डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मिस्ड काॅल… ☆ डॉ. शैलजा करोडे

खिडकीतून उजेड डोळ्यांवर आला तशी माझी झोप चाळवली. अंथरूणातून उठण्याची इच्छा नव्हती. उठवलेही जात नव्हते. चिकुन गुनीयाने माझी सारी हाडे व सांधे जाम झाले होते. वाॅश रूमपर्यंत जाणंही अवघड झालं होतं. पाय जमिनीवरून उठतच नव्हते, जणू फेविकाॅल लावलाय पायांना, इतक्या वेदना, सहनशक्तीच्या पलिकडे. जवळ जवळ बेडरिडनचं झाले होते मी. तापाने अंग फणफणत होतं. खिडकीतून येणारा उजेडही डोळ्यांना सहन होत नव्हता. मी तोंडावरून पांघरूण ओढलं. पण झोप येत नव्हती. घड्याळ पाहिलं, सकाळचे साडेसात वाजले होते. रोज सहा / साडेसहाला येणारी मोलकरीण अजून आली नव्हती. बाहेर पावसाने जोर धरला होता. आज ही कामाला येते कि नाही, मी अंथरूणात, निलेशचं आँफिस, माझ्या निलाक्षीचं काॅलेज, त्यात मोलकरणीची दांडी झाली तर? माझा जीव कातर झाला. उशीजवळचा मोबाईल उचलला, नंबर डायल केला.

फोन नो रिप्लाय झाला तशी माझी चिंता वाढली, पुन्हा डायल केला, काही सेकंदासाठी फोन उचलला गेला, ” अग अनिता केव्हा येतेस. ” फोन मध्येच कट झाला. काही वेळ थांबून पुन्हा फोन केला, तर नाव आले अनिता सांगळे, अरे नामसाधर्म्याने फोन माझ्या मैत्रिणीलाच लागला. मी लगेच फोन बंद केला. अनिताचा दुपारी फोन आला, पण तो दुसरा नंबर होता. माझ्याकडे तो मिस्ड काॅल झाला. नंतर निवांतपणे नंबर डायल केला. ” बोला, कोणाचा नंबर आहे हा. माझ्या फोनवर मिस्ड काॅल होता’. ‘नाही ताई, तुम्हीच मला सकाळी मिस्ड काॅल दिलात ‘ माझी ट्यूब लाईट पेटली ‘ अनिताताई काय ‘ ‘ होय ‘ ‘ अनिताताई सकाळी तुमचा फोन चुकून लागला हो. पण हरकत नाही या निमित्ताने का होईना, आज आपण पुन्हा संपर्कात आलो बघा. कशा आहात तुम्ही? मग आमच्या साहित्यिक घडामोडींवरील गप्पा, विचारांची देवाण घेवणा, क्षेम कुशलता यावर जवळ जवळ दहा मिनीटे बोलणे झाले. तिच्या पतीचे दुःखद निधन, त्यांची जाणवणारी उणीव, तिचा शोक, अति रडण्याने डोळ्यांना त्रास, माझं आजारपण, या संवादातून मन खूप हलकं झालं. औषधांनी ताप कमी झाला होता. त्यात या मिस्ड काॅलचीही सकारात्मक ऊर्जा दडलेली होती.

असेच जुने मित्र मैत्रिणी माझ्या माणुसकी कथेमुळे पुन्हा संपर्कात आले होते. माझी ही कथा प्रचंड व्हायरल झाली होती. ज्याला आवडली त्याने फाॅरवर्ड केली होती. फेसबुकही कोणी पोस्ट केलेली त्यामुळे ही कथा महाराष्ट्रच नव्हेतर कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान एवढेच नव्हेतर परदेशस्थ भारतीय इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, टांझानिया, मलेशिया, फिजी, पॅरीस अशा अनेक देशातील वाचकांनीही त्या कथेचा आस्वाद घेतला होता. रोज मला वीस /पंचवीस फोन यायचे. सगळेच फोन काही रिसिव्ह करू शकत नव्हते, ते मिस्ड काॅल व्हायचे. मग माझ्या सवडीने मी संपर्क साधायचे आणि वाचकांशी संवाद साधायचे. प्रत्येकाचे अनुभव, त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना शेअर करायचे, त्यातूनच मग माझ्या कथांचा प्रांत अधिकच समृद्ध होत गेला.

