श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ सहा ठिपक्यांचा निर्मळ फुलोरा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
सरोजताई टोले
सरोवराच्या जलाच्या पृष्ठभागावर अलगद डोकावत सबंध सरोवर सुगंधित करतं ते कमल. या गुलाबी रंगाच्या आणि फुलणं म्हणजे नेमकं काय याचा मनमोहक वस्तुपाठ असलेल्या कमळाला सरोज अर्थात सरोवरातून जन्मलेलं असंही एक नाव आहे.
देहाला हे नाव मिळालेलं असणं आणि त्या नावाला जागणारं कार्य हातून घडलेलं असणं हा एक दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. सरोजताई टोले यांच्याबाबतीत हा गोड योग जुळून आलेला दिसतो.
दृष्टी ही मानवी जीवनाला मिळालेली एक अत्युत्कृष्ट अशी देणगी आहे. पण आपलं जग आपल्याच डोळ्यांनी आपल्याला हवं तसं पाहता येण्याची सवलत निसर्ग मात्र काहींना देऊ शकलेला नाही. मग पाहण्यासाठी यांना स्पर्श नावाच्या ज्ञानेंद्रियाचा आधार घ्यावा लागतो. आणि हा स्पर्शही हातांच्या बोटांनी केला तरच त्या स्पर्शाला दर्शनाचा सोहळा अनुभवता येतो. अन्यथा केवळ ऐकणं या एकाच मार्गावर अडखळत चालवं लागतं.
माणसाने अक्षर शोधलं… अक्षराला कल्पनेने चित्रित केलं आणि कागदावर त्याची प्रतिमा उमटवली… आणि दैवदत्त देणगीच्या साहाय्याने वाचून ते अक्षर मनात पोहोचवलं. पण ही प्रतिमाच जर पाहता येत नसेल तर ज्ञानाचा हा ओलावा कायमचा दुरावतो. यावर १८२४ मध्ये फ्रांस देशातल्या लुई ब्रेल नावाच्या शिक्षक महात्म्याने एक नामी उपाय शोधून काढला. त्याने कागदाच्या पृष्ठभागावर कागदाच्या मागच्या भागावर दाब देऊन उठाव निर्माण केला. या उठावाला बोटांच्या शेवटच्या टोकांनी स्पर्श केला की तो उठाव मन:चक्षुंना दिसू लागला. असे सहा उठाव एकत्रित उमटवून त्याने एक अक्षर निर्मिले. मग याच उठावांच्या रचनांमध्ये वैविध्य आणून वर्णमालेतील शक्य ती सर्व अक्षरे जुळवली… आणि केवळ स्पर्शाच्या साहाय्याने वाचता येऊ लागले… अर्थ डोळ्यांना ओलांडून जाणिवेच्या अंतरंगात पोहोचू लागला! आरंभी केवळ फ्रेंच भाषेत उपलब्ध असलेले हे उठाव पुढे १३३ भाषांना आपल्या कवेत घेते झाले आणि अंध व्यक्तींना वाचनाची संधी प्राप्त झाली. भारतात १९५१ च्या दरम्यान भारतीय भाषांत ब्रेल आली. पण खरी समस्या होती ती म्हणजे ही लिपी कागदावर सहजी उमटवायची कशी? त्यासाठी ब्रेलर नावाचे टंकलेखन यंत्र डेविड अब्राहम यांनी विकसित केले. याला पर्किन्स ब्रेलर म्हणतात.
आपल्या कथानायिका सरोजताई टोले या महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांमध्ये वंचित विकास संस्थेच्या माध्यामातून, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसोबत काम करीत. मराठी व्याकरणाच्या अभ्यासकांना मो. रा. वाळंबे हे नाव परिचयाचे असतेच. सरोज ताई त्यांच्याच कन्या. सरोजताई डोळस मुलांसाठी निर्मळ रानवारा नावाचा छापील अंक काढीत असत… त्यात कथा, कविता, गोष्टी असत. संपादन सुद्धा त्याच करीत. हे काम त्यांनी सलग अकरा वर्षे नेटाने चालवले होते.
याच कामाच्या दरम्यान सरोजताई दृष्टी दिव्यांग मुलांच्या संपर्कात आल्या. ताई या मुलांना अभ्यासाची क्रमिक पुस्तकं वाचून दाखवायच्या. पुढे पुढे आधुनिक तंत्रज्ञान हाताशी आल्यावर त्यांनी त्यांच्या सहका-यांच्या मदतीने पुस्तके ध्वनिमुद्रित करून द्यायलाही आरंभ केला.
पण याला काही मर्यादा आहेत. कानांनी पुस्तक ऐकणं आणि बोटांनी ते प्रत्यक्ष वाचणं यात महदंतर आहे. पण मजकूर ब्रेल लिपीत करून घेणं हे मोठं जिकिरीचं आणि खर्चाचं काम असतं. डोळस लोकांसाठी वापरल्या जाणा-या पुस्तकांपेक्षा आकार अर्थातच मोठा असतो. अंध मुलं म्हणाली… ताई! आम्हांला आमचं आमचं वाचायचं आहे… काहीतरी करा ना?
