सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆“चिऊताईचा फ्राॅक” – लेखिका सुश्री नंदिनी प्रभाकर चांदवले ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नाव ..चिऊताईचा फ्राॅक

(बाल कविता संग्रह)

कवयित्री……नंदिनी प्रभाकर चांदवले

प्रकाशन:  यशोदीप पब्लीकेशन्स पुणे आणि निशीगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट संयुक्त विद्यमाने

पहिली आवृत्ती     १८/०१/२०२२

पृष्ठे         २०

किंमत      रु  ३०/—  

चिउताईचा  फ्रॉक – नंदिनी प्रभाकर चांदवले..

बालवाङमय हा साहित्यातला महत्वाचा प्रकार आहे.

वास्तविक वाचनाची आवड लागते ती लहानपणीच,

या बालसाहित्याच्या वाचनाने! मुलांची मने,जाणीवा,

समज, ते कशात रमतात, कशापासून दूर जातात या सार्‍यांचा विचार करुन आणि बालमनावर उत्तम संस्कार करण्याच्या दृष्टीने बालसाहित्याची निर्मीती होत असते. शिवाय भविष्यात जीवनाभिमुख होण्यासाठी एक पाया रचला जातो.  थोडक्यात मुलांच्या मनाला आणि भावनांना आकार देण्याचे काम बालसाहित्य करत असते.   

नंदिनी चांदवले या संवेदनशील व्यक्तीने ,मुलांची मने जाणून चिऊताईचा फ्रॉक हा सुंदर बालकवितांचा संग्रह नुकताच प्रकाशित केला.

सुप्रसिध्द लेखिका, बालसाहित्यकार, समीक्षक, विश्वकोश निर्मीत्या,विजया वाड यांच्या वाचू आनंदे या ऊपक्रमाअंतर्गत, यशोदीप पब्लीकेशन्स पुणे तर्फे तो प्रसिद्ध झाला.

हलवायाचे दुकान हा त्यांचा पहिला बालकविता संग्रह आणि आता चिउताईचा फ्रॉक.

यात एकूण १६ कविता आहेत. बालजीवनाचा विविध अंगाने विचार करुन लिहिलेल्या या आनंददायी कविता वाचताना लहान मुलेच काय  मोठी माणसं  सुद्धा सहज रमतात.

यात मुलांना रुचणारे, त्यांच्या बालपणाशी निगडीत असलेले  विषय त्यांनी हाताळले आहेत. पक्षी प्राणी आहेत.राने वने आहेत. वृक्षवल्ली आहेत.

पर्यावरणाचा बोध देणारी, महत्व सांगणारी काव्ये आहेत. सण आहेत. पाऊस आहे. निसर्गाचे मनभावन दर्शन आहे. या सर्वांशी मुलांची ओळख व्हावी, शिवाय त्यांचं जगणं आनंददायी व्हावं, चौकस, निरिक्षक व्हावं या विचाराने  प्रेरित होउन केलेल्या या कविता आहेत. अर्थपूर्ण  बडबडगीतेही मजेदार आहेत.

चला तर मग यातल्या काही कवितांचा आनंद घेउया.

राजुची धमाल या कवितेत त्या म्हणतात,

 राजुच्या  अंगणात

खूप खूप

गारा पडल्या

राजुने ओंजळीत पकडल्या

आनंदाने खाउन टाकल्या..

घाबरगुंडी ही कविताही अशीच मजेदारआहे.

  कोणी आणले शेंगदाणे

  कोणी आणले फुटाणे

फुटाणे पाहून

माकडाने मारली उडी

मुलांची उडली घाबरगुंडी..

नंदिनीताईंच्या रचनेत इतका जीवंतपणा,चैतन्य जाणवते की ‘माकडाने मारली उडी वाचताना  वाचकही  सहज मनातल्या मनात थरकतोच.

आजोबा. त्यांची काठी आणि ती शोधून आणणारा चिंतु आपल्याच घरातले वाटतात.

मोराविषयी लिहिताना त्या सहजच, मुलांना रंगवत उपयुक्त माहितीही देतात.

मोर बघा मोर

छान छान मोर

निळा निळा रंग

मोरपंखी पंख

हा तर आपला

राष्ट्रीय पक्षी..

झाड हेच आपले खरे मित्र, हे मुलांच्या मनावर  बिंबवताना कवयित्री म्हणतात,

चला चला

वनामधे

झाड लावू अधेमधे

मुले झाली खूप खूष

झाडाने दिली

फळे फुले

खेळण्यासाठी गार सावली

झाड आपला

आहे मित्र

करु त्याला आपण

दोस्त…

या रचनेतून त्या पर्यावरण पोषक संदेश मुलांना देतात.

घड्याळ, चलचल दादा, मैफल, चाहुल, दिवाळी अशा धम्माल कविता वाचतांना मन खरोखरच आनंदाच्या डोहात डुंबते.  साधे सहज,निर्मळ टपटपणारे शब्द.

त्यातली लय ,गेयता अगदी नदीच्या प्रवाहासारखी.

चिऊताईचा फ्राॅक ही शीर्षक कविता तर अत्यंत कल्यनारम्य. मैनाताईने चिऊताईला सापडलेल्या कापडाचा फ्रॉक शिवला.आणि तिला घालायलाही लावला  तेव्हां चिऊताईची प्रतिक्रिया  अगदीच हसवते.

घालून बघते तर काय

शेपटी राहिली ऊघडीच

चिऊताईला आला राग

म्हणाली

नक्कोच मला फ्रॉक.

या सर्वच कविता कल्पना रम्य आहेत. एका आनंदविश्वात त्या घेउन जातात. मुलांना विचार देणारा, समृद्ध करणारा, श्रीमंत करणारा असा हा नंदिनी चांदवले यांचा चिऊताईचा फ्रॉक हा बालकविता संग्रह.लहान थोरांनी वाचावा असा निर्मळ निरागस अनुभव  देणारा..

नंदिनीताईंचे  खूपखूप अभिनंदन!

आणि त्यांच्या साहित्य प्रवासाला खूपखूप शुभेच्छा!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments