डॉ. माधुरी जोशी
मनमंजुषेतून
☆ अक्षर यात्रा… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆
खरंतर चौथीपर्यंत माझं अक्षर वाईट…. खरं म्हणजे घाणेरडं… काय लिहीलंय तेच आईला कळायचं नाही म्हणून फटके खाल्लेत… पण अक्षर सुंदर काढायचं कसं हे कुणीच कधी शिकवलं नाही. ते शिकवलं माजगावकर सरांनी. जरासे चिडके पण वळणदार अक्षरांवर तुडुंब प्रेम करणारे माजगावकर सर.. कशी काय जाणे मला पुस्तीची गोडी लागली… कदाचित आईला अक्षर सुधारून दाखवायची जिद्द आणि तिचे फटके वाचवण्याची पण..
आज माझं अक्षर सुंदर, वळणदार अगदी टाईप केल्यासारखं आहे असं कुणी म्हंटलं की माजगावकर सरांची आठवण आल्यावाचून रहात नाही.. ५वी मधे होते मी… एक दिवस सांगितलं गेलं की पालकांना सांगा… पुढच्या आठवड्यापासून बोरू, दौत आणि पुस्ती आणायची आहे. मग खरेदी झाली. आईनं शिंकाळ्या सारखी दौत बांधून दिली… आप्पांनी पेनासारखं बोरूला टोक तासून दिलं. पुस्तीवर नाव घातलं. माधुरी रानडे… सगळं घेउन मी सोमवारी शाळेत गेले. नेहमीच्या बाई सरांपेक्षा वेगळेच सर वर्गात आले. पु लं च्या चितळे मास्तरांसारखे.. पांढरा धुवट फुलं शर्ट, त्यावर खरंच निळसर ग्रे जुनासा कोट, डोक्यावर काळी टोपी, लाल चॉकलेटी रंगाचा जाड फ्रेमचा चष्मा, दाढीचे खुंट वाढलेले, काही दात पडलेले… ते सर आजही डोळ्यासमोर आहेत. आणि जन्माचं सुंदर अक्षर देणारी त्यांची पुस्ती पण…. ते अक्षर आज सत्तरी नंतरही सोबत तसंच.. वळणदार, एकसारखं, सुवाच्य…
मला आवडलं ते पुस्ती लेखन आणि जमलं पण… चार ओळीत अक्षरांची उंची, रूंदी, वळणं, काना, मात्रा, वेलांटी, आकार, ऊकार सगळं मस्त उमटायला लागलं. माझं अक्षरंच बदललं. खोडून खोडून काळी मिचकूट होणारी, फाटणारी पानं लख्खं हासरी झाली. माजगावकर सरांच्या आशीर्वादानं आजही वाण्याची लॉंड्रीची यादी, वस्तुंना लावलेल्या नावांच्या चिठ्ठ्या डब्या बरण्यांवर छान दिसतात. स्पष्ट, नीट…
आणि मनाशी हे पक्कं झालं की “अक्षर बदलता येतं”… ते रंग रूप उंची देहाची ठेवंण यांसारखं जन्माला चिकटलेलं नाही. अक्षर बदलता येतं.
सरांसारखेच इतरही ठसे उमटतं होते. परीक्षांच्या बैठक व्यवस्थेत मी रानडे.. अल्फाबेटिकली मोहिनी समुद्र नावाची हुषार पुढच्या वर्गातली मुलगी शेजारी बसे. ती स्कॉलरंच होती.. काय देखणं अक्षर… ४/४ मार्गांची दीर्घ उत्तरं अर्धा पाऊण फुलस्केप होत असे. उत्तराबद्दल अजिबात शंका नसलेली ती सरसर सुंदर अक्षरांत लिहीत सुटे. खाडाखोड नाही, बाण नाहीत, अपूर्ण सोडणं नाही, गिचमीड नाही. आजही तिचा पेपर, सरसर लिहीणारी बोटं आणि केशरी शाई पेन डोळ्यासमोर आहे. आणि तिचा बुद्धीमान, मोठं कपाळ असणारा, कुरळ्या केसांतला चेहरा पण…. तो ठसा खोलवर उमटला हे नक्की..
