श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘पांडव पंचमी‘ — भावानुवाद ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
पांडव पंचमी
कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव पंचमी, कड पंचमी, लाभ पंचमी, जया पंचमी, ज्ञान पंचमी अशा विविध नावांनी ओळखले जाते. याच दिवशी शिखांचे दशम व अखेरचे धर्मगुरु ‘श्री गुरु गोविंदसिंह महाराज’ यांची जयंती असते.
द्यूतात कौरवांकडून पराजित झालेल्या पांडवांना क्रीडेपूर्वी मान्य केलेल्या अटींप्रमाणे बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात काढावी लागली. कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. म्हणून ही ‘पांडव’ पंचमी!
कार्तिक शुक्ल पंचमीला पांडवांचे स्मरण केले जाते. महायुद्धात विजयी झालेल्या पांडवांची पूजा देशभर केली जाते. असे करण्यामागे पांडवांच्या अंगी असलेले अतुलनीय शौर्य, धैर्य, वीर्य, पराक्रम अशा अनेक उच्च आदर्श गुणांचे पूजन करण्याची ही परंपरा आहे.
संपूर्ण देशभरात, देशातील घराघरात पांडवांसारखे पुत्र जन्माला यावेत, पांडवांचे गुण, शौर्य, विरता, हार न मानण्याची दृढइच्छाशक्ती आपल्या अपत्यात यावी, यासाठी पांडवांची पूजा मोठ्या भक्तीभावाने करण्याची ही परंपरा प्रचलित आहे.
कृष्णविना पांडव अपूर्ण आहेत म्हणून यावेळी पांडवांसमवेत श्रीकृष्णाचे पूजनही आवर्जून केले जाते. या दिवशी श्रीकृष्णाच्या नामाचा अधिकाधिक जप करावा, असे सांगितले आहे. या दिवशी गोमयापासून पांडव व श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात.
पांडव पंचमीची कथा
कार्तिक शुक्ल पंचमीला पांडवांनी महाभारत युद्धात जय मिळविला असे एका कथेत सांगितले जाते तर आणखी एका कथेनुसार पाचही पांडव एक एक करून कार्तिक शुक्ल पंचमीलाच पृथ्वीवरती अवतीर्ण झाले! कुंतीला दुर्वासांनी दिलेल्या मंत्राच्या योगाने कौमायवस्थेत सूर्याच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या कर्णाला पांडव मानले जात नाही. पंडूशी विवाह झाल्यानंतर आपला पती ऋषींच्या शापामुळे पुत्र उत्पन्न करण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वात प्रथम कुंतीने यमराजाचे /धर्मराजाचे आवाहन या कार्तिक शुद्ध पंचमीला केले. त्याच्या प्रसादाने युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाचा जन्म झाला. पुढच्या वर्षी कार्तिक शुक्ल पंचमी याच दिवशी वायु देवाच्या प्रसादाने भीमसेन, त्यानंतर इंद्राच्या प्रसादाने अर्जुन जन्मला. असे तीन तेजस्वी पुत्र प्राप्त केल्यानंतर कुंतीने हा मंत्र पंडूची द्वितिय पत्नी, आपली सवत, माद्रीला दिला. त्या मंत्राने माद्रीला अश्विनी कुमारांच्या कृपेने नकुल व सहदेव प्राप्त झाले. अशारीतीने सर्व पांडवांचे आगमन हे कार्तिक शुक्ल पंचमीला झाल्यामुळे या दिवसाला ‘ पांडव पंचमी ‘ असे म्हटले जाते.
याखेरीज महाभारतात झालेल्या कौरव आणि पांडवांच्या घनघोर युद्धात पांडवांनी कार्तिक पंचमीलाच विजयश्री मिळविली असेही म्हटले जाते.
पांडव पंचमी कुठे आणि कशी साजरी केली जाते ?
विविध प्रांतात विविध पद्धतीने पांडव पंचमी साजरी केली जाते, पांडवांची पूजा केली जाते. या पूजापद्धतीत प्रांतपरत्वे काही भेद असतीलही पण भारतभर पांडव पंचमीचा उत्सव साजरा केला जातो.
महाराष्ट्रात हा दिवस ‘पांडव पंचमी’ किंवा ‘कड पंचमी’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी इलेक्ट्रिशियन, कापड व्यापारी, हलवाई, मिठाई विक्रेते हा व्यापारी वर्ग दिवाळी सारखीच पूजा करतो.
गुजरातमध्ये हा दिवस दिवाळीचा अंतीम दिवस म्हणून अत्यंत थाटामाटात साजरा केला जातो. तेथे या पंचमीला ‘लाभ पंचमी’ म्हणून ओळखले जाते. यादिवशी गुजराती समाज श्री गणेश – लक्ष्मी यांचे पूजन करतो. दिवाळीला केल्या जाणाऱ्या पूजेसारखेच यालाही महत्व असते.
छत्तीसगड च्या बिजापूर जिल्ह्याचे पुजारी ‘कांकेर’ गावात आजही पांडवांची पूजा करतात. येथे दर दोन वर्षांनी मोठी यात्रा भरते. कौरावांकडून सर्व काही हिरावून घेतल्यानंतर पांडव दंडकारण्यात काही काळासाठी वास्तव्यास होते. अज्ञातवासात त्यांनी या भागात आश्रय घेतला होता. म्हणून या डोंगराचे नाव ‘ पांडव पर्वत ‘ पडले आहे.
उत्तर भारतात या दिवशी घर गोमयाने सारवून, गोमयाच्या पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा करून त्यांची पूजा केली जाते.
जैन धर्मात या पंचमीला ‘ ज्ञान पंचमी ‘, ‘ सौभाग्य पंचमी ‘ म्हणून ओळखले जाते. ज्ञान पंचमीला जैन समाज धर्मीय ज्ञान आणि पवित्र ग्रंथ यांचा सन्मान करतात. त्यांच्यासाठी हा दिवस विद्यार्थी, विद्वान आणि सर्वांसाठी ज्ञान, दिव्य किंवा पारलौकिक ज्ञान, बुद्धिमत्ता याचा आदर करण्याचा, याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. हा शुद्ध ज्ञानाच्या पूजेचा दिवस आहे.
ज्ञान म्हणजे आंतरिक आत्म्याचा प्रकाश! हा एक प्राकृतिक प्रकाश आहे. ज्ञान जीवनाची एक तेजस्वी, निर्मल, उज्ज्वल ज्योती आहे. या ज्योतीच्या दिव्य प्रकाशाभावी आम्ही काहीच बघू शकत नाही, जाणू शकत नाही. सत्य आणि असत्य यातील भेद समजू शकत नाही. यालाच ज्ञानाचा प्रकाश देणारा ‘ द्वितिय सूर्य ‘ किवा ‘ तृतिय नेत्र ‘ म्हणतात. ज्ञानाची पूजा करण्याचा जैनांचा हा दिवस कार्तिक शुक्ल पंचमी म्हणजे ‘ ज्ञान पंचमी ‘
शीख धर्मीय हा दिवस श्री गुरु गोविंदसिंह जयंती म्हणून साजरी करतात. शिखांचे दहावे व अखेरचे गुरु श्री गुरु गोविंदसिंह याच पवित्र दिनी जन्मले.
मुस्लिम समाजात सुद्धा सुफी परंपरेमध्ये ही कार्तिकातली शुक्ल पंचमी साजरी केली जाते. दिल्लीत हजरत निजामुद्दीन अवलियाच्या दर्ग्यावर, त्यांचा सर्वोत्तम शिष्य अमीर खुसरो, याने ही प्रथा चालू केली. त्या दिवशी सर्व मुस्लीम पिवळ्या रंगाच्या पगड्या बांधून दर्ग्यावर पिवळी चादर चढवतात.
पाकिस्तानातही ही पंचमी आणि वसंत पंचमी मुस्लिम समाजातील सुफी संप्रदाय साजरी करतो.
पंचमी ही पूर्ण तिथी
एकूणच हिंदुधर्मात पंचमी ही तिथी खरंच खूप महत्वाची आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पंचमी तिथी ही पूर्ण तिथी आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पंचमीला काही ना काही महत्व आहे. बघा ना, चैत्रात ‘ श्री पंचमी ‘, वैशाखात ‘ आद्य शंकराचार्य जयंती, श्रावणात ‘ नागपंचमी ‘, भाद्रपद महिन्यात ‘ ऋषिपंचमी ‘, अश्विन महिन्यात ‘ ललिता पंचमी ‘, (श्री स्वामी समर्थ या ललिता पंचमीलाच अक्कलकोटात प्रकट झाले / प्रवेश करते झाले. ) कार्तिक महिन्यात ‘ पांडव पंचमी ‘, माघ महिन्यात ‘ वसंत पंचमी ‘. ही पंचमी सरस्वती पूजनाकरिता अतिशय विशेष मानली गेली आहे. फाल्गुन मासातील वद्य पंचमी म्हणजे ‘ रंगपंचमी’.
अशा या पौराणिक, ऐतिहासिक, ज्ञान, ज्योतिषशास्त्र व सांस्कृतिक दृष्टया महत्वाच्या पांडव पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






