सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “उसनवारी – –” ☆ सुश्री शीला पतकी ☆
‘वारी’ या शब्दाचा अर्थ जाणे आणि येणे.. ॲक्शन आणि रिऍक्शन.. देणे घेणे…. त्यामुळे तो ‘उसनवारी’ साठी फार महत्त्वाचा ठरतो. उसने घेतलेले पदार्थ पुन्हा परत द्यावयाचे असतात.
– – आता ही उसनवारी किंवा उसने घेणे हा शब्द हळूहळू अपरिचित होत जाईल, कारण आता कोणी कोणाकडे काहीही मागायला जात नाही कारण त्यात कमीपणा असतो, त्यांना तो वाटतो आणि मुळात समृद्धी एवढी झाली आहे की कोण कशाला कोणाकडे मागेल?…
ही उसनवारी पूर्वी वाडे आणि चाळी यांच्यामध्ये चाले. वाड्याचे आणि चाळीचे रहिवासी हे गरीब आणि मध्यमवर्गीय अशा गटातलेअसायचे. सर्वसाधारणपणे सर्वांची परिस्थिती सारखीच. 23 /24 तारखेपासून महिनाअखेर सुरू होई व शेवटच्या आठवड्यात चणचण नावाची प्रक्रिया सुरू होई. मग हा पदार्थ आहे तर तो पदार्थ नाही, ती वस्तू आहे तर ही वस्तू नाही… मग चाळी-वाड्याचे हे गणित उसनवारीवर चालू राहायचे. त्यांची आर्थिक घडी बळकट करणारी उसनवारी एक संस्था होती. त्यामुळे कोणाला कमतरता जाणवली नाही. मुळात मागायला लाज वाटली नाही. उणेपणा वाटला नाही आणि परकेपणाही वाटला नाही कारण प्रत्येकाला अशा उसनवारीची गरज भासायची. त्यामुळे उसने मागणं हे कमीपणाच आहे ही संभावनाच नव्हती. साधारण उसनवारी किंवा उसने घेणे हे 24 ते 30 या तारखेला चालत असे. महिनाभर उसनवारीचे पदार्थ ठरलेले… त्यामध्ये साखर, चहा, दूध, यांचा प्रामुख्याने समावेश असे. हे कधीही मागावेत. जसा जसा शेवटचा आठवडा येईल तसे ज्वारीचे गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, तेल यापैकी कोणत्याही उसनवारीला मज्जाव नव्हता. ज्याच्याकडे ते असे तो दुसऱ्या माणसाला तो पदार्थ देऊन टाकत असे. आणि त्याच्याकडे जे असे ते त्याच्याकडून मागून घेत असे. अशा तऱ्हेने शेवटचे सहा सात दिवस सामाजिक सहयोगाने तडीस जात असत… पण यामुळे कुणी दुःखी नव्हता… आपण कमी आहोत ही भावनाही नव्हती… उलट सगळे एकमेकांना उपयोगी पडत असल्यामुळे बंधू आणि भगिनी भाव हा वाढीस लागत असे.
भाजी मार्केटवरून एखादा माणूस आला तर शेजारचा हमखास यायचा आणि म्हणायचा “ काय कोथिंबीर कढीपत्ता आहे का जादा? ”.. जादा कधी नसायचं पण आहे त्यातली चार पानं त्यालाही दिली जायची. उसने, देवाणघेवाण यामुळे वाडा आणि चाळी यांच्या अर्थव्यवस्था बळकट असत. बरं उसने फक्त डाळ पीठ चहा दूध इतकेच मागत नसत… वस्तूरुपी उसनवारी सुद्धा व्हायची…. उदाहरणार्थ… एखाद्याच्या घरी मुलगी बघायचा कार्यक्रम असेल तर चाळीतली वाड्यातली एकमेव खुर्ची, कोणाच्या घरातला चांगला गालिचा, चांगल्या कप बशा, पोह्यासाठी असलेल्या छोट्या डिशेस, असं सगळं तातडीने पुरवलं जायचं. इतकंच काय त्या मुलीसाठी कुणाकडे असलेली एखादी चांगली साडीसुद्धा नेसायला दिली जायची. ही झाली प्रासंगिक उसनवारी…
याशिवाय तातडीची उसनवारी वेगळीच असे. त्यामध्ये एखाद्याचे अचानक रॉकेल संपे आणि स्टोव्ह बंद पडायचा.. मग तुमचा स्टोव्ह देता का अर्धा तास? (किंवा पुढे गॅस सिलेंडरची उसनवारी सुरू झाली.) पाहुणेरावळे घरी आले तर शेजाऱ्याच्या सतरंज्या घेऊन जाणे, चटई आणि पाणी भरण्यासाठी हंडे नेणे, लग्न कार्यामध्ये शेजारपाजारच्या घरातील मोठाली पातेली नेणे, हे आवर्जून होत असे. वाड्यात बंब एका शेजारी एक असे. एखाद्याला घाई असली तर शेजारच्या बंबातले पाणी एक बादली तो घेऊ शकत होता आणि त्यांच्यात तापल्यावर त्यांच्या घरातला माणूस ते पाणी घेत असे.
