गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ श्रीकृष्ण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

कृष्ण खरंतर योगेश्वर होता.. शरीरातल्या सोळा सहस्त्र नाड्या त्याच्या ताब्यात होत्या.. जणू काय त्याच्या बायकाच.. लगेच आपण त्याला सोळा सहस्त्र बायका चिकटवल्या.. ज्ञान फक्त काहींच्याच पोतडीत राहिले.. उरलेले त्याला सोळा हजार स्त्रियांशी संग करणारा ठरवून मोकळे झाले.. मग त्याचे उदात्तीकरणही केले..

एखाद्याला ‘देव’ बनवण्याच्या प्रक्रियेत हे उदात्तीकरण फार आवश्यक असतं. त्याशिवाय माणसाचा देव होत नाही. ही प्रक्रिया शेवटी माणसाला दगड बनवून मंदिरात कोंडते..! आणि मग त्याने काय करायचं, काय खायचं, कसं वागायचं, कधी झोपायचं, कधी उठायचं हे त्याचे भक्तगण ठरवतात. तो लाचार होतो. कारण त्याचा देव झालेला असतो. आपण जसे असतो तसे आपल्याला जग दिसते.

दुसऱ्याच्या पत्नीबरोबर रासलीला खेळणारा कृष्ण आणि आणि स्वतःच्या पत्नीला संशयावरून वनवासात पाठवणारा राम ही सोयीस्कर रूपे भारतीय पुरुषांनी मनात जपली. पण त्याच्या ज्या रुपाची आज समाजाला गरज आहे, त्याचा आपण खरंच विचार करतो का?

या माणसाने आपल्याला ‘गीता’ दिली.. जगभरातले विद्वान आज गीतेला एक सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान मानतात.. या माणसाने आपल्याला ‘कृष्णनीती’ दिली.. राजकारण कसे खेळावे, खेळवावे याचे धडे स्वत:च्या वागणुकीतून घालून दिले… कृष्णाचे व्यक्तिमत्व इतके बहुरंगी आणि बहुढंगी आहे की, त्याचे पैलू दाखवण्यासाठी हरिवंश, भागवत आणि महाभारत या ३ ग्रंथाची निर्मिती करावी लागली आणि त्यानंतरही कितीतरी ग्रंथ आणि पुस्तके… पाळणा, दूध, दही,

रासलीला या पलीकडचा कृष्ण गिरीश जखोटिया यांनी त्यांच्या “कृष्णनीती ” या पुस्तकात रंगवला आहे…

त्याने जपलेली मूल्ये कालातीत आहेत, असा-

१. तत्त्वज्ञानी, राजकारणी, मुत्सद्दी…

२. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या इंद्रपूजेलाही आव्हान देऊन निसर्गाची पूजा करणारा, त्याचे महत्त्व पटवून देणारा… रूढी आणि परंपरा न पाळणारा बंडखोर…

३. गवळी असूनही, आपल्या जातीची खंत न बाळगता लोकांना एकत्र करून त्यावेळच्या जुलमी राज्यसत्तेला उलथवणारा क्रांतिकारक…

५. द्वारकेला व्यापारी बाजारपेठ बनवणारा वेल्थ क्रिएटर…

६. स्थापत्य शास्रज्ञ(इंजिनिअर) आपल्या कलात्मक दृष्टीने द्वारका नगरी बनविणारा…

अशा अनेक रूपात यातील कृष्ण दिसतो…

गीतेची निर्मिती करणारा विप्र, पांडवांना विजय मिळवून देणारा क्षत्रिय, गोकुळात असताना दही दुधाचे योग्य वितरण करणारा, द्वारकेला बाजारपेठ बनवणारा वैश्य आणि गुराख्याच्या कामालाही प्रतिष्ठा मिळवून देणारा आणि त्यातही कमीपणा न मानता सर्वच समाजाचे स्वकर्तृत्वावर नेतृत्व करणारा शूद्र अशा सर्व वर्णात कृष्ण दिसतो आणि भावतो…

‘महाभारता’चा परिपक्व कृष्ण आपल्यासमोर येतो तो एक नेता, योध्दा, तत्त्वज्ञानी, राजकारणी आणि क्रांतिकारी म्हणून…

“कृष्णकिनारा” मधून तो भेटतो राधा, द्रौपदी आणि कुंतीचा सखा, मित्र, पाठीराखा म्हणून…

आणि जितकं मन, मेंदू, मस्तक जागे ठेवाल तितक्या रूपात तो मग भेटतच राहतो…

कृष्णाची ही रूपं समजून न घेता केवळ ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ला शरण जाऊन ज्या प्रथा, जशा आहेत तशा पाळणाऱ्या, जे समज जसे होते तसे निर्बुद्धपणे पुढे नेणाऱ्या सुशिक्षित (?) लोकांची चीड येते! निदान या गोष्टींचे भांडवल करतांना त्याची बुद्धिमत्ता, त्याची समज, त्याचा धोरणीपणा.. कलियुगात कसं वागावं याचा त्याने घालून दिलेला वस्तुपाठ तरी समजून घ्यायचा…

कृष्ण मस्तीत जगला.. कारण तो माणूस होता.. त्यामुळेच जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर यादव वंश संपला, तेव्हा तो काही करू शकला नाही आणि खंतावला.. माणसासारखे मरण आले त्याला..!

माणूस म्हणून त्याचे तेज, त्याचा लढाऊ बाणा त्याचे ‘योगेश्वर’ रूप.. म्हणजेच खरा ‘कृष्ण’… त्याला विविध पुस्तकांतून वाचणं म्हणजेच त्याची भक्ती. माणसाला माणूस म्हणून ज्यांना समजून घेता येत नाही किंवा घ्यायचंच नसतं त्यांना असे पोकळ भक्तीचे देखावे मांडावे लागतात…

ज्यांना समजून घेता येतं, त्यांच्यासाठी तर तो नेहमीच दीपस्तंभ…

कृष्णा… तू थोडा तरी समजलास, म्हणून आयुष्यातील कितीतरी चक्रव्यूहं भेदता आलीत…

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted