्ञात
संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