माझं शिक्षण M. A. पर्यंत होतांना विषयाच्या मांडणी बरोबर अक्षराचं पण कौतुक होई… मनात कुठेतरी बरं वाटे.. माजगावकर सरांच्या पुस्ती ची किमया आयुष्यभर गौरवास्पद ठरली खरंच…
पुढे मी पण शिक्षिका झाले. आदरणीय लता जोशी, देवस्थळी, देशमुख बाई त्यांची गोलाकार, वळणदार, एकसारखी अक्षरं आजही स्मरणात आहेत. चंदा काळे, माया संदानशिव अशी पण…. बाकीच्यांची वाईट होती असं नाही पण छान आलंच पाहिजे अशी काळजी, इच्छा, प्रयत्न नव्हते. शिकवण्यातली खोली, अभ्यास, एकात्मता अक्षरात नव्हती. पण शिकवणं सर्वांचं उत्तम.. माझ्या अक्षराचा फायदा घेत मी मुलींसाठी सुंदर साहित्य शोधून साध्या सोप्या भाषेत फलक लेखनातून खूप मजकूर, कविता, विशेष माहिती पोहोचवली. चित्रकलेच्या सुदुंबरे कर बाईंची, हिरवेची छान साथ मिळाली. न्यायला येणारे पालक, मधल्या सुट्टीत मुली ते फळे वाचत उभे रहात. कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटे. तो फळांचं जणू मुलींशी बोलंत असे.. त्यातूनच पुस्तक साकारलं
” बोलका फळा “… चक्क शासनमान्यता मिळालेलं. ज्या मुलींचं अक्षर छान होतं त्यांना फळे सुपूर्द केले. त्या पण ऊत्साहानी लिहीत दिलेला मजकूर… त्यांना शाब्बासकी आत्मविश्वास लाभले.
“लाखो मुलं परीक्षेला बसतात. तुम्ही अभ्यास करता पण पेपरमधे घाण अक्षर असलं की परीक्षक वैतागतो. मग मार्गांवर परीणाम होतो. अक्षर छान करा”…. मुलींना मुद्दा पटला आणि त्या सावध झाल्या… अक्षर सुधारण्याचा प्रयत्न केला त्यांनी… अजून काय हवं शिक्षकाला?
आज हे सगळं आठवायचं कारण आजचा ” जागतिक अक्षर दिन”… अमेरिकेतला एक उद्योजक.. जॉन हॅनकॉक… त्याची सही… स्वाक्षरी फार सुंदर, देखणी, वळणदार, नक्षीदार… त्या स्वाक्षरी मुळे अमेरिकेत २३ जानेवारी हा
” राष्ट्रीय हस्ताक्षर दिन ” म्हणून साजरा करतात. मग जगभर पण.
मला वाटलं अमेरिकेत कशाला जायचं ?हे ज्ञान, सल्ला, महत्व समर्थांनी दासबोधात लिहून ठेवलंय की..
“अक्षर सुंदर वाचणे सुंदर”.. आणि ते नेहमी, सतत, तसंच, सुंदर…. कधीतरी नाही… इच्छाशक्ती हवी, सराव हवा. झोकून द्यायला हवं. एकदा साध्य झालं की कामंच झालं… जन्माचं कल्याण… म्हणून समर्थ म्हणतात… “दिसामाजी काहीतरी लिहावे”.. म्हणजेच सराव…
खरंच यांचा अनुभव घेते आहे. अगदी रोजचा सूर्योदय, मैफलीतला ललत, जुन्या वस्तुंचे ऋण नाही तर कामवाल्या बायकांचं जगणं…. अगदी कुठलाही विषय… सत्तरी ओलांडली तरी अगणित विषय, शब्द, प्रसंग स्मृतीत फेर धरतात… पेनातून झरतात… लेख होतात त्यांचे. हे सगळं कुठे असतं?कोण शक्ती देतं?कसं समजतं, सुचतं, बहरतं…. उत्तर न मिळणारे प्रश्न… सतत येतात…
तरी मी लिहिते..
प्रत्येकानं लिहावं कारण प्रत्येकाकडे अनुभवांची, विचारांची, शब्दांची गाठोडी असतातच. पण लोक आळस करतात. संकोच करतात. दुर्लक्ष करतात. खरं तर लिहीण्यात विचार करणारा मेंदू, विचाराला भावनांचा पदर लावणारं मन, अक्षरं उमटवणारी बोटं, त्यांना शक्ती देणारं मनगट, सगळं नीट, निरपेक्ष, सुक्ष्म पाहणारे डोळे… हे सगळं म्हणजे = सुंदर लेखन… ते विचार सुंदर अक्षरांत असतील तर कोजागिरीच्या दुधाला केशराचा रंग गंधंच… मग ते विचार देखणे, कलात्मक, वाचनीय…
पण आता काळंच बदलला… सुंदर अक्षर हवंय कशाला? स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर घेतील बघून फॉंड..
मी मात्र आजही मेसेज करत नाही.. शक्यतो हातांनी लिहीते..
फुलांनी मजकुराचा कोपरा सजवते.. टाईप केलेला आणि हातांनी लिहीलेला मजकूर तोच असतो..
पण हाताच्या अक्षरातलं माया, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, अभिनंदन, सांत्वन थेट ह्रदयात भेटतं.. लिहिणारी मी आणि वाचणारे सारे आनंदी, समाधानी, तृप्त होतात….
शब्दांचे ऋण मानुया… आणि सुंदर अक्षरांनी पूजा बांधुया…
कराल ना विचार!!!
© डॉ.माधुरी जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





