श्री सुहास सोहोनी
वाचताना वेचलेले
☆ एक दु:खद सत्य… – कवी : एक अनामिक मास्तर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
☆
विद्यालयाच्या जागेपायी
कुणीच इथं भांडलं नाही
अन् देवालयाच्या जागेसाठी
रक्त कमी पडलं नाही…
*
माझाच देव मोठा म्हणण्यात
रक्ताच्या नद्या वाहिल्या
अन् ज्ञानगंगा कोरडी पडत
शाळा इथे ओसाड पडल्या…
*
शाळा अजुनही तशीच आहे
पडक्या, तुटक्या भिंतींची
गरीब माझ्या देशामध्ये
उभी मंदिरं सोन्याची…
*
शाळे मधली दानपेटी
भरलेली कधी पाहिली नाही
अन् मंदिराची दानपेटी
रिकामी कधी राहिलीच नाही…
*
शाळेतला पालक मेळावा
पालकांवाचून राहून गेला
देवालयात चेंगराचेंगरीत
माणुस मात्र तुडवून मेला…
*
विद्येचं ज्ञान देऊन
गुरूजी गरीबच राहीला
अन् ‘अंधभक्तांचं’ दान घेऊन
पुजारी धनवान गब्बर झाला…
*
खरंतर धर्म नावाचं पुस्तक
शाळेत कधीच उघडत नाही
पण धर्माच्या नांवाशिवाय
देशात पानही हालत नाही…
☆
कवी : एक अनामिक मास्तर
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





