सौ. शशी नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
☆ “रु. १०० ची ‘ती’ नोट आणि बीएमडब्ल्यूची चावी” – लेखक : डॉ. सुजित भरत पाटील ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆
☆
रात्रीचे साडेअकरा.
शटर अर्ध्यावर खाली खेचलं होतं. डोळे जड झाले होते आणि दिवसभर पेशंट्स पाहून डोकं जड झालं होतं.
तितक्यात दारात एक सावली दिसली.
कपड्यांवरूनच ओळखू येत होतं—दिवसभर सिमेंट-विटा उचलून आलेला एक बांधकाम मजूर. अंगावरचा शर्ट घामाने चिकटलेला आणि पायातल्या चपलांना सिमेंटचा थर.
त्याच्या कडेवर दीड वर्षाचं पोरगं होतं, जे तापाने फणफणलं होतं.
तो आत आला, पण दारातच थबकला.
त्याची नजर माझ्या केबिनच्या चकाचक टाईल्सवर आणि काचेवर गेली. त्याने संकोचाने स्वतःच्या मळक्या चपला बाहेरच काढल्या आणि अनवाणी पायाने, कोपऱ्यात येऊन उभा राहिला.
त्याच्या मनातली ती भीती मला स्पष्ट दिसत होती, “आपल्यामुळे डॉक्टर साहेबांची केबिन खराब होईल का? “
मी खुणेनेच त्याला बोलावून घेतलं.
बाळाला तपासलं. छाती भरली होती. नशीब, वेळेवर आला होता म्हणून न्यूमोनियाचा धोका टळला होता.
मी औषधं लिहून दिली आणि पाठीवर हात फिरवून सांगितलं, “काळजी नको करू. वाघ आहे तुझा पोरगा. दोन दिवसात ठणठणीत होईल! “
त्याच्या चेहऱ्यावरचा जीवघेणा तणाव निवळला. त्याला वाटलं होतं, डॉक्टर ॲडमिट व्हायला सांगतील, हजारो रुपये लागतील.
त्याने थरथरत्या हाताने खिशातून एक प्लॅस्टिकची पिशवी काढली.
त्यातून जेमतेम एक १०० ची नोट बाहेर आली. घामाने ओलसर झालेली, मळकटलेली आणि शंभरदा हाताळल्यामुळे जीर्ण झालेली ती नोट.
फी पूर्ण भरत नव्हती.
त्याचा चेहरा पुन्हा पडला. ती हतबलता मला बघवली नाही.
मी त्याचा हात पकडला आणि नोट परत करत म्हटलं,
“अरे राहू दे बाबा. फी नको. तू फक्त बाळाला औषधं घे आणि चांगलं खायला घाल. “
त्यावर तो मजूर जे बोलला, त्याने माझ्या अंगावर काटा आला.
तो करारी आवाजात म्हणाला,
“नको साहेब. ही तुमची ‘विद्या’ हाय, आणि हे माझं कष्टाचं ‘दाम’ हाय. फुकट इलाज केला तर माझ्या लेकाला गुण नाही येणार. हे पैसे ठेवा, बाकीचे उद्या कामावरून सुटल्यावर आणून देतो. “
त्याने ती ‘चूरगळलेली शंभरची नोट’ माझ्या टेबलावरच्या पेपरवेटखाली दाबून ठेवली, हात जोडले आणि निघून गेला.
तो गेला… पण मला रात्रभर झोप लागली नाही.
सकाळीच माझ्याकडे एक सुटाबुटातले ‘सुशिक्षित’ गृहस्थ आले होते. ३०० रुपये फीसाठी त्यांनी रिसेप्शनवर १० मिनिटं हुज्जत घातली होती, “आम्ही जुने पेशंट आहोत, काहीतरी डिस्काऊंट द्यायला पाहिजे! “
जाताना त्यांनी खिशात आयफोन ठेवत, बीएमडब्ल्यूची (BMW) चावी फिरवत मला ‘बाय’ केलं होतं.
आणि इकडे हा मजूर?
ज्याला उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे, पण “डॉक्टरांच्या विद्येचा अपमान होऊ नये, ” म्हणून तो आपला घामाचा पैसा हक्काने देऊन गेला.
त्याला सवलत नको होती, त्याला ‘गुण’ हवा होता.
त्या रात्री मला समजलं…
खरी श्रीमंती तुमच्या बँक बॅलन्समध्ये किंवा गाडीच्या ब्रँडमध्ये नसते,
ती तुमच्या ‘संस्कारांत’ असते.
त्या बापाने दिलेली ती ‘चूरगळलेली नोट’ माझ्यासाठी आजवरची सर्वात मोठी फी होती. कारण ते केवळ एक चलन नव्हतं, तर तो एका स्वाभिमानी बापाचा ‘आशीर्वाद’ होता.
☆
लेखक : डॉ. सुजित भरत पाटील
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





बहुत ही हृदयस्पर्शी रचना, बधाई हो