सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # २८६
☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(भुजंगप्रयात वृत्त)
☆
जुईच्या फुलांचे बहर मागते मी
सुगंधी सुखाचा कहर मागते मी
*
कधी शांत वारा कधी वादळी तू
तुझी जीवघेणी लहर मागते मी
*
मुसाफीर तू मी तुझी वाट आहे
नवे आणखी ते शहर मागते मी
*
नको दूर जाऊ जवळ तू रहा ना
तुझे मोरपंखी प्रहर मागते मी
*
सदा भंगते का इथे स्वप्न माझे
पुन्हा वास्तवाचे जहर मागते मी
*
जुने धाम माझे कुणी ध्वस्त केले?
पुराणे अता खंडहर मागते मी
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