विचारांच्या शृंखलेत माझ्या डोळ्यावर झोपेने पुन्हा अंमल चढवला. ” प्रिया, जाऊन येतो ग ” निलेश रूममध्ये डोकावला. माझा प्रतिसाद न मिळाल्याने त्याने माझ्या कपाळाला हात लावला, ” बाप रे, प्रिया, किती अंग तापलंय तुझं, थांब मी थर्मामीटर आणतो ” थर्मामीटर लावला 103 डिग्री फॅरनहिट. निलेशने लगेच पॅरासिटेमोलची गोळी दिली. ” मी नाही जात आज आँफिसला. तुला हाॅस्पिटलला अँडमीट करतो. घरी बसून नुसत्या गोळ्या घेऊन बरं होणार नाही हे दुखणं ” ” अहो डाॅक्टरांची ट्रिटमेंट चालू आहे ना. एवढे पॅनिक होऊ नका. हा व्हायरल फिवर तीन / चार दिवस घेतोच. नका टेन्शन घेऊ. ” 

अंथरूणात पडूनही कंटाळा येतो. ताप वाढू लागला तसा डोळ्यावरही झोपेचा अंमल चढला. ग्लानी आल्यासारखं झालं नि नेत्रपाकळ्या आपोआप मिटल्या. ऊन/ सावलीसारखं, जाग/ झोपेच्या या लपंडावात स्मृतींचं एक/एक पान उलगडू लागलं. मिस्ड काॅलचं सकाळपासून मनावर गारूड होतंच, त्याला उजाळा मिळाला.

एम ए च्या प्रथम वर्षाला होते मी. सगळे लेक्चर संपले आणि मी ग्रंथालयात जाण्यासाठी निघाले. अर्थशास्त्रासारखा कठीण विषय निवडला होता मी. सिलॅबसमधील प्रिसक्राईब बुक्स आणि रेकमेंडेड बुक्स बरीच होती. सगळीच पुस्तकं घेणं शक्यच नव्हतं ग्रंथालयातही लिमिटेड काॅपीज व विद्यार्थी संख्या अधिक म्हणून घरी नेण्यासाठी लवकर पुस्तकंही मिळायची नाहीत. मग तिथेच रिडींग रूममध्ये बसून अभ्यास करायचा हे माझे धोरण, विशेष म्हणजे ज्या त्या दिवशी शिकवले जाणारे टाॅपिक्सची त्याच दिवशी माझी रिव्हिजन व्हायची.

मी ग्रंथालयाकडे जातांना श्रीमंत बापाची बिघडलेली मुलं, यांनी छेडलं मला. शीळ घालत प्रितम गाणं म्हणू लागला,

व्हाट इज मोबाईल नंबर

व्हाट इज युवर स्माईल नंबर

करनी है प्रायवेट बाते

दे दे कोई प्रायवेट नंबर

ए शट अप

टेक इट ईझी बेबी, मोबाईल नंबर दे, लगेच निघालो मी, बाकी बाते रातमे, क्यो? म्हणत तो विकृत हसला.

एव्हाना मी माझं पायताण काढून हातात घेतलंच होतं आणि एक लगावणार तोच प्रितमने माझा हात घट्ट पकडला.

ए ठीक नही है बेबी, हम आपसे प्रेमसे बात कर रहे है और आप हमे दुत्कार रही है, टोळक्यातील त्याचे इतर मित्रही हसू लागले.

देवकृपेने निलेश तिथून जात होता. ” चल यार, क्या बात है, प्यारकी बाते करना चाहते हो, मुझसे करो, म्हणत निलेशने एक त्याच्या मुस्काटात ठेवली, तसे टोळक्यातील सर्व जण निलेशवर तुटून पडले. नेमके प्रा. पेंडसे व प्रा. शानबाग ग्रंथालयाकडे येत होते. ” हे काय चाललंय इथे ” तशी प्रितम व गँगने काढता पाय घेतला.

पण प्रितमला माझा मोबाईल नंबर कोणाकडून तरी मिळाला. मला रात्री अपरात्री फोन करू लागला. काॅलेजात मिस्ड काॅल देऊन हैराण करू लागला. मी साहजिकच अस्वस्थ झाले. घरी आई बाबांना व निलेशलाही सांगितले, निलेश म्हणाला ‘ प्रिया घाबरू नकोस, माझे काका डी वाय एस पी आहेत. चांगलीच समज देतील त्याला.

माझे आई बाबा, निलेश व निलेशचे डी वाय एस पी काका यांच्या मार्गदर्शनाखाली रितसर मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. सुरूवातीला प्रितमने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपल्या श्रीमंत बापाचाही हवाला दिला. पैसे घेऊन तक्रार निकाली काढा असेही त्याने पोलिसांना सुचविले. पण डी वाय एस पी साहेबांनी विशेष लक्ष घातले असल्याने प्रितमची डाळ शिजली नाही. त्याच्या बाबांनीही प्रयत्न केले प्रकरण मिटविण्याचा. पण आम्ही ठाम होतो. शेवटी प्रितमने माफीनामा लिहून दिला.

निलेश त्यादिवसापासून सावलीसारखा माझ्यासोबत होता. प्रितमला चांगलीच समज मिळाली होती व निलेशचा भक्कम आधार यामुळे पुढे त्याने माझ्या वाटेला जाणे बंद केले.