त्यावेळी सरोजताई अवघ्या एकावन्न वर्षांच्या होत्या. या वयात ब्रेल शिकणं तसं कठीणच. पण ताई अंधशाळेत शिक्षिका असलेल्या त्यांच्या एका मैत्रिणीकडून ही सहा टिंबांची भाषा शिकल्या! कुणाकडून तरी एक सेकंड hand अर्थात आधी वापरलं गेलेलं, जुनं ब्रेल लिखाण यंत्र मिळवलं… आणि ताई लिहू लागल्या… ब्रेल लिपीत लिहू लागल्या… जे केवळ बोटांच्या स्पर्शांनी वाचता येते…! जाडसर कागदावर एक एक अक्षर उमटवणं म्हणजे सुकलेल्या शेतात एक एक बीज पेरीत पेरीत पुढं जात राहणं… त्याला अर्थाचे अंकुर फुटतील तेंव्हा फुटतील. पण सरोजताईच्या हाताला यश लाभत गेलं. त्यांनी एक न अर्धे… तब्बल ३०० पेक्षा जास्त पुस्तकं अशी लिहून काढली आणि दृष्टी दिव्यांग बंधू-भगिनी यांच्यासाठी एक मोठे ज्ञानदालन उघडून दिले! पुढे पुढे तर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग गाथा, चांगदेव पासष्टी हेही ग्रंथ ब्रेलमध्ये लिहून दिले!
पण मुळातच ब्रेल मध्ये लिहिणं कठीण होतं. काहीवेळा अक्षरांत ध चा मा होई… पण वाचक ते समजून घेत… अनर्थ होत नसे. पण एक अडचण होती. एक पुस्तक लिहून झाले की त्याची दुसरी प्रत आपोआप तयार होऊ शकत नसे. नेहमीच्या छापील पुस्तकांची झेरॉक्स /फोटो कॉपी निघू शकते पण ब्रेलची नाही. म्हणून दुसरी प्रत हवी असेल तर पुन्हा ब्रेल टंकलेखन करावेच लागत असे. सरोज ताईनी हेही कष्ट उपसले. पण पुढे संगणक क्रांती आली! संगणकाच्या साहाय्याने मूळ पुस्तकाच्या अधिक प्रती निघू सहजी निघू लागल्या. मग सरोज यांनी त्यांच्या आणखी काही सख्यांना या कामात येण्यास उद्युक्त केले. सामाजिक कामात सहभाग म्हणून या सा-याजनी मिळून एकत्र आल्या… आणि लिहू लागल्या…. त्यातून कवितांचा, गोष्टींचा फुलोरा फुलू लागला…. अक्षरांना नवा उभार आणि अर्थाला उभारी लाभली! पण याही कामाला वेगाच्या मर्यादा पडल्याच. मग ताईनी ब्रेल लिपीत वेगवान छपाई करू शकणारे स्वयंचलित यंत्र इंग्लंडमधून त्यावेळचे म्हणजे आजपासून पंधरा-वीस वर्षांपूर्वीचे सुमारे पावणे तीन लाख मोजून विकत आणले… हे पुण्यातलं पहिलंच यंत्र होते! मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, कन्नड… या सारख्या भाषांतून ठिपके आकार घेऊ लागले…. भाषांची मर्यादा राहिली नाही. Software तज्ज्ञ श्री. देवेंद्र राक्षे आणि भाषातज्ज्ञ ज्योतीताई जोशी, मुग्धाताई देशपांडे, गौरीताई काळे, सुषमाताई हुपरीकर, सुधाकर वाळंबे, स्वाती आणि राजीव खममकर आणि इतर अनेक लोकांचे साहाय्य होतेच. शालेय क्रमिक पाठ्यपुस्तके तर झालीच. पण इतर विषयांवरील पुस्तकेही निर्माण होऊ लागली. भगवद गीता, तुकोबांची गाथा, आनंद ओवरी नावाचे नाटक यांचाही समावेश झाला. गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा बंगाली भाषेतील आणि महातामा गांधी यांनी हिंदीत केलेला भावानुवादही सरोज ताई यांनी ब्रेल मध्ये आणला आहे.
आज सरोज ताई यांनी वयाचा अमृत महोत्सव पार केला आहे. पण त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस त्यांनी अंधांच्या आयुष्यात साहित्याचे अमृतकण पेरण्याचे कार्य करून दाखवले आहे. आजही त्यांची ही उधळण अविरत सुरु आहे.
जगदंबेने पुराणात राक्षस निर्दालन केले. नव्या युगात अज्ञानाचे राक्षस नष्ट करण्याचे कार्य करणा-या सरोज ताई आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनी महिषासूर मर्दिनीची विविध रुपेच जणू.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






