श्री विश्वास दाते
मनमंजुषेतून
☆ परतफेड – – ☆ श्री विश्वास दाते ☆
☆
रोजच्या गडबडीत मागे वळून पाहायला जमत नाही किंवा लक्षात पण राहत नाही. पण एकदा का भूतकाळात बघायचे विचार सुरू झाले की एखाद्या वेलीला धुमारे फुटावे तसे आठवणीच्या वेलीला नवीन कळ्या येऊ लागतात. वर्षानुवर्षे, कुठेतरी मेंदूच्या कप्प्यात हरवलेल्या आठवणी ताज्या होऊन समोर येतात. असाच अनुभव मला नुकताच आला.
१९६६ साली, इंजिनिअरिंग प्रवेश मिळाला खरा पण प्रश्न होता फी परवडण्याचा. आता गंमत वाटते की त्यावेळची वार्षिक रुपये ३६० ही फी सुद्धा आम्हाला परवडणारी नव्हती. सरकारी स्कॉलरशिप आणि कर्ज मिळाले तरच माझे इंजिनिअरिंग चालू राहणार होते. सुदैवाने मला मेरिट कम मीन्स (म्हणजेच चांगले मार्क आणि पालकाचे कमी उत्पन्न अशी अट असलेली) ही स्कॉलरशिप मिळाली.
परंतु इतर खर्च आणि पुस्तके यासाठी ती स्कॉलरशिप पुरेशी नव्हती. त्यामुळे मला सरकारी शैक्षणिक कर्ज (लोन) हेही घ्यावे लागले. चार वर्षे, लोनची रक्कम मला सेन्ट्रल बिल्डींग येथे मिळत असे. या दोन्ही सरकारी मदतीमुळेच माझे शिक्षण पूर्ण होऊ शकले. व त्यामुळे पुढील आयुष्य बऱ्यापैकी सुखात गेले. यासाठी सरकारचा मी आजन्म ऋणी आहे.
खरी गंमत पुढेच आहे. १९७२ सालची गोष्ट आहे. दोन वर्षे नोकरी करून थोडे पैसे साठवल्यावर, मी माझ्या कर्जाची परतफेड करायची ठरवली. कर्जाचे पुस्तक आणि चेकबुक घेऊन मुंबईहून पुण्याला आलो आणि सेंट्रल बिल्डिंग मध्ये चौकशी करत एका कक्षात हजर झालो. संपूर्ण कक्ष एकंदर शांततेत होता. कामाची गडबड अजिबात दिसत नव्हती.
मी जन्मभर सरकारी कचेऱ्याना आणि त्यांच्या मधून येणाऱ्या पत्राना घाबरत आलो आहे. त्या दिवशीही, धडधडत्या छातीने घाबरत, तिथे बसलेल्या एका व्यक्तीला विचारले, “नमस्कार, शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी कोणाला भेटू. ”
वर न बघता त्याने दुसऱ्या एका व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश केला. तेथे बसलेल्या व्यक्तीने, त्याच्या शांततेत भंग झाल्यामुळे थोड्याशा चिडक्या आवाजात विचारले, “काय पाहिजे? ”
मी माझे कर्जाचे पुस्तक पुढे करत सांगितले, “१९६६ ते १९७० या काळात, मी शैक्षणिक कर्ज घेतले होते. गेली दोन वर्षे पुरेसे पैसे साठवण्यात गेले. आता त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आज मुंबईहून आलो आहे. ”
कुणीतरी एखाद्या मंगळ ग्रहावरून आलेल्या माणसाकडे पहावे तसे तो माझ्याकडे बघत राहिला. थोडा वेळ शांततेत गेला. मला पण अपराध्यासारखे वाटू लागले.
“अहो, हे लोन कुणीच परत करत नाही. तुम्ही कशाला या फंदात पडताय? ”
कदाचित माझ्या आधी, काही विद्यार्थ्यांनी कर्ज परत केलेही असेल परंतु मला पळवून लावण्याचा हा एक डाव असावा.
“अहो, मी खरंच माझे कर्ज फेड करू इच्छितो. तुम्ही कृपया गेल्या दोन वर्षाच्या व्याजासह, मी किती रक्कम भरायची तेवढे मला सांगा. ”
‘कोण वेडा आला आहे आणि मला काम करायला सांगत आहे’ हाच विचार त्या गृहस्थाच्या मनात आला असावा. सरकारला पैसे मिळणार यापेक्षा स्वतःला काम करायला लागणार याची जास्त फिकीर त्याला असावी.
“तुम्ही कर्ज परत करायला आलेले पहिलेच” असे पुटपुटत त्याने मला बाहेर बाकावर बसायला सांगण्यात आले. थोड्यावेळाने दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली. मी पण जवळच्या ठेल्यावर काहीतरी खाऊन आलो.
नंतर, मी परत एकदा आत जाऊन, ‘मला मुंबईला परत जायचं आहे, तरी कृपया लवकर लवकर मोकळे करा’ अशी विनंती केली. जेवणाच्या सुट्टीनंतर मी परत हजर होईन अशी त्याची अपेक्षा नसावी. तेव्हा मात्र, त्या कर्मचाऱ्याला ‘मी पैसे परत करण्याबद्दल खरंच गंभीर आहे’ असे पटले असावे.
त्याने आज जाऊन भिंतीला लावलेल्या फाईलच्या ढिगाऱ्यातून, कुठून तरी लाल फितीतली एक फाईल धूळ झटकत बाहेर आणली. वर्षानुवर्षे सरकारी रेकॉर्ड ठेवण्याबद्दलच्या शिस्तीबद्दल माझा आदर अचानक खूप वाढला. मग बराच वेळ काहीतरी आकडेमोड करत, अखेरीस त्याने मला एक रक्कमेचा आकडा सांगितला.
तोवर साडेतीन होऊन गेले होते. माझ्याकडून चेक घेऊन, त्याने माझ्या पुस्तकावर कर्ज संपल्याचा शिक्का मारला. त्याचे आभार मानून, मी एक दीर्घ सुस्कारा सोडत परतीच्या प्रवासासाठी पुणे स्टेशनकडे धाव घेतली.
☆
© श्री विश्वास दाते
संपर्क – चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