निलेशचं आकर्षक व्यक्तिमत्व, त्याची विनयशीलता, कर्तृत्व, महत्वाकांक्षा, भरारी घेण्याची उमेद, अभ्यासातील प्रगती, नात्यांची जाण, दुसर्‍यांचा आदर करण्याची वृत्ती यामुळेच मी त्याच्याकडे ओढली जात होते, त्याच्या प्रेमात पडले होते. पण निलेशचंही तसंच असेल काय? कसं समजेल? एक मोठं प्रश्नचिन्ह होतं माझ्यापुढे? आणि माझ्या या प्रश्नांसाठी मला एक मार्ग सापडला. 7 फेब्रुवारी, रोझ डे, निलेशला गुलाबपुष्प देऊन भावना व्यक्त कराव्यात काय? पण एवढी हिंमत होईल काय माझी? मन नुसतं धडधड करत होतं.

7 फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येला माझ्या मोबाईलवर मिस्ड काॅल आला. काॅलर माझ्या काॅन्टक्ट लिस्ट मध्ये नव्हता. माझा जीव कातर झाला. मिस्ड काॅलला, काॅल बॅक मी करूच शकणार नव्हते कारण नंबर परिचयातील नव्हता. उद्या निलेशला सांगू या. रात्रभर मला झोप नव्हती. या गदारोळात मी केलेला रोझ डे चा प्लॅनच फिस्कटला.

आजचा पहिला तास इंटर नॅशनल एकाॅनाॅमिक्सचा संपला व मी क्लास रूममधून काॅरीडाॅर मध्ये आले. तेवढ्यात निलेशही समोर आला हातात लाल गुलाब घेऊन. ” प्रिया, या गुलाबाचा स्विकार करशील? . क्षणभर मी गोंधळले, अरे माझ्या मनातले मी न सांगताच याला कसे कळाले. याची माझी विचार शृंखला जुळली तर? माझ्या चेहर्‍यावरील गोंधळ पाहून व मी लगेच प्रतिसाद न दिल्याने निलेश हिरमुसला. ” साॅरी प्रिया, तुझी इच्छा नसेल तर? ” ” नाही, नाही निलेश, तसं नाही. दे मला तो गुलाब. ” आणि निलेशची कळी खुलली. हा गुलाम सदैव आपल्या सेवेत हजर राहील साहिबा. निलेश पुरे हं. नाहीतर मी रूसेन ” ‘ बाप रे आतापासून रूसवा, माझी तर वाटचं लागेल? ” मग कोणी सांगितलं तुला या वाटेवर यायला. जा तुझ्या मार्गाने ‘ ” साॅरी बाईसाहेब, कान पकडतो “

निलेश एक प्राॅब्लेम झालाय रे. काल मला एकाच फोनवरून तीनदा मिस्ड काॅल आलेत. मी फोन उचलण्याच्या अगोदरच तो बंद व्हायचा. प्रितम आणि गँगने परत डोकं वर काढलं असेल काय? ” ” नाही प्रिया तसं नाही ” ” तू इतक्या ठामपणे कसं सांगू शकतोस ‘. ” कारण प्रिया काल मीच तुला मिस्ड काॅल दिला. मनातील भावना व्यक्त करायच्या होत्या. पण माझी हिंमतच झाली नाही, कारण माहित नव्हते तुझ्याकडून कसा प्रतिसाद मिळेल. म्हणून मी दुसर्‍या नंबरवरून तुला मिस्ड काॅल दिला. “

” अरे, पण मी काल किती घाबरले होते. रात्रभर किती बेचैन होते. “

” साॅरी प्रिया, आय अँम एक्सट्रिमली साँरी ” ” अरे, साॅरी कशाबद्दल? आज मी ही तुला गुलाबपुष्प देणार होते. पण कालच्या मिस्ड काॅलने मी खूप घाबरले होते. मन अशांत झालं होतं, पण आता मनावरचं सगळं ओझं उतरलंय. निलेश थँक्स अ लाॅट, आभारी आहे मी तुझी. तुझी साथ मिळाली तर आयुष्याचं सोन होईल माझं ” ” प्रिया, आपल्या आयुष्यात आलेला हा मणिकांचन योग आपण आपल्या खास ओळखीने, मिस्ड काॅलने साजरा करत जाऊ.

आमच्या दोघांच्याही कुटुंबातून विरोध नव्हताच. कोणत्याही कटकटीं, शिवाय अगदी गुण्या गोविंदाने, आमचे शुभमंगल पार पडले. आयुष्याची रेशीमगाठ बांधली गेली.

निलेश त्यांच्या आँफिस कामासाठी एक आठवड्यासाठी नवी दिल्लीला गेले होते. सकाळी सकाळी फोनची रिंग वाजली. झोपेतच होते मी. फोन घेण्यासाठी हात उशीकडे गेले. रात्री झोपतांना फोन उशीजवळ घेऊन झोपण्याची माझी सवय. फोन उचलणार तितक्यात तो बंद झाला, मिस्ड काॅल झाला. अच्छा तर आज रोझ डे ” यासाठी मिस्ड काॅल होता काय? ” जनाब, आप मिस्ड काॅल देते हो, पर हम भी कुछ कम नही, मिस्ड काॅलका जवाब मिस्ड काॅल ही होगा, समझे आप ” अन मी मिस्ड काॅल देण्यासाठी फोन हाती घेतला.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments