श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “पांढरीशुभ्र बनवाबनवी” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“बापाचं नाव? “

“येशा. मयत. ” 

‘धर्मा कोर्टाबिर्टात जाऊन आला असावा. त्याला ते सगळं माहिती होतं. ‘

पुलं ची म्हैस कथा ऐकली आहे का? त्यातला हा धर्मा मांडवकर. म्हशीचा मालक. कोर्टात, पंचनाम्यात काय काय विचारतात हे ठाऊक असलेला धर्मा मांडवकर आजच्या कौन बनेगा करोडपतीच्या दृष्टीनं टॅलेंटेड माणूस आहे. त्याच न्यायानं “चि. व चि. सौ. कां. ” चित्रपटातील टिल्ल्या आठवतो का? हा सुद्धा कौन बनेगा करोडपतीच्या दृष्टीनं टॅलेंटेड मुलगा आहे.

“रिॲलिटी शो” या नावाखाली जो प्रकार चालतो, तो जंगलात पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरासारखा आहे. पिसारा फुलवून नाचणारा मोर फक्त पुढूनच पहायचा असतो, असं म्हणतात.

खूप वर्षांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्स ची पहिलीच आवृत्ती होती, त्यावेळची एक वारंवार केली गेलेली कृती आजही माझ्या लक्षात आहे. त्या लहान मुलांमध्ये एक मुलगा होता. गाण्यात कितपत कुशल होता हा आजही प्रश्नच आहे. त्याची आर्थिक परिस्थिती कशी बेताची आहे आणि तरीही तो इथपर्यंत कसा पोचला आहे यावर निवेदिका खुमासदार आणि प्रभावी निवेदन करत असे. मग अश्रू वाहत असणारे डोळे दाखवले जात. प्रेक्षक रडत असत. हा प्रकार खूप चालला. असो.

हिंदी सारेगमप मध्ये एकदा संगीतकार बप्पी लाहिरी परीक्षक म्हणून आले. ते येतानाच त्यांचा तबला सोबत घेऊन आले होते की काय? त्यांनाच ठाऊक. त्यांनी एका स्पर्धकाला त्यांचा तबला भेट म्हणून दिला, त्यांच्या गळ्यातली सोन्याची साखळी दिली. अभिनेत्री रेखा तर येताना घरूनच खाऊचा डबा घेऊन आल्या होत्या. स्पर्धकांना स्वतःच्या हातानं भरवत होत्या. स्पर्धा सुरु असताना असले प्रकार चालवले जातात, ते स्वाभाविक असतात की तो त्यांच्या स्क्रिप्टचा भाग असतो?

अनेकांनी हे स्पष्ट केलं आहे की, ‘रिॲलिटी शो’ हे नुसते नावालाच रिॲलिटी शो असतात. वास्तवात, त्यातली प्रत्येक गोष्ट हेतुपूर्वक आखूनच घडवून आणलेली असते. काही दिवसांपूर्वी प्रख्यात बासरी वादक श्री. अमर ओक यांच्या एका मुलाखतीत त्यांनी रिॲलिटी शो चं महाभयंकर खेदजनक आणि उबग आणणारं वास्तव सांगितलं आहे.

‘रिॲलिटी शो’ या प्रकारात अनेक तथाकथित आणि मुळातच अत्यंत भंपक प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. सांगितिक स्पर्धा, नृत्य स्पर्धा, स्टँड अप कॉमेडी हे जसे आहेत तसेच ‘कौन बनेगा करोडपती’ सारखे कार्यक्रम सुद्धा याच श्रेणीत आहेत. ‘कॉमेडी शो’ मध्ये समीर चौगुले ऑफिसात परकर घालून येतो, तबला फोडतो, ए आर रहमानच्या गाण्याची टर उडवतो हे सगळं स्क्रिप्टेड असतं. स्क्रिप्टेड असतं म्हणजे काय? तर कुणाच्या तरी सुपीक (? ) डोक्यातून या कल्पना उगवलेल्या असतात. दिग्दर्शक नामक व्यक्ती अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याकडून त्यानुसार काम करवून घेतात. ते सगळं चित्रिकरण एडिट केलं जातं. त्यातलं जेवढं दाखवून जास्तीत जास्त टीआरपी उकळता येईल तेवढंच दाखवलं जातं.

‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, ‘डब्ल्यू डब्ल्यू एफ’, हे सुद्धा त्यातलेच प्रकार आहेत. चोवीस तास घरात कोंडून ठेवलेली माणसं कशी वागतात, याचा एपिसोड एका तासात दाखवतात. मग उरलेल्या तेवीस तासांमध्ये काय काय घडलं याची माहिती कुठंय? म्हणजे रिॲलिटी शो या नावाखाली अत्यंत प्रामाणिकपणे, शुद्ध, निर्भेळ फसवणूकच करण्याचा धंदा चालतो.

