श्री मिलिंद जांबोटकर
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ गोष्ट खूप छोटी असते हो… – लेखक : श्री प्रियदर्शन दातार ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆
तुम्ही गाडीतून जाताना,न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला, तर ब-याचदा तो मिळतच नाही,पण उतरून जर,”दादा, पत्ता सांगता का?” असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते….
गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.
स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला ,घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही.पण फोन केला तर नातं नक्कीच जुळतं…
गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.
अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात,तसाच मागचाही पडू शकतो.तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं,तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….
गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.
आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात.पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरुन तिला मदत केली तर,तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….
गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.
बॅंकेत कामाला गेल्यावर ,कोण्या एकाला ‘स्लिप घेतल्यावर पुढे काय करायचं’ उमगत नसतांना,तुम्ही त्याला स्वत:हून मदत केली तर ,तुमचा पेन परत करताना तुमच्याकडे तो जे पहातो ना,ते खूप छान असतं….
गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.
घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो.कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे.कधी skinचं मलम देऊन टाकायचं…
गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.
कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टॅंडवर न लावता,सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली तर त्याचं “thank you” ऐकायला मस्त वाटतं….
गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.
किराणा दुकानाच्या गर्दीत,तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पहाणा-या त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.
माणसामाणसातील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…
गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.
जगण्याच्या रोजच्या धबडग्यात प्रत्येकाला हे सुचतंच असं नाही.
आपण द्यायचा सल्ला त्याला,जसा मी देतोय.
वाढवायचं प्रेम माणसामाणसातलं…
गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.
☆
लेखक : श्री प्रियदर्शन दातार
प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




