श्री चंद्रकांत बर्वे

☆ विविधा ☆ टार्गेट १००% ☆ श्री चंद्रकांत बर्वे ☆ 

मी एक आपला साधासुधा सिनिअर सिटीझन आहे. माझे तरुण मुलांशी इंग्रजीत बोलताना कधी कधी लई वांदे होतात. म्हणजे माझं इंग्रजी वाईट नाहीये पण बऱ्याच इंग्रजी शब्दांचे आम्ही त्यांचे मुळ शिकलेले अर्थ बदलले आहेत म्हणे. आता आम्ही लहानपणी तर्खडकरांची डिक्शनरी हाताशी घेऊन इंग्रजी पुस्तकं वाचायचो पण त्यात कधी कधी कॅब किंवा कॉप असे शब्द यायचे पण तो शब्दच आम्हाला त्या डिक्शनरीमध्ये मिळायचा नाही, तो slang म्हणजे बोलीभाषेतला आहे म्हणे मग अर्थ काय कळणार! मग इतर संदर्भ लक्षात घेऊन कॅबचा ड्रायव्हर असतो म्हणजे कॅब हे वाहन दिसतय किंवा कॉप पासून व्हिलन दूर पळायचा प्रयत्न करतोय त्या अर्थी कॉपचा अर्थ पोलीस असावा वगैरे आम्ही ओळखले. ठीक आहे आम्हाला अर्थ समजायला वेळ लागला पण त्यामुळे काही अनर्थ नाही झाला. पण हल्ली आम्हाला माहित असलेल्या शब्दांचे मूळ अर्थ बदलले आहेत, आता बघाना लाख रुपये कोटी रुपये वगैरे आम्हाला माहित आहेत. एक मिनिट, गैरसमज नको म्हणून सांगतो की अनेक वर्षे इमाने इतबारे नोकरी करून, खर्चात काटकसर करून वगैरे हे पैसे आम्ही साठवले पण नवीन जागा बुक करायला म्हणून चौकशी केली तेव्हा ती एजंट आणि बिल्डर मंडळी पेटी, खोका वगैरे शब्द वापरत होते, त्यावेळी मनात म्हटलं आपल्याकडे पेट्या, खोकी काही कमी नाहीयेत मुंबईत कुठेही आपण जागा बुक करू शकतो. सरतेशेवटी मला समजले की पेटी म्हणजे कॅश एक लाख रुपये आणि खोका म्हणजे कोटी रुपये. आता लाख रुपये पूर्वी कोणी तरी एका पेटीतून दिले असतील आणि कोटी रुपये एखाद्या भल्या मोठ्या खोक्यातून दिले असतील त्यामुळे हे शब्द तयार झाले असावेत असा आपला माझा कयास आहे. चुकभूल द्यावी घ्यावी.

काही शब्दांनी तर सरड्याने रंग बदलावा किंवा राजकीय नेत्याने पक्ष बदलावा त्याप्रमाणे नवीन अर्थ घेतलेले आहेत. त्यातला एक एकदम डेंजरस शब्द म्हणजे ‘गे’ (जीएवाय) या शब्दाचा आनंदी असा अर्थ आम्ही लहानपणी शिकलो होतो पण आता त्याचा अर्थ होमोसेक्शुअल म्हणजेच समलैंगिक पुरुष असा होतो म्हणे. असे बरेच साधेसुदे शब्द कुणा लिंगपिसाट लोकांनी वेगळ्या अर्थाने वापरायला सुरुवात केली हे आम्हाला समजतय त्यामुळे हल्ली तरुण मंडळींशी बोलताना आम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागतीये.

आता ‘लाच’ हा प्रकार आणि शब्द आपणा सगळ्यांनाच माहित आहे. हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. (संस्कृती रक्षकहो मला माफ करा!) पण देवाला नवस बोलणे ही एक प्रकारे त्याला लाच ऑफर करण्याचा प्रकार आहे. देवा मला परीक्षेत पास कर मी दोन किलो पेढे प्रसाद म्हणून वाटीन किंवा मी निवडणूक जिंकलो की या मंदिराला चांदीची मूर्ती दान करीन, सिनेमा हिट झाल्यास या पिराला चादर चढवीन, असे झाल्यास देवीला हिऱ्याची नथ देईन वगैरे वगैरे. पण एक चांगली गोष्ट आहे की नवस, प्रसाद, तीर्थ वगैरे अध्यात्मिक शब्द प्रचलित लाचेसाठी वापरले जात नाहीत. नाही तर बातम्या ऐकू आल्या असत्या की व्हिस्कीचा तीर्थ दिल्याशिवाय तो ऑफिसर भेटत नाही, इतका प्रसाद फाईलवर ठेवल्याशिवाय तो एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर फाईल पुढे सरकवत नाही, अमुक अमुक माणसाला पोलीस इन्स्पेक्टरचा नवस फेडताना अटक, किंवा निवडणुकीत १०० व्हिस्की बाटल्यांच्या तीर्थाचा अभिषेक केल्यावरच ती जिंकता येते वगैरे.

हां पण आता एक नवीन शब्द एन्ट्री घेत आहे. त्याला वेळीच आडवले पाहिजे. तसं लहानपणी माझं गणित चांगलं होतं तेव्हा आमचे गुरुजी मला १०० गुणांचे टार्गेट द्यायचे (ते टार्गेट साध्य झाले नाही ही गोष्ट वेगळी) मी सरकारी नोकरीत होतो. आम्हाला नोकरीत असताना काही टार्गेट दिलं जायचं, इतकेच नाही तर आम्हाला वार्षिक अहवालात देखील टार्गेट किती पूर्ण झाले वगैरे लेखी द्यावं लागायचं. त्यामुळे आपलं टार्गेट लक्षात घेऊन काम करण्याची आम्हाला जुनी सवय आहे. आता आपण क्रिकेट बघतो त्यावेळेस शेवटच्या काही ओव्हर शिल्लक असताना सतत टार्गेट वर समालोचक बोलत असतो. जसे सामना जिंकायला १७ चेंडू बाकी २६ धावांचे टार्गेट वगैरे. सचिनला तर कायम १०० चे टार्गेट असायचे आणि तरी त्याने १०० वेळा आपले टार्गेट पूर्ण केले ही गोष्ट वेगळी, हां तर असा ‘टार्गेट’ हा दिशादर्शक चांगला शब्द आहे.

पण काही टार्गट लाचखोर मंडळींनी हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत घेतलेला आहे, हे एकदम भीषण आहे. आपण बाकी साध्या सरळ मार्गी लोकांनी याचा वेळीच निषेध केला पाहिजे. त्यांनी लाच, हप्ता, चिरीमिरी, काळा पैसा, बेहिशेबी पैसे, मांडवली, तोड, तोडपाणी, व्हिटामिन R (रिश्वत), G फॉर्म, घूस, बेटिंग वगैरे शब्दातून स्वतःचे नवीन शब्द बनवावेत. आपल्यातील भाषाप्रभू मंडळींनी त्यांना या बाबत मदत करावी ही विनंती. पण आमच्या ‘टार्गेट’ या लोकप्रिय शब्दाला हात लावता कामा नये. हे सगळं मला सुचायचं कारण म्हणजे आता मी आजोबा झालेलो आहे. नातवांना आता यापुढे मी अभ्यासाची, खेळाची वगैरे टार्गेट्स देणार आहे आणि आयुष्याच्या या शेवटच्या दिवसात मला कोणीही भल्त सल्त बोललेलं चालणार नाही.

 

©  श्री चंद्रकांत बर्वे

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments