सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “सुख माझ्या नजरेतून…” – कवी : श्री. मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..?

*

भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं,

सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं,

नंदादिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं,

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

*

साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं,

हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं,

डब्यातला गुळाचा खडा हळूच जीभेवर ठेवणं,

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

*

एखाद्या आजीचा हात धरून रस्ता पार करणं,

वाटेत पडलेलं केळीच साल आपणच उचलणं,

टपरी वरच्या चहाचा बिनदिक्कत आस्वाद घेणं,

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं…

*

एखाद्या चिमणीला जवळून बघणं,

हवेत उडणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करणं,

एक डाव लगोरीचा खेळायला मिळणं

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं…

*

खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं,

रातराणीचा सुगंध उरात साठवणं,

पलंगावर पाठ टेकली की क्षणात डोळा लागणं,

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं…

*

तळहातीचा फोड हळुवार कुरवाळणं

जखमेवर हलकीशी फुंकर घालणं

दु:खाशिवाय सुख नाही हे कळणं

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

कवी : श्री मंगेश पाडगावकर

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments