सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री अरुणा मुल्हेरकर
☘️🌹अ भि नं द न 🌹☘️
शुभंकरोती साहित्य परिषद या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृत्तबद्ध काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती अरुणा मुल्हेरकर यांना त्यांच्या ‘संघर्ष’ या गझलेसाठी प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ई-अभिव्यक्ती समुहातर्फे श्रीमती मुल्हेरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
आज त्यांची पुरस्कार प्राप्त गझल ‘संघर्ष’ प्रकाशित करत आहोत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
प्रथम पुरस्कार प्राप्त गझल
कवितेचा उत्सव
☆ संघर्ष ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
(वृत्त ~ लवंगलता (८+८+८+४)
☆
संघर्षाविण नाही जीवन मला समजते आहे
अस्तित्वास्तव झगडायाचे पुरते कळते आहे
*
अशुद्ध होई पावन गंगा कलीयुगी या आता
सारित कचरा काठांवरती संथ वाहते आहे
*
चुकला नाही रामालाही वनवासाचा भोग
देवदानवामधील युद्धा छान जाणते आहे
*
कौरव~पांडव वावरताती विश्वातचि या सार्या
धर्मयुद्ध मग न्यायासाठी अटळ मानते आहे
*
कशी सिद्ध मी करू स्वतःला स्वस्थ बसुनिया सांगा
सापशिडीचा खेळ जणू हा असा खेळते आहे
*
जुगार आहे आयुष्याचा मांडियला हा वाटे
पटावरी या फासे अलगद तरी टाकते आहे.
*
निर्णय घेणे सोपे नाही प्रवाह अखंड वाहे
प्रवाहातुनी चालत असता मन घाबरते आहे
*
एक सारथी संसाराचा विश्वाचा तो नाथ
दयावंत तो कृपावंत तो श्रद्धा धरते आहे
*
जीवननौका भवाब्धीत या डचमळ डळमळ करते
तारायासी प्रभुजी या हो धावा करते आहे
☆
© अरुणा मुल्हेरकर
मिशिगन, अमेरिका, +१ २४८ ७०६९९९८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