एका कॉमेडी शो मध्ये गौरव मोरे या अभिनेत्याच्या तोंडी “अरे म्हाताऱ्या, फ्रिज उघडला तरी तुझी कोळंबी होते” हे वाक्य आहे. त्यावर प्राजक्ता माळी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर हे गडाबडा लोळून हसताना दाखवले आहेत. जर हा खरा विनोद असेल आणि इतका हसण्यासारखा असेल तर प्रसाद ओकांच्या मुलानं त्यांना असं म्हटलेलं चालेल का? प्राजक्ता माळी वैयक्तिक आयुष्यात हा डायलॉग वापरेल का? बाकीच्यांचं सोडा, गौरव मोरे तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात असे डायलॉग वापरेल का? नाही ना..

इथेच सगळ्यांना वेड्यात काढून शो ची चर्चा वाढवून त्या मुलाच्या व्हिडिओला व्हायरल करण्यात ‘कौन बनेगा करोडपती’ची पब्लिसिटी टीम यशस्वी झाली आहे. हा संपूर्ण शो स्क्रिप्टेड आहे. प्रत्येकाच्या तोंडचं प्रत्येक वाक्य आधीच ठरवून लिहिलं गेलेलं आहे.

टॅलेंटेड मुलांसाठी ”कौन बनेगा करोडपती’ची ही विशेष मालिका सुरु आहे. ही मालिका लाईव्ह नाही. रेकॉर्डेड आहे. इशित भट्ट हा मुलगा इयत्ता पाचवीत आहे. वयाच्या सहाव्या वर्षी पहिलीत घातलं असेल तर आता त्याचं वय किती असेल? दहा वर्ष तरी असेलच. दहा वर्षं वयाच्या मुलाला लाखो रुपयांच्या बक्षिसासाठी कोणते प्रश्न विचारले गेले, हे पाहा – 

१) दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम लावा. (हा होता निवडीचा प्रश्न)

२) सकाळी जो आहार घेतात त्याला काय म्हणतात? उत्तर आहे नाश्ता. हे उत्तर दिल्यावर मिळणार पाच हजार रुपये.

३) दुसरा प्रश्न दहा हजार रुपयांसाठी. चित्रात एक कुलूप दाखवलं आहे. आणि प्रश्न आहे की, चित्रात दाखवलेल्या वस्तूचा उपयोग सांगा.

४) तिसरा प्रश्न पंधरा हजार रुपयांसाठी. टँगो, कथक आणि ब्रेक हे कशाचे प्रकार आहेत?

५) चौथा प्रश्न वीस हजार रुपयांसाठी. बुद्धिबळाच्या पटावर खेळाच्या सुरुवातीला किती राजे असतात?

पाचवा प्रश्न पंचवीस हजार रुपयांसाठी विचारला गेला आणि तिथे हा इशित भट्ट चुकला. तो चुकला की, त्याला चुकायला लावलं हा सुद्धा एक प्रश्न आहे. कदाचित प्रसिद्धी मिळवायला चार प्रश्नांची प्रसिद्धी पुरेशी होईल असं वाटल्यावर हा प्रकार आवरता घ्यायचा अशी योजना ठरलेली असेल. कारण ही परीक्षा नव्हती, हे पूर्ण मनोरंजन होतं. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट..! बस्स..!

देशभरातून निवडण्यात आलेल्या टॅलेंटेड मुलांना हजारो रुपयांसाठी या अशा दर्जाचे प्रश्न विचारले जातात? तिसरीच्या ज्ञानपीठ परीक्षेत किंवा चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेतले प्रश्न पहा आणि स्कॉलरशिपची रक्कम पहा. हजारो रुपयांसाठी असले फालतू प्रश्न विचारुन त्यालाच टॅलेंटेड मुलगा म्हणण्याचं पिल्लू सोडून मजा बघण्याचा हा धंदा आहे. इशित भट किंवा त्याच्यासारखीच सो कोल्ड टॅलेंटेड मुलं मुली निवडली जातात की मुद्दाम योजली जातात? हा प्रश्न कुणालाच कसा काय पडत नाही? ‘कौन बनेगा करोडपती’ची “टॅलेंटेड” या शब्दाची व्याख्या नेमकी काय आहे?

“अशी ही बनवाबनवी” पहिल्या डायलॉग पासून शेवटपर्यंत तोंडपाठ असलेली शेकडो मुलंमुली आमच्या पिढीत होती. आजही त्या सिनेमाचे बहुतेक सगळे कॉमेडी संवाद बऱ्याच जणांना पाठ आहेत. पुलं च्या कॅसेट्स पाठ आहेत. म्हणजे ही सगळी माणसं टॅलेंटेड झाली का? एखादा सिनेमा दहा वेळा पाहिला की डायलॉग पाठ होतात. त्यात टॅलेंट असतं का? कुठेही हा सिनेमा लागला की, कुणीही माणूस अगदी उत्स्फूर्तपणे यातले संवाद अचूक म्हणू लागतो, याला टॅलेंट म्हणायचं का?

