☆ विविधा ☆ जीवधन गड आणि नाणेघाट…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

३० जानेवारी २०२१ रोजी मी रात्री १०:३० वाजता ‘गिरीदर्शन’ च्या ‘जीवधन’ गड ट्रेक साठी ‘व्याडेश्वर’ समोर पोहोचलो. परंतु नेहमीची बस आलेली नव्हती आणि त्याऐवजीची ठरवलेली बस उशिरा येत आहे असे शुभवर्तमान कळले. पुढे जवळजवळ तासभर मागील ट्रेकच्या एकमेकांच्या रंजक गप्पा मारण्यात / ऐकण्यात वेळ कसा गेला ते मात्र कळले नाही. बदली बस मात्र छोटी होती त्यामुळे सर्वजण सामानासह जेमतेमच मावले. नारायणगाव येथे रात्री १:३० ला चहा घ्यायला थांबली तेवढीच नंतर एकदम पायथ्याच्या घाटघर गावातील मुक्कामाच्या घरीच थांबली.

घराबाहेर हवेतून एक “चर्र चर्र” असा आवाज ऐकू येत होता तो कुठून येतोय हे कळेना.  परंतु तेव्हा पहाटेचे ३:३० वाजलेले असल्याने आधी मिळेल तेवढी झोप घ्यावी आणि आवाजाचे कोडे सकाळी सोडवूयात असे ठरवून पथारी पसरल्या. पण थोड्याच वेळात मी जिथे झोपलो होतो त्याशेजारील बंद दरवाजाच्या फटीतून थंड हवा झुळुझुळू यायला सुरुवात होऊन थंडी वाजायला लागली. सकाळी तारवटलेल्या चेहेर्‍याने उठलो पण खिडकी उघडल्याउघडल्या ‘गुलाबी’ सूर्यदर्शन झाले आणि थकवा पार पळून गेला.  गरमागरम पोहे आणि काळा चहा प्यायल्यावर सर्व तेवीस जण ट्रेकसाठी सुसज्ज होऊन निघालो. त्याआधी थोडे जीवधन गडाबद्दल…

सातवाहन काळात म्हणजे इ. स. पू. पहिले शतक ते तिसरे शतक ह्या काळात बांधलेला हा एक अतिप्राचीन गड आहे. ह्यांच्या काळातच ‘नाणे घाट’ हा व्यापारी मार्ग बांधून काढण्यात आला. घाटाच्या माथ्याशी गुहा असून त्यात ब्राह्मी लिपीत मजकूर कोरला आहे. गुंफेत काही प्रतिमाही होत्या ज्यांचे आज फक्त पायच पहायला मिळतात. जीवधन हा ह्या नाणेघाटचा संरक्षक दुर्ग! चला तर पुढे… बघूयात वर्तमान काळात काय काय पाहायला मिळतंय जीवधन गडावर!

आमच्या आजच्या चमूमध्ये एक मनाने तरुण, गड-इतिहास-प्रेमी तसेच मोडी लिपी तज्ञ असे लळींगकर काका खास नवी मुंबईहून ट्रेकसाठी आले होते. मुक्कामच्या ठिकाणाहून गडाच्या पायथ्याजवळ बस आम्हाला घेऊन निघाली तेव्हापासूनच त्यांनी उत्साहाने आजूबाजूला दिसणार्‍या गडांची माहिती द्यायला सुरुवात केली होती.

त्यांनी बोट दाखवलेल्या दिशेला पहिले तर आम्हाला ‘नवरा-नवरी-करवली-भटोबा’ सुळके दिसले आणि त्यामागे काही ‘वराती’ सुळके दिसले. ह्या सगळ्यांना मिळून  ‘वर्‍हाडी  डोंगर’ असे गमतीशीर नाव आहे.

जंगलातील चढाई सुरुवातीला वाटली तितकी सोपी नव्हती. दगड घट्ट नसल्याने व उंच असल्याने त्यावर पाय जपून ठेवावे लागत होते. तरी बर्‍याच ठिकाणी दगडांवर पाय ठेवायला लोखंडी जाळ्या लावलेल्या दिसल्या.

साधारण ८० टक्के चढाई झाल्यावर श्वास चांगलाच फुलला होता. हयामागे कोरोना लोकडाऊन पोटी घ्यावी लागलेली अनेक महिन्यांची ‘सक्तीची विश्रांती’ कारणीभूत होती. पुढील २० टक्के वाटचालीत दगडी पायर्‍या चढून जाणे होते तसेच एका प्रस्तरावरून पुरातत्वखात्याने टाकलेली शिडी चढून जाण्याचा रोमांचक अनुभवही सर्वांना मिळाला.

साधारण अडीच तासात वर चढून आल्यावर उजव्या हातास थोडे खालच्या अंगास लपलेली धान्याची एक दगडी कोठी दिसते. आतमध्ये पायर्‍या उतरून जवळजवळ चार खोल्या असलेले अंधारे कोठार बघायला तुम्हाला टॉर्चच्या प्रकाशाचा आधार घ्यावाच लागतो. आत पायाला सर्वत्र मऊ माती लागते. कोरलेले  दरवाजे आणि कोनाडे असलेले व प्रवेशद्वाराच्या उंबरठावजा पायरीखालून पाण्याची पन्हाळ असलेली ही जागा “पूर्वी एखादे मंदीर असावे का?” अशी एक शंका मनात आल्यावाचून रहात नाही.

क्रमशः ….

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments