मंजुषा सुनीत मुळे
📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “बाया” – कवी : विजय जोशी ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
बाया कपडे धुवायला जातात,
नदीवर निगुतीने!
सुख दुःखे बुचकळवतात पाण्यात,
आणि बोलतात वाहत्या पाण्याशी,
सराईतपणे मनमोकळं….
कपडे घासतात, आपटतात,
धोपटतात दगडावर,
साफ करतात कपड्यांचा मळ, आणि मनातली खळबळ सुद्धा!
बायका कुजबुजतात, पुटपुटतात, बडबडतात,
आपापसात,
मनाशी,
कपड्यांशी,
पाण्याशी,
दगडांशीसुद्धा.
विरघळून जातो सारा शीण,
नदीतल्या पाण्यात, आणि,
बाया फिरतात माघारी,
पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात करायला,
नदीच्या पात्रात विस्तीर्ण आणि
स्वच्छ नितळ मनाने!
☆
कवी : विजय जोशी
प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






