सौ. रेखा जांबवडेकर
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ रंग पाण्याचे… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर ☆
☆
‘पाणी’ शब्द हा असे प्रवाही
वळवू तिकडे वळतो हा..
जशी भावना मनात असते
रूप बदलते कसे पहा..!
*
नयनामध्ये येता ‘पाणी’
अश्रू तयाला म्हणती,
कधी सुखाचे, कधी दुःखाचे,
अशी तयांची महती..!
*
चटकदार तो पदार्थ दिसता,
तोंडाला या ‘पाणी’ सुटते,
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग ‘पाणी’ येते..!
*
धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,
म्हणती अविरत भरते ‘पाणी’..
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी जाते ‘पाणी’..!
*
‘वळणाचे ‘पाणी’ वळणावरती’
म्हण मराठी एक असे,
‘बारा गांवचे ‘पाणी’ प्यालाय’
चतुराई यातुनी दिसे..!
*
लाथ मारूनी ‘पाणी’ काढणे,
लक्षण हे तर कर्तृत्वाचे,
मेहनतीवर ‘पाणी’ पडणे
चीज न होणे कष्टाचे..!
*
उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,
‘पाण्या’त पाहणे गुण खोटा..
‘पाणी’दार ते नेत्र सांगती,
विद्वत्तेचा गुण मोठा..!
*
शिवरायांनी कितीक वेळा,
शत्रूला त्या ‘पाणी’ पाजले..
नामोहरम करून, अपुले
मराठमोळे ‘पाणी’दाविले..!
*
टपोर मोती दवबिंदूचे
चमचम ‘पाणी’ पानावरती,
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,
अळवावरचे अलगद ‘पाणी’..!
*
कळी कोवळी कुणी कुस्करी,
काळजाचे त्या ‘पाणी’ होते..
ओंजळीतूनी ‘पाणी’ सुटता,
कन्यादानाचे पुण्य लाभते..!
*
मायबाप हे आम्हां घडविती,
रक्ताचे ते ‘पाणी’ करूनी..
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती ‘पाणि’
*
आभाळातून पडता ‘पाणी’
तुडुंब, दुथडी नद्या वाहती,
दुष्काळाचे सावट पडतां
सारे ‘पाणी पाणी’ करती..!
*
अंतीम समयी मुखात ‘पाणी’
वेळ जाणवे निघण्याची..
पितरांना मग ‘पाणी’ देऊनी,
स्मृती जागते आप्तांची..!
*
मनामनांतील भावनांचे,
‘पाण्या’मध्ये मिसळा रंग..
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,
चेहऱ्यावरती उठे तरंग..!
☆
कवी : अज्ञात
प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






