सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आईचं आता वय झालंय… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आई,

ठाऊक आहे का तुला ?

 

चिक्‍कार वेळ बेल वाजवल्यावर

बंद दरवाजाआड तुझी

चाचपडत येणारी पावले

थकलेल्या आवाजात म्हणतात,

‘आले रे…’,

 

तेव्हा अपराधी जीव

श्‍वास रोखून पडतो भांड्यात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

खिडकीत बसून अंधाऱ्या उजेडात

सुईत दोरा ओवण्याचा तुझा वाढता

खटाटोप पाहून येतात कढ,

कातर कातर होत जाते मन

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

डाव्या कुशीवर कोपराच्या उशीवर

एकार्त झोपलेल्या तुझा,

मंद श्‍वासोच्छ्वास निरखताना,

किती धडधडते हृदयात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

‘‘काही झालेलं नाही रे मला,

तू झोप…होईन मी बरी!’’

असा तुझाच रुग्णाईत दिलासा

ऐकण्यासाठी ओठंगून उभ्या असलेल्या

माझ्या तथाकथित निरोगी मनाला

पडत जातात कित्येक घरे

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

तिन्हीसांज टळून गेल्यानंतर

खोलीतला दिवा न लावता

बाहेर टक लावून बघत बसतेस

अज्ञातात काहीतरी,

तेव्हा गलबलते ह्रदयात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

आजही ह्या वयात खरकटे तोंड पुसताना,

तुझ्या वृद्ध पदराचा घुरट वास

घेताना मी होत जातो लहान,

आठवते मज माझेच भूत…

खिडकीच्या गजांतून पाय काढून

तुझी चाकरमानी वाट पाहात

बसणारे माझे बालपण…आठवते

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

अजूनही आहे मनगटावर मौजूद

तू दिलेला कालथ्याचा डाग…

शेजारच्या डोंगरेकाकूकडे

आशाळभूत खाऊ मागितल्याची

शिक्षा म्हणून दिलेले ते

माझ्याच दुर्दम्य लोचटपणाचे प्रमाणपत्र

आताशा धुकट झाले आहे,

निबर कातडीवर, पण तरीही-

सहज जाते नजर त्या डागावर

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

दोस्तांबरोबर रंगवलेली बाटलीभर

मध्यरात्र उतरते क्षणार्धात

वास्तवाच्या विहिरीत

करकरणाऱ्या रहाटासारखी…

तुझ्या एकटेपणाची सावली

हालत राहाते रात्रदिव्याच्या

मंद उजेडात भिंतीवर…

तेव्हा, कोसळून पडतो मी पुन:पुन्हा

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

थकलेल्या देहाने वावरत असतेस

खोल्याखोल्यांतून, पुटपुटत असतेस

काहीतरी देव्हाऱ्याकडे पाहात

उसासून, तेव्हा

तुझ्या डोळ्यांत साकळलेले

संध्याकाळचे गडद रंग

किती उदास वाटतात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

मटार निवडताना बोटांवर चढलेली

हिरवीजर्द जीजिविषु अळी

तुझ्या अंधुक डोळ्यांना होते दिसेनाशी,

हे पाहून हळवे व्हायला होते

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

‘‘मला मेलीला कशाला हव्यात

साड्या आणखी?’ असे म्हणत

जुन्या पैठणीवर फिरणारा तुझा

सुरकुतलेला जीर्णशीर्ण हात

पाहून थरथरते काळीज

दरवेळी, हे ठाऊक आहे तुला?

 

एखाद्या संध्याकाळी ‘‘येताना

पाच रुपयांची फुलं घेऊन ये रे,

‘त्याच्या’ बोडख्यावर घालायला!’’

असे त्राग्याने म्हणतेस, तेव्हा

उगवणाऱ्या उद्याचाही

वाटतो आधार

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

थकलेल्या तुझा शरीराचा

कंटाळलेला वावर करतो उदास

सर्वंकष तरीही-

मनात येते की

प्राक्‍तनाचे गणित नाही जुळले,

पण तुझ्या पदराखाली झाकलेले

सुरक्षित बालपण दृढमूल आहे, अजूनही !

 

आई …

अजून तू मला हवी आहेस.

कवी:अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments