श्री सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ भारतातील ज्येष्ठ नागरिकांची सद्यपरिस्थिती. – लेखक : श्री राजीव शास्त्री ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक समस्यांचे सर्वेक्षण करत असताना बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद झाला. त्यांच्याशी बोलताना त्या समस्यांचे त्यांचे मूळ कारण कुठेतरी आर्थिक परिस्थितीशी निगडित असल्याचे प्रकर्षाने जाणवले. आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने वयोमानाप्रमाणे आवश्यक असलेल्या सुविधांचा ते वापर करू शकत नाहीत, तणावमुक्त राहू शकत नाहीत आणि म्हणून कदाचित ते समाजात वावरताना येणाऱ्या अपरिहार्य अडचणींचा सामना करायला कमी पडतं असावेत हे लक्षात आले.
गेल्या काही वर्षांपासून आवश्यक त्या आरोग्यसेवा उपलब्ध होऊ लागल्याने संपूर्ण जगातील नागरिकांचे आयुष्यमान वाढू लागले आहे आणि अर्थातच आपला भारत देश त्याला अपवाद नाही. भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या जाणवण्याइतकी वाढत चालली आहे. वर्ष २०११नंतर जनगणना झाली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार आज मितीला भारतामधील जेष्ठ नागरिकांची संख्या साधारणपणे १५ ते१७ कोटी आहे. हि संख्या एकूण लोकसंख्येचा विचार करताना दखलपात्र असल्याने त्याचा स्वतंत्रपणे सखोल अभ्यास आणि राज्यकर्त्यांबरोबर समाजाकडूनही सहानुभूतीपूर्ण विचार होणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतामध्ये केंद्र सरकारकडून आणि महाराष्ट्रासह बहुतेक राज्य सरकारांकडून बऱ्याच चांगल्या योजना राबविल्या जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ नागरिक कल्याण कार्यक्रम (IPSrC) (बिनसरकारी संस्थांना आर्थिक मदत, डिमेंशिया आणि अल्झायमर सारख्या आजारी व्यक्तींकरिता कायमस्वरूपी मदत केंद्र आणि दुर्गम भागात मोबाईल वैद्यकीय मदत), राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP), (दारिद्रय रेषेखालील जेष्ठ नागरिकांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्तीवेतन योजना(IGNOAPS), राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) (ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत श्रवण यंत्र, व्हील चेअर वगैरे), वरिष्ठ पेन्शन विमा योजना (एक रकमी गुंतवणूक करू शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीवेतन), वरिष्ठ नागरिक कल्याण निधी (SCWF) (अर्थ संस्थांकडे न मागितल्या गेलेल्या रकमेचा ज्येष्ठ नागरिकांसाठी विनियोग), माता-पिता आणि वरिष्ठ नागरिकांसाठी भरणपोषण आणि कल्याण अधिनियम २००७ वृद्ध पालकांची जबाबदारी टाळणाऱ्या पाल्यांसाठी कायदेशीर मदतकेंद्र आणि अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम किंवा तत्सम सोय), तसेच करांमध्ये सवलत अशा प्रकारच्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त रेल्वे, विमान प्रवासात सवलत, हॉस्पिटलमध्ये प्राधान्यक्रम, शहरी भागात विरंगुळा केंद्र, डे केअर सेंटर सारख्या सुविधा, डिजिटल साक्षरता आणि गुंतवणुकीसंबंधी मार्गदर्शन अशाही सुविधा उपलब्ध आहेत.
अमेरिका किंवा युरोपियन देशांमध्ये साधारणपणे अशाच धर्तीवर सुविधा मिळतात. भारतासारखा एक मोठा लोकशाही असलेला देश म्हणजे अमेरिका. अमेरिकेमध्ये ६५ वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ नागरिक समजली जाते. आपल्याकडे निवृत्तीवेतन दिले जाते तसे देण्यासाठी तिकडे Social Security Number (SSN) अशी एक संकल्पना आहे. हा ९ आकडी क्रमांक अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येकाला जन्मतः मिळतो आणि देशाबाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीच्या पहिल्या दिवसापासून दिला जातो. त्या व्यक्तीच्या पगारातील काही रक्कम त्या नंबरच्या खात्यात वर्ग केली जाते. सरकारकडूनही त्या प्रमाणात त्या खात्यात पैसे जमा केले जातात. आणि हे साठलेले पैसे निवृत्तीवेतनासाठी आवश्यक असलेला नोकरीचा कालखंड पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीला दरमहा दिले जातात. मिळालेल्या माहितीनुसार खाजगी, सरकारी असा भेदभाव न करता, कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही पदावर कार्यरत असलेली अमेरिकन नागरिक व्यक्ती ह्या सेवेचा लाभ घेऊ शकते.
फरक करायचा झाला तर भारतात पुरेसे निवृत्तीवेतन फक्त केंद्र/राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना किंवा Employees’ Provident Fund Organisation (EPFO). अंतर्गत येणाऱ्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मिळते. खाजगी क्षेत्रातील विशेषतः तृतीय, चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांची किंवा छोट्या व्यावसायिकांकडे काम करणाऱ्यांकरीता अशी कोणतीही व्यवस्था नाही. भविष्य निर्वाह निधी म्हणून मिळालेली एकरकमी रक्कम कशाही प्रकारे गुंतविली तरी वयाची सत्तरी आली कि महागाईच्या हिशोबाने अपूरी पडायला लागते. खरं तर त्या वयापासून त्यांची आर्थिक गरज वाढत जाणार असते. अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती जरी आपल्याकडील परिस्थितीपेक्षा भिन्न असली तरी संख्यात्मक दृष्ट्या तिथे निवृत्तीवेतन हे जास्त गरजू नागरिकांपर्यंत पोहोचते असे नक्की म्हणता येईल.
अमेरिकेमध्ये तिथल्या दारिद्रय रेषेच्या नियमाप्रमाणे ९२लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक गरीब आहेत. त्यांच्याकरिता तिथे किमान आवश्यक गृह, आरोग्य आणि भोजन सारख्या व्यवस्था मोफत उपलब्ध आहेत. UNFPA and NITI Ayog च्या अहवालातून उपलब्ध माहितीनुसार भारतामधील सध्याची ज्येष्ठ नागरिकांची संख्या अंदाजे १७ कोटी आहे. त्यांच्यापैकी ४०% नागरिक हे गरीब श्रेणीतील आहेत तर १८. ७. % जेष्ठ कोणतेही उत्पन्न नसलेले आहेत. म्हणजे भारतातील साधारणपणे ६०% ज्येष्ठ नागरिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत असे म्हणता येईल. ह्या विषयावर निवारा वृद्धाभ्यास केंद्र, पुणे येथे जास्तीचा अभ्यास केला जात आहे. अशा नागरिकांसाठी आपल्याकडेही बऱ्याच सरकारी योजना आहेत. पण कुठेतरी त्या अपुऱ्या पडत आहेत किंवा योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचत नसाव्यात असे चित्र दिसते. उदाहरण द्यायचे झाले तर पुण्यासारख्या शहरातील काही नावाजलेल्या हॉस्पिटलांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले आयुष्यमान कार्ड स्वीकारले जात नाही.
दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांवर परावलंबित्व आणणारे अल्झायमर किंवा डिमेन्शियासारखे आजार. भारतामध्ये डायबिटीस किंवा हार्ट ऍटकसारख्या आजारांचा आणि त्याच्यावरील उपचारांचा जेवढा विचार केला जातो तेवढा इतर आजारांचा विचार केला जात नाही. ज्येष्ठ नागरिक स्वतःही हे इतर आजार फारसे गांभीर्याने घेत नाहीत. कदाचित अशा रुग्णांची संख्या जास्त असल्याने असेल परंतू अमेरिकेमध्ये अशा आजारांचा प्राधान्याने विचार केला जातो. अशा ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांमध्ये प्राधान्य दिले जाते आणि आवश्यकतेप्रमाणे सरकारी मदत दिली जाते. पुढील काळात भारतासारख्या देशात ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत जाणाऱ्या संख्येचा विचार करून अशा प्रकारच्या आजारांवर सरकारकडून अधिक प्रमाणात ठोस उपाय योजना आवश्यक आहेत. अशा रुग्णांना घरी सांभाळणे किंवा त्यांनी स्वतंत्र रहाणे हे अतिशय अवघड असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी सेवाभावी वृद्धाश्रमांसारखी स्वतंत्र व्यवस्था जरुरीची असते. सेवाभावी सामाजिक संस्थांचा सहभागही खूप उपयुक्त ठरणार आहे. फक्त व्यावसायिक नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वृध्दाश्रमांचा विचार व्हायला पाहिजे.
आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये स्वीडनमधील ज्येष्ठ नागरिक सर्वात चांगले निवृत्त आयुष्य व्यतीत करतात. आशिया खंडामधील जपान आणि दक्षिण कोरियामधील स्थिती समाधानकारक आहे. ह्या देशांमधील नागरिकांचे आयुष्यमानही जास्त आहे. हे देश भारतापेक्षा लोकसंख्या आणि इतर दृष्टींनी खूपच लहान आहेत हे मान्य करूनही तिथल्या व्यवस्था/उपक्रम समजून घेऊन आपल्याकडील त्रुटी काही प्रमाणात कमी करता येतील. विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल.
जागतिक स्तरावर आपला भारत देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना, एक मोठा शक्तिशाली देश म्हणून पुढे येत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढला गेला, त्यांना योग्य सन्मान दिला गेला तर त्यांचे प्रदीर्घ अनुभव देशासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
(लेखक लोकमान्य जेष्ठ नागरिक संघाचे सभासद असून निवारा वृद्धाभ्यास केंद्राशी संलग्न आहेत)
☆
लेखक : श्री राजीव शास्त्री
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