या उसने देणे घेणे प्रकारामध्ये एखादे आपल्या जिव्हाळ्याचे घर असे आणि ते गरीब असतील तर आम्ही आईला सांगत असू, “ अगं त्या विमलकाकूंना एक आठवाभर पीठ पाहिजे. ” (आठवा हे माप आहे) आई म्हणायची ” नेऊन दे की “.. आम्ही त्या मापात ते पीठ दाबून दाबून भरत असू आणि मग विमलकाकूंना ते पीठ दिले जाई…ज्यामुळे विमलकाकूंकडे जास्तीत जास्त पीठ जावे हा उद्देश.
साखरेचे तसेच.. “अग त्या कांताच्या आईला साखर हवी आहे” आणि “दे” म्हणाली की दोन पेले साखर देऊन आणखीन दोन पेले त्यात घालत असू आणि आईला सांगायचे दोन पेले साखर दिली बरं.. कारण कांताची आईच्या एकट्या राहण्यावर आमचं प्रेम होते..
…. या उसने मागण्याने एकमेकांची गरज लागत असे.. जिव्हाळा वाढत असे.. प्रत्येकाला समोरच्याच्या परिस्थितीचा नेमका अंदाज असायचा. चार वेळा कोणी उसनं मागायला आले म्हणून कोणीही त्यांना असं कधी म्हणलं नाही की ” आले बाबा वाटी घेऊन. ” त्यामुळे मागणाऱ्याला मोकळेपणा वाटायचा. या उसनवारीने सगळ्यांच्या तात्कालीक गरजा भागवल्या. कोणी कोणाला श्रीमंत केलं नाही, पण वेळ मात्र मारून नेली, सारून नेली, आणि तारुनही नेली. एकमेकातला जिव्हाळा वाढवला.. संवाद वाढवला… आपलेपणा वाढवला… जो आज कुठेही दिसत नाही. आज कोणाची कोणाला गरजच वाटत नाही. सगळं ऑनलाईन असल्यामुळे आपण या आपलेपणाच्या सगळ्या लाईन ऑफ करून टाकल्यात… आणि आपण सदैव ऑनलाइन असतो. काही कमी की गेली ऑर्डर… अर्ध्या तासात माणूस हजर…
…. हे अर्थात त्यावेळेला परवडणारंही नव्हतं आणि ती सोयही नव्हती. गरिबांचा- मध्यमवर्गीयांचा खरा मोठा आधार होता उसनवारी. आज असं उसनं मागणारी कुटुंबे आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आमचे ते दिवस आठवून डोळे भरून येतात. आजच्या फक्त ऐश्वर्यापेक्षा ते अपुरेपण फार सुंदर होतं. एकमेकांना जोडणारं.. एकमेकांशी बांधलं गेलेलं!
त्या वेळा संपल्या, ती गरिबी संपली, त्या गरजाही संपल्या.. पण त्या जिव्हाळ्याचे.. प्रेमाचे ऐश्वर्य मात्र आजही मनामनामध्ये कायम आहे. तीच एक गोष्ट न परत केलेली आहे.
वाचक हो, तुम्हाला आठवते का अशी केलेली उसनवारी? मला आठवते शेजारच्या काकूंना व्हीक्सची डबी आणणं परवडायचं नाही. त्या कधीतरी एखादी डबी आणायच्या आणि मग सगळ्यांना थोडं थोडं विक्स लागेल तसे द्यायचे. पण त्यांना लागेल तेव्हा त्या बोटभर विक्स उसने म्हणून घेऊन जायच्या.
म्हणायच्या.. ” एक बोट विक्स उसने घेतलं गं… “
…. आज या सगळ्या गोष्टीची गंमत वाटते…! हे सगळं आठवलं का.. तर दुधाची पिशवी होती म्हणून गवळ्याला सांगितले ‘आज दूध नको’. दूध तापवले. पिशवी कालची होती.. ते नासले. आता दूध आणणार कोण? आणि उसने मागावं कोणाला? त्यावरून हा सगळा लेखन प्रपंच.
– – बघा आवडते का…..! हो आणि लिहा की आपलाही एखादा अनुभव!!!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