आज इशित भट च्या संस्कारांविषयी आणि पालकांविषयी भरभरून बोललं जातंय. पण मग ह्याच इशित भट च्या वयाची एक छोटी मुलगी अशाच एका रिॲलिटी शो स्पर्धेत “ही पोरगी साजूक तुपातली” हे गाणं गायली तेव्हा संस्कारांविषयी का बोललं गेलं नाही? परीक्षकांनी “हे गाणं तुझ्या वयाला योग्य नाही” असं का म्हटलं नाही?

महाराष्ट्रात गौतमी पाटील नामक एक कलावंत बाई आहेत. त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्या लहान मुलामुलींना स्टेजवर बोलावतात आणि त्यांना स्वतःसारखं नाचायला लावतात. त्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतात. त्यावेळी या लहान मुलांच्या संस्कारांविषयी काहीच बोललं जात नाही?

एका नामांकित शाळेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं लहान गटातल्या मुलांचा “लव्ह इज वेस्ट ऑफ टाईम” या गाण्यावर डान्स बसवला होता. पालक मोठ्या कौतुकाने शूटिंग करत होते. शिक्षक टाळ्या वाजवत होते. त्यावेळी संस्कारांचा विचार कुणाच्याच मनात कसा काय आला नाही? हे सगळं एक नागरिक म्हणून प्रत्येकानं विचार करण्यासारखं आहेच.

मनोरंजनाच्या नावाखाली वाट्टेल तशा स्क्रिप्ट लिहिल्या जातात आणि कुणाच्याही तोंडून त्या वदवून घेतल्या जातात, हे मनोरंजन क्षेत्रातलं उघड सत्य आहे. “इतक्या लहान वयात अमिताभ बच्चन समोर बसायला मिळतंय हे त्या मुलाचं भाग्यच आहे आणि तो अमिताभ बच्चनशी असं बोलला” हे लोकांच्या दुखावण्याचं खरं कारण आहे.

” तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका”, “मला लेक्चर देऊ नका”, “मला अक्कल शिकवू नका” हे घरोघरी आपल्याच मुलांच्या तोंडून रोज ऐकून घेणारे पालक आहेत. त्यांचं काय? जर खरोखरच त्या मुलानं स्वतःहून अमिताभ बच्चन यांच्याशी असं वर्तन केलं असतं तर काय झालं असतं, याचा विचार करा. असं झालं असतं तर, त्याचा हा एपिसोडच आला नसता. वाहिनीने त्या मुलाला काढून टाकलं असतं. पण तसं झालेलं नाही. उलट हा एपिसोड मुद्दाम दाखवण्यात आला आहे.

दारु पिऊन कॉलेजच्या प्राचार्यांच्या बंगल्याबाहेर लघुशंका करणारा राजू रस्तोगी लोकांनी सहकुटुंब सहपरिवार सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. एका जाहीर कार्यक्रमात भाषणातले शब्द बदलून अर्थाचा अनर्थ करुन कार्यक्रम कसा उधळता येतो, हे लोकांना सिनेमा थिएटरमध्ये मोठ्या आकर्षक पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. अशी हजारो उदाहरणं इथं सांगता येतील. पण तात्पर्य हेच आहे की, मुलाचं वागणं चुकीचं ठरवलं गेलंय, कारण तो अमिताभ बच्चनशी तसं वागला आहे. तो अन्य घरातल्या अन्य कुणाशी असा वागला असता तर मीडियानं त्याच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतं का? एका रात्रीत ऐंशी हजार रुपये दारूवर उडवून, अडीच कोटी रुपयांच्या गाडीने दोन जणांना उडवून मारणाऱ्या मुलाच्या बाबतीत हा कौटुंबिक संस्कारांचा मुद्दा मिडिया का लावून धरत नाही?

प्रश्न अनेक आहेत, कितीतरी आक्षेप आहेत. मनोरंजन आणि ज्ञानरंजन हे दोन वेगळे विषय आहेत. पण “मनोरंजनातून ज्ञान मिळतं” या खुळचट थेरापायी, कोट्यवधी प्रेक्षकांना नादी लावून स्वतःच्या आर्थिक लाभाची तुंबडी भरुन घेणाऱ्या वाहिन्यांना, स्क्रिप्ट रायटर्सना, दिग्दर्शकांना कुणीच धारेवर का धरत नाही, हा खरा प्रश्न आहे. या सगळ्या प्रकरणात इशित भट हा तर एक कठपुतळी आहे. त्या कठपुतळीच्या दोऱ्या भलत्याच कुणाच्या तरी हातात आहेत. ती बाहुली नाचवून पैसे गोळा करणारा भलताच कुणीतरी आहे. आणि या खेळाला सत्य मानून प्रेक्षक फसले आहेत…!

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted