?  वाचताना वेचलेले  ? 

☆ साठीच्या पुढचा म्हातारा… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

थंड हवेच्या ठिकाणी जसा

नेहमीच गारवा असतो

तसाच — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो !

 

उजेडाचा त्रास होतो म्हणून

गॅागल वापरत असतो

काळ्याभोर काचेमागून

निसर्गसौंदर्य न्याहाळीत असतो!

शेजारीण घरी आली की

आनंदाने हसत असतो

बायकोला चहा करायला लावून

स्वत: गप्पा मारीत बसतो

 

कारण — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

पाय सतत दुखतात म्हणत

घरच्या घरी थांबत असतो

बाकी सगळ्या दिवशी मात्र

मित्रांबरोबर भटकत असतो!

चार घास कमीच खातो

असं घरात सांगत राहतो

भजी समोसे मिसळपाव

बाहेर खुशाल चापत असतो

 

कारण — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

औषधाचा डोस गिळताना

घशामध्ये अडकत असतो

पार्टीत चकणा खाता-खाता

चार चार पेग रिचवत असतो

अध्यात्माच्या गप्पा मोठ्या

चारचौघात झोडत असतो

मैत्रिणींच्या घोळक्यात मात्र

रंगेल काव्य ऐकवत असतो

 

कारण— 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

साठीच्या पुढचा म्हातारा

आता निवृत्तीत गेलेला असतो

विरंगुळ्याला जुन्या-जुन्या

आठवणीत रमत असतो

काम नसतं हातामध्ये

किंमत नसते घरामध्ये!

म्हटलं तर ज्येष्ठ असतो

तरी बराच तरूण असतो

संपून गेलेलं तारुण्य

पुन्हा आणू पहात असतो

 

कारण —

थंड हवेच्या ठिकाणी जसा

नेहमीच गारवा असतो

तसाच — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments